लाल भोपळा किंवा ज्याला काशीफळ, तांबडा भोपळा किंवा कोवळं म्हटले जाते त्याच्या खिरीला विदर्भात ‘गुळशेल’ म्हणतात! काही विशिष्ट सणांना हे गुळशेल विदर्भात प्रसाद म्हणून केले जाते. पूर्वी सणावारांना आजच्या सारखे गोडाचे पदार्थ बाहेरून विकत आणले जात नसत. घरी कोणी पाहुणे आल्यास किंवा सणावारांना शिरा, पाकातील पु-या, चिरोटे, शेवयाची खीर, सुधारस, केळ्याचे शिकरण, रवा/ बेसनाचे लाडू अशा प्रकारचे विविध गोड पदार्थ घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधूनच केले जायचे. लाल भोपळ्याचे ‘गुळशेल’ हा त्यातीलच एक चवदार आणि पौष्टिक पदार्थ… परंतु सध्या विस्मरणात गेलेला! आमच्या घरी मात्र अजूनही महालक्ष्मी उठतात, त्या दिवशी नैवेद्यात गोड पदार्थ म्हणून गुळशेल करतात. तसेच, हा पदार्थ काहीजण उपवासाच्या दिवशी देखील आहारात घेतात.
गुळशेल हा शरीराला ऊर्जा देणारा पदार्थ आहे. यात प्रामुख्याने पिकलेला लाल भोपळा, गूळ, दूध आणि स्वादासाठी वेलची-सुंठ पूड वापरली जाते. याची रंगत वाढविण्यासाठी यामध्ये चारोळी, काजू, बदाम वापरले जातात. मी काजू-बदामासोबत यात भोपळ्याच्या बियांचा वापर करते. खिरीसारखं लागणारे हे गुळशेल पिताना भोपळ्याचा, गुळाचा आणि बेसनाचा स्वाद खूप वेळ जिभेवर रेंगाळत राहतो.
माझ्या घरी गुळशेल कसे तयार करतात, त्याची रेसिपी सांगते…
साहित्य
- लाल भोपळा – दोन वाट्या (साल काढलेले आणि बारीक चिरलेले काप)
- तूप – दोन चमचे
- गूळ – एक वाटी (किसलेला)
- काजू-बदामचे भिजवलेले काप – 7-8
- भोपळ्याच्या भिजवलेल्या बिया – दोन चमचे
- बेसन – एक चमचा
- वेलची पावडर – एक चमचा
- सायीसह दूध – पाच वाट्या
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!
कृती
- प्रथम भोपळ्याची साल काढून त्याच्या बारीक फोडी कराव्यात आणि त्या गरम पाण्यात शिजवून घ्याव्यात.
- या फोडी थंड झाल्यावर त्या रवीने किंवा मिक्सरमधून फिरवून वाटून घ्याव्यात.
- नंतर एका कढईत दोन चमचे तूप टाकून त्ते वितळले की, यात एक चमचा बेसन घालून तो मंद आचेवर थोडा भाजून घ्यावा.
- मग पेस्ट केलेल्या भोपळ्याचा गर त्या तुपात टाकून तो गर आणि बेसन एकत्र मंद आचेवर थोडा परतून घ्यावा; म्हणजे त्यातील पाण्याचा अंश कमी होईल.
- नंतर यात एक वाटी किसलेला गूळ टाकून तो वितळून घ्यावा.
- गूळ पातळ झाल्यावर गरम केलेले घट्ट सायीचे दूध त्यात टाकून सगळे मिश्रण पळीने एकजीव करावे. गुळामुळे दूध फाटू नये म्हणून खीर एकसारखी ढवळत रहावी.
- नंतर यात वेलची पूड, भिजवलेले बदाम-काजूचे तुकडे आणि भोपळ्याच्या बिया घालून हे सर्व मिश्रण उकळून घ्यावे.
- सात-आठ मिनिटांनी भोपळ्याचा तसेच गुळाचा हलका पिवळसर रंग दिसायला लागला की, समजावे गुळशेल तयार झाले.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!
टीप्स
- या पदार्थाचे नावच गुळशेल असल्यामुळे यात शक्यतोवर गूळच वापरायला हवा. साखर वापरू नये.
- यामध्ये थोडे बेसन मी याकरिता वापरते, कारण ते गुळासोबत मिळून आल्यामुळे दूध फाटत नाही. ही माझ्या आजीची खास टिप होती.
- उपवासाला हे गुळशेल करताना यामध्ये बेसनाऐवजी एक चमचाभर राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पिठाचा वापर करावा.


