स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये केळ्याचे पिवळे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ बनविण्याच्या टिप्स पाहुयात.
- पिवळे वेफर्स : प्रथम अगदी कच्ची राजेळी केळी घ्यावीत. त्यांची साले काढून घ्यावीत. नंतर किसणीने त्याचे जाडसर काप करावेत. ते साधारण अर्धा तास कोरड्या फडक्यावर पसरावेत. नंतर गरम तेलामध्ये तळावेत, अर्धवट तळून झाल्यावर त्यावर मिठाचे पाणी मारावे. पाणी कढईतच वेफर्स असताना मारावे. पाणी जास्त तडकत नाही आणि तेलही उडत नाही. नंतर वेफर्स पूर्णपणे तळून झाल्यावर बाहेर काढावेत. बाजारात केळ्याचे पिवळे वेफर्स मिळतात, ते या प्रकारेच करतात. आवडत असल्यास गोडेतेलाऐवजी खोबरेल तेल वापरावे. सुंदर स्वाद येतो.
- पपई कधी कधी कमी गोड आणि पूर्ण पिकलेली नसते. अशा वेळी त्या पपईची भजी करावीत. एक वाटी पपई किसात अर्धी वाटी मैदा, चवीप्रमाणे मीठ, जिरेपूड, मिरच्या बारीक चिरून, कोथिंबीर, आले बारीक किसून घालावे आणि तेलात भजी तळावीत. यात रवा-मैद्याऐवजी साबुदाणा किंवा उपवासाची भाजणी घातल्यास उपवासाचा उत्तम पदार्थ तयार होईल.
हेही वाचा – Kitchen Tips : घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक…
- हरभऱ्याची तळलेली डाळ करण्यासाठी आपण ती भिजत टाकतो, त्या वेळी त्यात चमचाभर दूध टाकावे. डाळ चांगली भिजल्यावर टोपलीत उपसून ठेवून थोडी सुकली की तळावी. त्यामुळे डाळ अधिक खुसखुशीत होते आणि कुरकुरीत राहते. तेलकटही होत नाही.
- चिवड्यासाठी पातळ पोहे भाजून घ्यावेत. भाजलेले पोहे चाळून घ्यावेत. खाली राहिलेला पोह्याचा चुरा मिक्सरमधून बारीक करून ठेवावा. हे भाजलेले चुऱ्याचे पीठ भजी करताना भज्याच्या पिठात घालावे. त्यामुळे तेल कमी लागते आणि चुऱ्याचा उपयोग होतो. शिवाय भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात.
- चकल्या खुसखुशीत पाहिजे असतील, तर मुगाची डाळ शिजवून चकलीच्या पिठात चकली करायच्या वेळेला चांगली मळावी. मोहन कमी घातले तरी चालते.
हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी…
- उत्तप्पा, डोसा, टोमॅटो आम्लेट वगैरे करताना तवा जर साधा असेल तर आम्लेट वगैरे चिकटतात. कधी कधी तुकडे होतात. असे होऊ नये म्हणून साधारण तयार पिठात एक वाटी पिठाला एक टी-स्पून या प्रमाणात कणीक घालावी. डोसे, आम्लेट अजिबात चिकटत नाहीत.


