नुकताच एका आजोबांच्या वर्षश्राद्धाला उपस्थित राहण्याचा प्रसंग आला. आजोबा अगदी अलगद उंबरठा ओलांडून पल्याड गेलेले. माणूस गेल्याचं दु:ख होतंच घरच्यांना, पण आयुष्यातली सगळी भौतिक सुखं अनुभवून, सुखवस्तू आयुष्य जगून परलोकी गेलेल्या आजोबांचं श्राद्ध, म्हणजे एक छोटसं कौटुंबिक एकत्रीकरणच होतं जणू… मुलगा, मुलगी, सून, जावई, लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली नातवंडं, सगळा गोतावळा जमला होता श्राद्धाला. वर्ष उलटून गेल्यामुळे वातावरण थोडंसं हलकं. चेहरे लांबट न ठेवता, थोड्या गप्पा, थोडे हास्यविनोद, थट्टामस्करी सगळं अलगद सुरू होतं.
आजोबांच्या आठवणी, त्यांचे किस्से, त्यांचा लाघवी स्वभाव, सचोटी, प्रामाणिकपणा यांची उजळणी होत होती. त्यांच्यामुळे आज आपण इथवर पोहोचलोत याची जाणीव सगळ्यांनाच होती… आणि ती व्यक्त होणाऱ्या भावभावनांमधून दिसत होती.
मागे राहिलेल्या आजी पण सावरल्या होत्या वर्षभरात. आजोबा त्यांच्यासाठी भरपूर पैसा ठेऊन गेले होते, शिवाय त्यांची अर्धी पेन्शन पण मिळायला लागली होती, त्यामुळे त्या कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हत्या. खावं, प्यावं, उरलेलं आयुष्य जमेल तसं उपभोगावं… या वृत्तीच्या आजी, जीवनाचा शेवटचा टप्पा त्यांच्या पद्धतीने जगत होत्या. गरज पडेल तशी समाजाला आर्थिक मदत करत होत्या, सामाजिक उपक्रमात सहभागी होत होत्या, निवांत आयुष्य जगत होत्या.
हेही वाचा – पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!
वयोमानानुसार प्रकृतीच्या कुरबुरी असायच्या, पण त्यासोबत घेऊन, सांधे जरी कुरकुरत असले, तरी ती कुरकूर व्यक्त न करता, संयत जगायला शिकल्या होत्या आजी.
श्राद्ध ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने होतं. महिला पुरोहिता आलेल्या… ओळखीच्याच, गावातल्या, नेहमीच्या संपर्कातल्या. आल्यावर त्यांच्या पद्धतीने सगळी मांडामांड झाली, प्रत्येकाला एक छोटीशी पुस्तिका देण्यात आली. त्यात होऊ घालणाऱ्या विधींची सविस्तर माहिती होती. आप्पासाहेब पेंडसे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेचा, त्यांच्या कार्याचा आणि सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा परिचय करून दिला गेला आणि मग प्रत्यक्ष श्राद्धकर्म सुरू झालं…
प्रत्येक विधी, त्या मागचं कारण, तारतम्य आणि महत्त्व सांगत, पुस्तिकेतला संदर्भ देत, अगदी योग्य पद्धतीने विधी पुढे सरकत होते. पूर्वजांच्या आठवणी निघत होत्या, त्यांची नावं घेतली जात होती, कृतज्ञता व्यक्त करत, सगळं अगदी यथासांग सुरू होतं. कळून, सवरून विधी करण्यात एक पूर्णता असते, ती जाणवत होती सगळ्यांनाच… भारावले होते सगळेच, ते शास्त्रशुद्ध विवेचन ऐकून.
गुरुजी सांगतात ते यंत्रवत, अर्थ न समजता केले गेलेले विधी आणि हे समजून, अर्थ उमजून केलेले विधी, यात असलेली तफावत पदोपदी जाणवत होती. अगदी, आचमन का करावं? हे पण अगदी पटेल असं सांगितलं गेलं. किती योग्य उपक्रम आहे संस्थेचा, हे जाणवत गेलं पदोपदी… मक्तेदारी पार मोडीत काढणारा!
पूर्वजांचं स्वागत, त्यांचा यथोचित आदरसत्कार आणि मग त्यांना देण्यात आलेला निरोप, हे सगळंच भावपूर्ण. भारावून टाकणारं. डोळ्याच्या कडा ओलावणारं…
निर्माल्य, पिंड आणि विधीत वापरला गेलेला प्रत्येक जिन्नस, अगदी काळे तीळ सुद्धा परत निसर्गात गेला पाहिजे, यावर कटाक्ष होता पुरोहितांचा. एक छान अनुभव सांगितला त्यांनी बोलता बोलता –
अशीच एका घरी गेले होते, श्राद्धविधी करायला. सगळं निर्माल्य त्यांच्या घरासमोरच्या अंगणात एक छोटासा खड्डा करून विसर्जित केलं, आणि दोन महिन्यांनी त्या यजमानांचा फोन आला. विसर्जित केलेल्या जागी एक छानसं रोप उगवलं होतं म्हणे, त्याला शेंगा लागल्या होत्या आणि त्या काढून बघितल्यावर त्यात काळे तीळ होते!
किती उदात्त, किती छान… खूप वेगळं वाटलं हे ऐकून. गेलेली व्यक्ती, त्या रोपट्याच्या रूपात जिवंत झाली होती जणू.
अतिशय भावपूर्ण वातावरणात, सगळ्यांचे नमस्कार झाले आणि विधींची सांगता झाली. जेवण आलेलं होतंच. वाढपाची तयारी सुरू झाली. श्राद्धाचं नेहमीचं कांदा-लसूणविरहित जेवण होतं… भात, वरण, अळूची भाजी, पुऱ्या, तांदळाची खीर, आमसुलाची चटणी, वडे, कारल्याची भाजी वगैरे. या जेवणाने पितरांचा आत्मा तृप्त होतो आणि त्यांना शांती मिळते, असं मानलं जातं म्हणे!
सगळे जण जेवायला बसले, पुरोहिता ताईंनी सुद्धा दोन घास खाल्ले. जेवणं झाली आणि सगळ्या पुस्तिका वगैरे ताब्यात घेऊन त्यांनी निघायची तयारी केली. मुलाने त्यांना दक्षिणा दिली, त्यांनी सांगितलेली देणगी संस्थेला पाठविली आणि ‘खूप छान सांगितलंत सगळं, समाधान झालं आमचं,’ वगैरे कौतुकही केलं तोंडभरून…
हेही वाचा – कर्तव्याने घडतो माणूस…
आजी तेवढ्यात पुढे सरसावल्या, त्यांनीही आभार मानले बाईंचे, कौतुक केलं मनभर आणि म्हणून गेल्या, “पुढल्या खेपेलाही तुलाच बोलवू हो! छान केलंस अगदी सगळं…”
त्या काय बोलून गेल्या, हे लक्षात यायला सगळ्यांनाच दोन क्षण लागले आणि मग त्यात दडलेला अनर्थ उमगल्यावर, एकदमच हास्याचा विस्फोट झाला… “मेल्यांनो, नको तिथे तुम्हाला विनोद सुचतात. मला असं म्हणायचं नव्हतं,” म्हणत आजी स्वयंपाकघरात अंतर्धान पावल्या आणि बाहेर बसलेला गोतावळा, बराच वेळ खुसखुसत राहिला.
लेक म्हणाला, बाबा पण ही मुक्ताफळं ऐकून हसले असतील, जिथे असतील तिथे. परत यावं इहलोकात, थोडा काळ आणखी काढावा बायकोसोबत, असं वाटून गेलं असेल त्यांना नक्कीच!
श्राद्धाची इतिश्री, अवचितच अशी वातावरणातला तणाव हलकी करून झाली आणि पुरोहिता ताई पण मंद स्मित करत, मान हलवत, ‘ऐकावं ते नवलच,’ असं पुटपुटत प्रस्थान करत्या झाल्या.


