रोजच्या प्रमाणे हॉस्पिटलमध्ये शिरत असताना आमच्या वॉचमनकाकांनी मला अचानक थांबवलं आणि एक धक्कादायक, पण आनंदाची बातमी दिली…
“मानकर काकांकडून आज सर्वांना आइस्क्रीम मागवण्यात येणार आहे आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे, हे इथला प्रत्येकजण जाणतो…”
एव्हाना मी आल्याची बातमी मोठ्या डॉक्टरांना समजली असावी, कारण ते त्यांच्या प्रशस्त केबिनबाहेर माझी वाट बघत उभे होते. मला बघताच लगेच पुढे होऊन त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन करून म्हटले, “केदार मानकर काकांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या बदलाचं सगळं श्रेय तुझं आहे.”
“डॉक्टर, मानकर काकांनी खूप उशिराने का होईना, पण पैलतीर शब्दाचा सकारात्मक अर्थ घेतला, याचं खूप समाधान वाटते. ही गोष्ट ऐकून इतरही रूग्ण त्या दृष्टीने नक्की विचार करतील, अशीच आशा आपण करूया.”
हेही वाचा – सागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!
जिन्यावरून माझ्या खोलीकडे जाताना मला मानकर काकांबरोबरची पहिली भेट आठवली. संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या हेतूने आमच्या हॉस्पिटलमध्ये आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांना घरच्या अडचणींमुळे शक्य नसल्यास इथेच वास्तव्य करण्याची सोय एका वेगळ्या वॉर्डमध्ये केलेली आहे, अर्थात आवश्यक ते शुल्क आकारून. याच वॉर्डमध्ये खिडकीतून बाहेर शून्यात एकटक नजर लावून बसले होते काका. संभाषण करायला कायम नाखूश असायचे. त्यांना बोलतं करण्यासाठी मी किती जीवाचा आटापिटा केला होता, ते आठवून हसू आलं मला. आजूबाजूला असलेल्या रूग्णांसोबत ते कधीच बोलत नसत. “एवढं काय बघता खिडकीतून बाहेर?” या माझ्या प्रश्नावर त्यांचे कायम एकच उत्तर असायचं, “पैलतीर!” जगण्याचा अर्थ गमावून बसलेले काका माझ्यासारख्या समुपदेशकासाठी खरंच आव्हान होतं. पण मी जिद्दीने काकांसोबत अधिकाधिक वेळ घालवू लागलो. विविध उदाहरणे देऊन पैलतीर या शब्दात सर्वसाधारणपणे भरलेली नकारात्मकता, मी सकारात्मकतेमध्ये बदलण्यात यशस्वी झालो होतो.
असंच एकदा खिडकीतून बाहेर बघताना काकांना अचानकपणे शाळेचे गणिताचे मास्तर आठवले आणि तीच आठवण ठरली टर्निंग पॉइंट! तोच आठवणींचा धागा मी अलगदपणे पुढे नेत गेलो आणि काका शाळेच्या दिवसांतून एकेक करत कॉलेजच्या रम्य आठवणीत रमू लागले. पुढे नोकरीची आणि संसाराची सुरुवात झाली. आठवणींची गाडी ज्या उत्साहाने सुरू झाली होती, ती अचानक करकचून ब्रेक लागल्यागत थांबली, जेव्हा काकांच्या तोंडून काकूंच्या अपघाती निधनाची बातमी ऐकली. तेव्हापासून काका जे खचून गेले ते अगदी काल-परवापर्यंत त्याच स्थितीत होते. घरी काकांची काळजी घेण्यासाठी कोणी नाही म्हणून काकांच्या मुलाने काकांच्या इथल्या वास्तव्यासाठी वेगळे पैसे भरले होते.
हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!
पण “पैलतीरावर आणखी काय काय असतं, ते एकेक करत मी काकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी झालो होतो. आनंद मिळवत मन प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टींचं “पैलतीरा”वर असलेले लक्ष्यवेधी अस्तित्व, काकांनी हळूहळू नुसतं मान्यच केले नाही तर, ते त्यात रमून गेले. काका गाणी, श्लोक, स्तोत्र म्हणत इतर रुग्णांचे मन रमवू लागले. काका आजकाल उत्साहाचा धबधबा म्हणून ओळखले जायला लागले.
…आणि आज काकांकडून मिळणाऱ्या आइस्क्रीमची गोष्ट म्हणजे काकांच्या पूर्णपणे माणसात येण्याच्या माझ्या खात्रीवर शिक्कामोर्तब करणारी ठरली.
मी काकांच्या वॉर्डात पोहोचल्यावर काकांनी मला अचानकपणे गच्च मिठी मारली आणि ते म्हणाले, “केदार मला माणसात आणण्यासाठी तू जे जे केलंस, न थकता आणि न कंटाळता, त्याला तोड नाही. इथे बसून खिडकीतून दिसणाऱ्या पैलतीरावर मला आनंदाने उडणारे पक्षी दिसले. पाठीवर दप्तर लावून शाळेत जाणारी इवली इवली पावलं दिसली. मंदिरात वाजणारी घंटा आणि म्हटली जाणारी आरती ऐकू आली. आजवर खूप काही गमावल्याची खंत आहे मला पण, मी आता ठरवलंय… येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे आनंदाने दणक्यात स्वागत करायचे आणि प्रत्येक क्षण न क्षण मस्तपणे जगायचं आणि आपल्या आनंदात इतरांनांही सामावून घ्यायचे. आज हा माझा निर्धार आणि निर्णय सेलिब्रेट करण्यासाठी मी सगळ्यांना आइस्क्रीम देणार आहे.”
निराश आणि जगण्यातील उत्साह, काही कारणाने गमावलेल्या प्रत्येकाने मानकर काकांप्रमाणेच जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर, जीवनातील सकारात्मक पैलतीर त्यांच्या नक्कीच दृष्टीक्षेपात येईल, यात शंकाच नाही.


