स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मिरचीची भजी, खिचडीचे परोठे, शेंगदाणा भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात.
- मिरचीची भजी खाताना वरचे आवरण खाऊन मिरच्या तिखट लागतात म्हणून टाकून दिल्या जातात. म्हणून ही भजी करायच्या अगोदर मिरच्यांना मध्यभागी चीर पाडून हळद आणि मिठाच्या पाण्यात तासभर बुडवून ठेवाव्यात आणि नंतर फडक्यावर निथळून कोरड्या कराव्यात. मग एक एक मिरची पिठात बुडवून भजी तळावीत. खाताना मिरची तिखट लागत नाही आणि हळदीमुळे मिरचीलाही खमंग चव येते.
- आंब्याची डाळ करण्याची चांगली पद्धत म्हणजे, डाळ 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन मग भिजत घाला. त्यामुळे डाळीचा उग्र वास निघून जातो. डाळीत घालण्यासाठी कैरी एक-दोन तास अगोदर किसा आणि त्याला मीठ लावून ठेवा, म्हणजे कैरीचा आंबटपणा उतरेल. नंतर डाळ वाटून त्यामध्ये ही ओली कैरी घाला. म्हणजे कैरीचा राहिलेला आंबटपणा सगळीकडे लागेल.
- डोसे घालताना तवा निर्लेपचा असला तरी डोसा वाटीला अथवा डावाला चिकटतो. म्हणून डोसे करताना तवा व्यवस्थित तापल्यावर खाली उतरवावा. स्वच्छ फडक्याने पुसावा. त्यानंतर त्यावर डोसा घालून गॅसवर ठेवावा. डोशावर तेल घालावे. तव्याला लावू नये. तवा खाली घेतल्याने आणि पुसल्याने तवा किंचित गार होतो, त्यामुळे डोसा बनवण्याची प्रक्रिया लगेच सुरू होत नाही आणि तव्याला तेल न लावल्याने डोसा चिकटत नाही.
हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी…
- कधीतरी रात्री केलेली मुगाची खिचडी उरते. परत सकाळी खायला सर्वांनाच आवडते असे नाही. तेव्हा कुकरमध्ये परत एकदा ठेवून ती जरा जास्त शिजवून घ्यावी. गार झाल्यावर ती हाताने स्मॅश करावी. त्यात मिरच्या कापून, कोथिंबीर, एखादा बारीक कांदा चिरून आणि एखादा उकडलेला बटाटा बारीक कुस्करून घालावा. बटाटे पराठे करतो त्याप्रमाणे हे सारण भरून पराठे करावेत. अतिशय पौष्टिक आणि रुचकर पराठा लागतो.
- केक करताना मैदा, बेकिंग पावडर एकत्र करून तीन वेळा चाळा. त्यासाठी जमिनीवर वर्तमानपत्राचा कागद अंथरा, कागदापासून अंदाजे दोन-अडीच फूट वर चाळणी धरून हळूहळू चाळा. यामुळे पिठात हवा मिसळते आणि केक चांगला फुगून हलकाही होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी…
- बाजारात मिळतात तसे तिखटमिठाचे मसाला दाणे घरी बनवायला अत्यंत सोपे आणि स्वस्त पडते. साध्या चणाडाळीच्या कोरड्या पिठात तिखट, मीठ, हळद, धणे- जिरे पावडर, ओवा घालावा, नंतर कच्चे शेंगदाणे साधारण भिजतील एवढेच पाणी त्याला लावावे. नंतर तयार केलेले कोरडे डाळीचे पीठ दाण्यांना चोळावे आणि भज्यांप्रमाणे तेलात तळावेत. अत्यंत रुचकर आणि कुरकुरीत दाणे तयार होतात.
- तिखटमिठाच्या पुऱ्यांची कणीक टोमॅटोच्या रसात भिजवावी. त्याला वेगळी चव येते.


