स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल, जाणून घ्या टिप्स –
- आपल्याला रोजच लिंबाचा वापर करावा लागतो. लिंबे नेहमी ताजी राहण्यासाठी फिरकीचे झाकण असणाऱ्या काचेच्या बाटलीत (हॉर्लिक्ससारख्या) ठेवल्यास पंधरा- पंधरा दिवस कोणत्याही सीझनमध्ये चांगली राहतात. परंतु लिंबे चांगल्या प्रतीची असावीत. डागाळलेली, खराब झालेली नसावीत. बाटलीचे झाकण नेहमी घट्ट लावावे.
- टोमॅटो शिजवून त्याचा रस काढून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठ दिवस चांगल्या स्थितीत राहतो. केव्हाही सूप किंवा सार करायला उपयोगात आणता येतो. असा रस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मेणबत्तीने पिशवी बंद करून बर्फाच्या कप्प्यात ठेवल्यास महिनाभरही चांगल्या स्थितीत राहू शकतो. अन्नरक्षके न वापरता, अन्न जीवनसत्त्वे नष्ट न होता रस वापरता येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा…
- जेवणात मुळा असणे बहुपयोगी आहे. कारण मुळा पाचक आहे. मूळव्याधीवर मुळा अतिशय औषधी आहे. मुळ्यामुळे पोट साफ राहते. पण त्याच्या वासामुळे खाल्ल्यावर ढेकरा येत राहतात. त्यामुळे सर्वजण आवडीने मुळा खात नाहीत. लहान मुले तर घरात मुळा किसल्यापासून त्याच्या वासाबद्दल तक्रार सुरू करतात. यावर उत्तम उपाय म्हणजे जेव्हा आपण मुळा किसायला घेतो, तेव्हाच मंद गॅसवर निर्लेप पॅन ठेवावा. पॅनमध्ये दोन वाट्या मुळ्याचा किस असेल तर दोन चमचे साजूक तूप घालून तूप-जिऱ्याची फोडणी करावी आणि मुळ्याचा किस त्यात घालावा आणि परतावे. साधारण कोरडे झाल्यावर खाली उतरवावे (वेळ अजिबात लागत नाही आणि निर्लेप पॅनमुळे खाली चिकटत नाही). मुळा तिखट असल्यास त्याचा तिखटपणा पूर्णपणे जातो आणि दिवसभर मुळ्याची जी ढेकर येत राहते, ती अजिबात येत नाही. किस गार झाल्यावर त्यात गोडसर साईखालचे दही, दाण्याचे कूट, मीठ, साखर घालून कोशिंबीर करावी. अजिबात पचपचीत होत नाही आणि मुळ्याचा वासही येत नाही.
हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना…
- मटारच्या दिवसात चार-पाच किलो शेंगा विकत घ्याव्यात. त्या सोलून दाणे वेगळे करावेत. एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवावे आणि त्यात एक चमचा साखर टाकावी. पाणी उकळायला लागले की, गॅस बंद करून त्यात मटारचे दाणे टाकावेत. दोन मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर ते निथळून कोरड्या कपड्यावर टाकून पंख्याखाली सुकवावेत. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून, पिशव्यांची तोंडे घट्ट बांधून त्या डीप फ्रीजरमध्ये ठेवाव्यात. गरज असेल तेव्हा डीप फ्रीजरमधून दाणे काढून थोडा वेळ साध्या पाण्यात टाकून ठेवावेत. ते अगदी ताज्या मटारच्या दाण्यांसारखे लागतात. वर्षभर टिकतात.


