महाराष्ट्रासह गोव्यात परांजपे नाट्यमंडळीच्या ‘संगीत सौभद्र’ने धुमाकूळ घातला! प्रेक्षकांनी प्रयोगांना गर्दी केल्याने शो हाऊसफुल्ल! अर्जुनच्या गाण्याचे कौतुक सुरू झाले होते. या नाटकात क़ृष्णाची भूमिका करणारा अर्जुन 20 वर्षांपासून बुवांचा शिष्य होता.
याच काळात पुण्यात दुसरीकडे एक नाट्य रंगलं होतं. डेक्कन जवळील बंगल्यात कोचवर बुवा सुपारी कातरत बसले होते. त्यांच्या समोरील खुर्चीवर बुवांच्या पत्नी मोहिनीबाई बसल्या होत्या. एवढ्यात बाहेरून बुवांचा मुलगा परेश आला.
परेश – बाबा, अर्जुनने गोव्यात मुख्यमंत्र्यांसमोर मैफल केल्याची बातमी आहे आणि ती चांगलीच गाजली म्हणे. गोव्याच्या वर्तमानपत्रात मोठ्या मोठ्या बातम्या आल्या आहेत. बाबा, अर्जुन तुमचा शिष्य म्हणवता, मग एका शब्दाने त्याने तुम्हाला कळवलं नाही!
मोहिनीबाई – मागचं सगळं विसरला अर्जुन. दहा वर्षांचा होता तेव्हापासून येथे येतोय. नाटकात भूमिका घेतली सांगितले नाही. आपल्या गुरूंना नाटकाला बोलावलं नाही. आता म्हणे गोव्यात मैफल करायला लागला आहे. अहो, एकदा त्याला बोलवा आणि खडसावून विचारा…
बुवा – खडसावून विचारायला त्याने काही कॉन्ट्रॅक्ट केलं नव्हतं माझ्याबरोबर! तो गेली वीस-बावीस वर्षे इथे येतो. मी त्याला गाणे शिकवतो, तो माझ्या कार्यक्रमाला साथ करतो, एवढंच.
मोहिनीबाई – एवढंच काय एवढंच? या बंगल्यावरचं अन्न खाल्लं त्याने, अन्नाला विसरू नये माणसाने!
परेश – बाबा, आता तुमच्या मैफलीत तो साथ करणार आहे की नाही?
बुवा – साथ करणे किंवा न करणे ही त्याची मर्जी… पण त्याची साथसंगत असल्याशिवाय माझं गाणं रंगत नाही, हे खरं.
परेश – पण तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू नका. दुसरा कुणीतरी शोधा…
बुवा – (चिडून) मग तू येतो साथ करायला? तुझ्या जन्मापासून तू इथे राहतोस!
परेश – तुम्हाला माहीत आहे, मला तुमच्या गाण्यात किंवा मैफलीत इंटरेस्ट नाही…
बुवा – मग कशात इंटरेस्ट आहे? दारू पिण्यात की रेस खेळण्यात?
मोहिनीबाई – जाऊ दे तो विषय… पहिल्यांदा अर्जुनचे काय ते पाहा.
परेश – बाबा तुमचा 20 तारीखला नाशिकला प्रयोग ठरतो आहे, 21 तारखेला पनवेल आहे… त्याला निरोप धाडा, येतो का पाहा! मी सांगतो त्याच्या नाटकाचा दौरा 20 तारखेपासून बेळगावच्या बाजूला आहे, तेव्हा तो येणार नाही.
मोहिनीबाई – परेश, तू मुद्दाम अर्जुनला फोन कर, त्याला सांग 20 आणि 21 तारखेचे कार्यक्रम ठरले… मग काय करतो बघ!
परेशने अर्जुनला फोन करून बुवांचे कार्यक्रम 20 आणि 21 तारखेला ठरल्याचे सांगितले… अर्जुनला काय करावे हे कळेना! तो तातडीने वर्षाताईंकडे गेला. वर्षाताईंनी पाहिलं, सौभद्र नाटकाचा प्रयोग वीस तारखेला निपाणी आणि 21 तारीख ला इचलकरंजीत होता. 22 तारखेला बेळगावचा प्रयोग करून कंपनी गोव्यात जायची होती. अर्जुन हा परांजपे नाट्यमंडळीचा हुकमाचा एक्का होता. पण वर्षाताईंना हेही माहीत होते, अर्जुन हा बुवांचा उजवा हात आहे. इतकी वर्षं तो बुवांना साथ करत आहे. वर्षाताईंनी 20 आणि 21 तारखेचे नाटकाचे प्रयोग रद्द केले. 22 तारखेपासून बेळगावहून दौरा चालू ठेवला.
हेही वाचा – …अन् वन्स मोअरने अर्जुनचं भाग्यच पालटलं!
अर्जुन 20 तारखेला नाशिकला पोहोचला. स्टेजवर जाऊन साथीदारांसह हार्मोनियम, तबला यांची तालीम घेऊ लागला. नेहमीप्रमाणे साऊंड सिस्टिम व्यवस्थित आहे की, नाही याची त्याने दोन-दोन वेळा खात्री केली. कार्यक्रमानंतर बुवांची ‘बाटली’ची व्यवस्था आहे की, नाही हे पाहिले. साडेआठ वाजता बुवा आले. ते सर्व साथीदारांना भेटले. पण अर्जुनकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. बुवा बैठकीवर बसल्यानंतर अर्जुन मागे बसला. मनासारखा तंबोरा जुळल्यानंतर आणि कार्यक्रम सुरू केला, कार्यक्रम नेहमीप्रमाणे रंगला आणि तीन तासांनंतर संपला. अर्जुन दहा मिनिटांनंतर बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी अर्जुन पनवेलच्या कार्यक्रमाला वेळेत हजर झाला. कालच्या सारखीच सर्व तयारी पाहिली आणि कार्यक्रम वेळेत सुरू झाला… तीन तासांनंतर संपला. वर्षाताईंनी ड्रायव्हरसह गाडी तयार ठेवली होती. मग अर्जुन पुण्याला रवाना झाला…
परेश आता मुद्दाम अर्जुनचे नाटक दौरा असे तेव्हा बुवांचे कार्यक्रम ठेवू लागला. नाटकाचे प्रयोग आणि बुवांचे कार्यक्रम यात अर्जुनची फार ओढाताण होऊ लागली. त्यामुळे त्याची चिडचिड होत होती. पण अनघा त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
20 जूनला संगीत सौभद्रचा ठाण्यात दुपारी प्रयोग होता. परेशने बुवांचा त्याच दिवशी रात्री नऊ वाजता कार्यक्रम खंडाळ्यात ठेवला होता. त्यामुळे साडेतीनचे नाटक साडेसहापर्यंत संपवून खंडाळ्याला जायचे अर्जुनने ठरवले होते. अर्जुनने साडेसहाला प्रयोग संपवला आणि धावत धावत बाहेर येऊन वर्षा ताईंनी तयार ठेवलेल्या गाडीत बसला. सदाशिव ड्रायव्हर सीटवर बसूनच होता. साडेआठपर्यंत खंडाळ्याला पोहोचायला हवे होते. संध्याकाळच्या गर्दीत सदाशिवने गाडी जोरात घेतली. गाडीने पनवेल मागे टाकले… ‘स्पीड वाढव’, ‘अजून स्पीड वाढव’ अर्जुन म्हणू लागला, म्हणून सदाशिवने गाडीचा स्पीड 125 च्या पुढे नेला आणि एका वळणावर गाडी दुभाजकावर आदळली!
मागच्या गाड्या थांबल्या. ॲम्ब्युलन्स मागवली गेली. पोलिसांची व्हॅन आली आणि एका बाजूचा पत्रा कापून ड्रायव्हर सदाशिवची डेड बॉडी बाहेर काढली. अर्जुन मागच्या सीटवर पण ड्रायव्हरच्या विरुद्ध सीटवर बसल्यामुळे रक्तबंबाळ झाला होता आणि विव्हळत होता. त्याला बाहेर काढून प्रथम पनवेलच्या इस्पितळात आणि मग ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवले गेले.
अनघा आणि वर्षाताई पुण्यात होते. वर्षाताई गाडी घेऊन तिच्या घरी गेल्या… अनघाला आणि अर्जुनच्या आईला गाडीत घेऊन त्या ठाण्याच्या दिशेने निघाल्या. अनघाचा आणि अर्जुनच्या आईचा आक्रोश सुरू होता… वर्षाताई त्यांना धीर देत होत्या.
डॉक्टरांची टीम अर्जुनवर उपचार करत होती. विविध चॅनेलवर अर्जुनच्या अपघाताची बातमी फोटोसकट सांगितली जात होती. सर्व लोक हळहळत होते… “अर्जुन बरा होऊ दे” म्हणून देवाला नवस बोलत होते.
बुवांना ही बातमी खंडाळ्यात समजली. परेश कार्यक्रम चालू करा म्हणत होता, पण बुवांनी कार्यक्रम रद्द केला. बुवांचे सर्व वादक हे अर्जुनचे नेहमीचे सवंगडी, अर्जुनच्या अपघाताची बातमी ऐकून ते रडू लागले. ती सर्व मंडळी भाड्याची गाडी करून ठाण्याकडे रवाना झाली. बुवांना हॉस्पिटलमध्ये जायचे होते, पण परेशने त्यांना जाऊ दिले नाही. त्याने जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवले आणि तो पुण्याला घेऊन आला. बुवा गप्प बसून होते. मनातल्या मनात रडत होते… अर्जुन दहा वर्षांचा असताना त्याची आई आपल्याकडे घेऊन आली होती. अर्जुनचे वडील पण गायक होते. लहान मोठ्या बैठका करत होते, पण हृदयविकाराने ते लवकर गेले.
अनघा आणि अर्जुनची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेथे अनेक नाट्यकलाकार, सिनेमा टीव्हीची मंडळी जमली होती. आतमध्ये डॉक्टरांची टीम तातडीची ऑपरेशन्स करत होती. रक्त चढवले जात होते. वर्षाताई हॉस्पिटलच्या डीनला भेटली. “कितीही खर्च होऊ देत, गरज असेल तर बाहेरचे डॉक्टर्स बोलवा… पण अर्जुनला बरं करा,” असा निरोप तिने दिला.
पहाटे तीन वाजता डॉक्टरांची टीम बाहेर आली. “सध्या तरी तो धोक्याच्या बाहेर आहे, आता यापुढे कसा रिस्पॉन्स देतो तो पाहू,” असे डॉक्टरने अनघाला आणि वर्षा ताईंना सांगितले. अनघा तेथेच थांबली, वर्षाताई अर्जुनच्या आईला तिच्या बहिणीकडे घेऊन गेली.
पंधरा दिवस झाले तरी अर्जुनच्या तब्येतीत फार बदल दिसेना, डॉक्टरना त्याच्या मेंदूच्या कार्यक्षमतेबद्दल काळजी वाटत होती. जवळची माणसे हॉस्पिटलमध्ये येऊन त्याच्या रूममध्ये त्याला बघून जात होती. अनघाशी बोलून तिला धीर देत होती.
इकडे बंगल्यात बुवा बेचैन झाले होते. वर्तमानपत्रातील बातमीप्रमाणे अर्जुन अजून शुद्धीवर येत नव्हता. बुवाना अर्जुनला भेटायला जायचे होते. पण मोहिनीबाई आणि परेश त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांना भेटायला जाऊ देत नव्हते. पण एका दिवशी बुवांनी ठरविले, आता या दोघांचे ऐकायचे नाही, त्यांना त्यांची जागा दाखवायची. सकाळी सकाळी फोन करून त्यांनी त्यांचा ड्रायव्हर मोहनला ‘टाकी फुल्ल कर’ असा निरोप दिला. आठ वाजता मोहन गाडी घेऊन आला. बुवा आपल्या खोलीतून दाराकडे निघाले. हॉलमध्ये मोहिनीबाई कोचवर बसलेल्या होत्या. बुवा बाहेर पडताच, मोहिनीबाईंनी मोठ्याने विचारले, “कुठे निघालात?”
बुवा उद्गारले, “अर्जुनला भेटायला जातोय ठाण्याला, का तुझी भीती आहे का?”
“जायचं नाही, तो खाल्ल्या मिठाला जागला नाही.”
“मी जाणार, कोण मला अडवतो ते मी पाहतो…”
तेवढ्यात परेश बाहेर आला, “बाबा बाहेर पडू नका, वाईट परिणाम होतील.”
“अरे जा रे, पाच पैसे कमवण्याची अक्कल नाही, मी पैसे कमवतो आणि तू उधळतोस!”
मोहिनीबाई संतापाने बोलल्या, “तुम्ही बाहेर पडला तर, आम्ही घरात राहणार नाही!”
“चालते व्हा. एक मिनिट थांबू नका इथे…” बुवा कडाडले आणि घरातून बाहेर पडले. मोहनला गाडी बँकेकडे घ्यायला सांगितले. मोहनने बुवांच्या बँकेकडे गाडी घेतली. बुवा तडक बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले. स्वतः बुवा बँकेत आले म्हणून बँक मॅनेजर उभे राहिले. बुवांनी आपले चेकबुक हरवले असल्याने ते रद्द करावे, असा अर्ज लिहून दिला. वास्तविक, ते चेकबुक परेश वापरत होता! तसेच, परेश वापरत असलेले एटीएम कार्ड रद्द करण्याचाही अर्ज दिला. तेथून मोहनला “गाडी ठाण्याकडे घे,” असं सांगितलं आणि ते मागे डोके टेकून बसले. तीन तासांच्या पुणे ते ठाणे या प्रवासात छोटा अर्जुन, तो आता गायक अर्जुन डोळ्यांसमोर येत होता.
दुपारी दोनच्या सुमारास बुवांची गाडी ज्युपिटर हॉस्पिटलच्या आवारात शिरली… बुवा खाली उतरले आणि हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागले. भारतातील सुप्रसिद्ध गायक बुवा आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्याने हॉस्पिटलमधील ऑफिस स्टाफ पुढे आला. बुवा खोलीत आले, अनघा बेडजवळ बसली होती… बुवा आत येताच अनघा उठली. बुवांनी अर्जुनकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. अनघा उभी होती, तिच्या डोक्यावर हात ठेवला. बुवांना भरून आलं होतं. अनघा पण डोळे टिपत होती. सद्गदीत स्वराने बुवा अनघाला म्हणाले, “मुली रडू नकोस. मी दत्ताचा उपासक आहे. दत्त महाराज अर्जुनच्या पाठीमागे आहेत. माझं निगडीमध्ये दत्त मंदिर आहे, हे तुला माहिती आहेच. दरवर्षी दत्त जयंतीला माझं गाणं त्या दत्त मंदिरात ठरलेलं असतं. दरवर्षी अर्जुन साथीला असतोच! दत्त जयंतीला अजून साडेचार महिने आहेत. यावर्षी या दत्त जयंतीला माझं आणि अर्जुनचं संयुक्त गाणं दत्त महाराजांसमोर होणार आहे. तोपर्यंत अर्जुनला खणखणीत बरं व्हावंच लागेल… अर्जुनचा गुरू म्हणून अर्जुनला आज्ञा आहे… त्याला निगडित दत्त जयंतीला यावेच लागेल!”
बुवा गप्प झाले आणि मोठ्या प्रयासाने डोळ्यातील अश्रू थोपवत होते. अनघा मुसमुसत होती. पुन्हा एकदा अनघाच्या डोक्यावर हात ठेवून बुवा बाहेर पडले.
बुवा घरी पोहोचले, मोहिनीबाई आणि परेश रागाने त्यांच्याकडे पाहात होती. बुवा कडाडले, “परेश, यापुढे माझे कार्यक्रम ठरवू नकोस. मी आता 80 वर्षे पार केली. आता मला निवृत्ती घेऊ दे. दुसऱ्यांची गाणी ऐकू दे. यापुढे मला विचारल्याशिवाय बँकेतून पैसे काढायचे नाहीत. मी बँकेला तशी सूचना देऊन ठेवली आहे आणि स्वतः काहीतरी नोकरी धंदा बघा. बापाच्या जीवावर खूप मजा मारलीत आता यापुढे नाही.”
बुवा येऊन गेल्यानंतर अर्जुनची तब्येत सुधारू लागली. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स आता समाधानी होते. हळूहळू अर्जुन डोळे उघडू लागला. पुन्हा एकदा न्यूरोलॉजिस्टकडून त्याच्या सर्व तपासण्या झाल्या. त्याच्या तब्येतीत प्रगती दिसत होती. दिवाळीपर्यंत अर्जुन वॉकर घेऊन चालू लागला. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. घरी आल्यावर अनघाची सेवा आणि आईच्या आशीर्वादाने त्याच्या तब्येतीत झटपट सुधारणा दिसू लागली. बसल्या बसल्या अर्जुनने गाण्याचा रियाज सुरू केला.
हल्ली दर आठ दिवसांनी बुवा अर्जुनच्या घरी येत होते. त्याच्या तब्येतीतील प्रगती पाहत होते. बळे बळे अनघाच्या हातात पैसे कोंबत होते. वर्षाताई कन्या मयुरीसह येतच होत्या. येताना भाजी, फळे आणत होत्या. बुवा आता घरी येऊन अर्जुनला गाणं शिकवत होते. त्याच्या रियाझवर लक्ष ठेवत होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत अर्जुन घरातल्या घरात फिरू लागला. आता दत्त जयंतीच्या उत्सवाची सर्वजण वाट पाहत होते. अर्जुन बरा झाला आणि बुवा निश्चिंत झाले.
स्थळ – निगडी येथील दत्त मंदिर
निगडीतील दत्त मंदिरात दत्त जयंतीची गडबड सुरू होती. बुवा दोन दिवस आधीच हजर झाले होते. सर्व तयारी जातीने पाहत होते. मोठा मंडप घातला होता. अर्जुन पहिल्यांदाच बुवांसमोर गाणार होता. दत्त जन्माचा कार्यक्रम नेहमीसारखा, पण जास्त उत्साहाने पार पडला. दुपारी महाप्रसाद होता. सायंकाळी सातला बुवांचे गाणे म्हणून लोक जमू लागली होती. गाण्यासाठी स्टेज सजवले होते. वादक मंडळी अर्जुनची वाट पाहत होती. साडेपाच वाजता अर्जुन वर्षाताईंच्या गाडीतून आला. सर्व वादक सहकाऱ्यांची त्याने चौकशी केली. बुवांनी त्याला आपल्याजवळ बसवले आणि आज कुठले कुठले राग गायचे आहेत, याची माहिती दिली.
बरोबर सात वाजता बुवा स्टेजवर बसले. सर्व वादक मंडळी तयारच होती. अर्जुन येऊन बुवांच्या मागे बसत होता, पण बुवा आणि त्याच्या हाताला धरून आपल्या शेजारी बसविले. तंबोरे मनासारखे जुळले आणि बुवांनी एका रागाने सुरुवात केली. त्यातून हळूच यमन, पुरिया, शुद्ध कल्याण करून आलापी सुरू केली. राग फुलत गेला तशी त्याची लय वाढवली. मग वरचा षड्ज आला, तेव्हा श्रोते बेभान झाले. दृत सुरू केल्यानंतर तानांची नुसती बरसात केली. मग एक नाट्यसंगीत म्हणून मध्यंतर केले.
मध्यंतरानंतर अर्जुनला गायला सांगितले. अर्जुनने बुवांना नमस्कार केला. श्रोत्यांना नमस्कार केला आणि गायला सुरुवात केली. दरबारी, मालकंस, मल्हार, अभोगी एकापाठोपाठ एक राग श्रोत्यांच्या अंगावर येऊन आदळत होते आणि श्रोते चिंब भिजत होते. दोन तास अर्जुन गात होता. बुवांसकट सर्वजण मान हलवत होते. समेवर आले की, मांडीवर थाप मारत होते.
मग बुवांनी माइक हातात घेतला आणि ते बोलू लागले, “माझ्यावर, गाण्यावर प्रेम करणारे भारतातील तसेच परदेशातील असंख्य श्रोतेहो, तुम्हाला माझा नमस्कार. गेली 50 वर्षे माझ्यावर उदंड प्रेम केले. मी भारतात आणि परदेशात मैफली करतो आहे, मी आता वयाची 80 वर्षे पुरी केली, मला विश्रांती हवी आहे. आता माझे शिष्य माझी जागा घेण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना जागा करून देणे, हे माझे कर्तव्य आहे. आज दत्त महाराजांच्या साक्षीने गायलेली ही माझी शेवटची मैफल…” हे ऐकल्यावर अर्जुनसह सर्व वादक आणि श्रोते उभे राहिले. “नाही, नाही बुवा, तुम्ही गायले पाहिजे… तुम्ही निवृत्त होऊ शकत नाहीत…” असे ओरडून सांगत होते. अर्जुनही बुवांना कळकळीने काही सांगत होता. पण बुवा ऐकत नव्हते.
बुवा बोलू लागले, “श्रोतेहो, हा माझा शिष्य अर्जुन साठे, यापुढे माझी गादी चालवील. मी माझा निर्णय दत्त महाराजांच्या समोर घेतला आहे. तो बदलणे शक्य नाही. माझ्यावर जसं प्रेम केलं, तसं माझ्या शिष्यावर प्रेम करा.” असं म्हणून बुवांनी आपल्या गळ्यातली शाल अर्जुनच्या गळ्यात घातली. सर्व श्रोत्यांसमोर हे सर्व अचानक घडले त्यामुळे अर्जुन भारावून गेला. अर्जुनने बुवांना नमस्कार केला.
बुवा आणि अर्जुन ला आपल्या बाजूला बसवले आणि दोघे भैरवी गाऊ लागले
“सजल नयन नित धार बरसती
भावागंध त्या जळी मिसळती…
थकले पैंजण, चरणही थकले
वृंदावनीचे मोहन सरले…
गाता गाता स्वतः बुवा, अर्जुन, सारे संगीत साथ करणारे आणि श्रोते रडू लागले. साऱ्यांचे कंठ दाटून आले होते. भैरवी संपली तसे बुवांनी तमाम श्रोत्यांना साष्टांग नमस्कार घातला. रडणाऱ्या बुवांना अर्जुनने आणि इतरांनी उभे केले. आज रडत रडत श्रोते बुवांना येऊन भेटत होते.
अर्जुनला मैफलीची निमंत्रणे येत होती… पण अनघा अर्जुनला म्हणाली, “पहिल्यांदा नाटक सुरू कर. कारण संकटाच्या वेळी वर्षाताई पहाडासारख्या मागे उभ्या होत्या.” ‘सौभद्र’ पुन्हा धुमधडाक्यात सुरू झाले. तसेच अर्जुनच्या मैफलीही सुरू झाल्या. ‘बुवांचा शिष्य’ असं नाव झाल्याने लोक कौतुकाने अर्जुनच्या गाण्याला गर्दी करत होती.
रोजच्या मैफली आणि नाट्यप्रयोग यामुळे अनघाला अर्जुन व्यवस्थित भेटत नव्हता. त्यामुळे अनघा नाटक कंपनीबरोबर मुंबईत आली. एके दिवशी पहाटे पहाटे अनघा आणि अर्जुन फिरायला वरळ सी फेसवर आली. तिथे कठड्यावर बसल्यानंतर अनघा अर्जुनला म्हणाली. “महाराष्ट्राच्या जनतेसाठी एवढी गाणी म्हणतोस, वन्स मोअर घेतोस, मग माझ्यासाठी गाणं कधी म्हणणार?”
अर्जुनने उगवणारा सूर्य अनघाला दाखवत गाणं सुरू केलं-
रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी…
होत उष:काल हा, प्रिये पाहा, प्रिये पाहा, प्रिये पाहा…!
त्याची ही आळवणी ऐकून अनघा त्याला बिलगली.
समाप्त
मोबाइल – 9307521152 / 9422381299


