माधवी जोशी माहुलकर
पूर्वी बायका फावल्या वेळात स्वेटर विणत असत. विविध रंगी स्वेटरचे विणकाम करता करता एकमेकींना आपल्या सुखदुःखाच्या गुजगोष्टी सांगत. त्यांना नेहमी हेच शिकवलं गेले होतं की, बाईने नेहमी एक टाका सुलट आणि एक टाका उलट, असं करत संसाराची वीण तयार करायची असते. हे करताना तुझा संयम तुझ्या कामास येईल आणि तुझे आयुष्य सुखी होईल. मग त्या स्त्रिया आयुष्यभर तो नियम लक्षात ठेवून आपल्या आयुष्यातील संसार विणेचे पीळ अजून घट्ट विणत असत. निरनिराळ्या नात्यांची ही सुंदर वीण गुंफत असताना त्या आपले स्वतःचे अस्तित्व विसरून जात. आपल्या म्हटल्या जाणाऱ्या कुटुंबाकरिता स्वतःची सर्व क्षमता त्या पणाला लावत असत आणि त्यातून जर वेळ मिळाला तर, आपल्या आवडीचे स्वेटर विणण्यासारखे छंद जोपासत असत. त्या घरातील आपल्या माणसांकरिता स्वेटरवर नवनवीन वीण टाकताना या बायका रंगीबेरंगी लोकरींचे धागे एकमेकांत गुंतवून आपल्या मनातील विचार विणीच्या स्वरूपात गुंफत असत.
हेही वाचा – स्त्री… एक आई आणि मुलगी
स्वेटर विणताना त्या शिंपल्याच्या विणीमध्ये आपली स्वप्नं डोळ्यांसमोर ठेवून एकेक स्वप्न त्या शिंपल्यांमध्ये बंद करत असत तर, कधी फुलांफुलांचे डिझाईन टाकल्याने त्या स्वेटरमध्ये त्यांना आपला हरवलेला सुगंध गवसत असे. उलट सुलट टाक्यांनी आपल्या जीवलगांकरिता स्वेटर विणताना त्याच्या रंगीत धाग्यांमध्ये त्या बायका आपल्या जीवनाची रंगसंगती शोधत असतील नाही का? मनातील भावभावना त्यांना शब्दांत मांडता येत नसाव्यात कदाचित! निमुटपणे सगळं सहन करण्याची अमर्याद शक्ती त्यांच्या ठायी असल्यानेच “एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे” असं मनाशीच म्हणत ते स्वप्न विणीच्या रूपात स्वेटरवर उतरवत असतील.
मनस्वी असलेल्या या बायकांच्या अगणित स्वप्नांच्या अनेक विणी त्या बायका स्वेटरवर उतरवत असताना देखील चौकटीच्या बाहेर त्यांची वीण जात नसे, त्यांनी त्यांच्या इच्छा आकाक्षांची, स्वप्नांची त्या लोकरीच्या रंगीबेरंगी धाग्यांमध्ये गुंफण करताना चुकूनही किनारीवरच्या मर्यादेची चौकट कधी सोडली नाही. त्या स्वप्नांची पूर्तता कधी झाली तर, कधी अधुरीच राहिली… परंतु ते स्वप्न मनात जगत असताना नाउमेद न होता त्या बायका प्रत्यक्ष जीवनात मर्यादित चौकटीत राहून कालक्रमण करत राहिल्यात. त्यांच्या स्वेटरचे ते रंग कधी उषःकालाच्या सूर्योदयासारखे प्रसन्न, उत्साही होते, तर कधी मावळीतीच्या सूर्यास्तासारखे शांत, रमणीय संध्याछायेसारखे होते… कधी उगवतीच्या शुक्र ताऱ्यासारखे मोहक होते तर, कधी पौर्णिमेच्या चंद्रासारखे शीतल होते… कधी अवखळ खळखळून वाहणाऱ्या निर्झरासारखे होते तर, कधी एखाद्या नदीच्या अथांग डोहासारखे गूढ होते… बायकांच्या मनाचा थांग लागत नाही म्हणतात!
हेही वाचा – दहा पैशाला एक ‘सिंगल’!
स्वप्नरंजन करत काम करणे हा जणू त्या बायकांचा छंदच होता. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मर्यादित क्षेत्रात राहून स्वतःची मानसिकता न बदलता त्यांनी स्वतःला खोट्या स्वप्नांच्या जगात रममाण करुन घेतलं असावं. काळ बदलला, परिस्थितीही बदलली, परंतु कायम स्वप्नरंजन करत असलेल्या या बायका आताशा फावल्या वेळात स्वेटर विणत नाहीत की, एकमेकींशी हितगुजही करत नाहीत; कारण त्यांनीच विणलेल्या जुन्या विणी त्यांच्या विस्मरणात गेल्या आहेत.


