अध्याय पंधरावा
निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः । द्वन्द्र्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥5॥
जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोहमान । वर्षांतीं जैसें घन । आकाशातें ॥285॥ निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवीं सोयरा । तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे ॥286॥ फळली केळी उन्मळे । तैसी आत्मलाभें प्रबळे । जयांची क्रिया ढाळेंढाळें । गळती आहे ॥287॥ आगी लगलिया रुखीं । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसें सांडिलें अशेखीं । विकल्पीं जे ॥288॥ आइकें सकळ दोषतृणीं । अंकुरिजती जिये मेदिनी । तिये भेदबुद्धीची काहाणी । नाहीं जयातें ॥289॥ सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय आपैसी । गेली देहअहंता तैसी । अविद्येसवें ॥290॥ पैं आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेवीं अवचितें । तेवीं निदसुरें द्वैतें । सांडिले जे ॥291॥ लोहाचें सांकडें परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥292॥ अगा सुखदुःखाकारें । द्वंद्वें देहीं जियें गोचरें । तियें जयां कां समोरें । होतीचिना ॥293॥ स्वप्नींचें राज्य कां मरण । नोहे हर्षशोकासि कारण । उपवढलिया जाण । जियापरी ॥294॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हें पाहाणें ऐसें असे वीरा, जैसा न मोडलिया विहिरा
अर्थ
मानमोहरहित, संगरूपी दोष जिंकलेले, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्य स्थिती आहे असे, सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले, सुख व दु:ख नावाच्या द्वंद्वापासून कायमचे मुक्त झालेले असे ज्ञानी त्या अत्त्युच्च पदाप्रद जातात ॥5॥
वर्षाऋतूच्या शेवटी ज्याप्रमाणे ढग आकाशाला टाकून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषाच्या मनाला मोह व मान आपण स्वत: टाकून गेले ॥285॥ ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत. ॥286॥ ज्याप्रमाणे फळाला आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळूहळू (आपोआप) सुटत आहे ॥287॥ ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून (त्या वृक्षावर असलेले पक्षी) जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले (आहे) ॥288॥ अर्जुना, ऐक. ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते. ॥289॥ सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या (पुरुषापासून) अविद्येसह देहाहंता पळून गेली ॥290॥ ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या जीवाला शरीर एकदम टाकून देते, त्याप्रमाणे जे पुरुष अज्ञानात्मक द्वैताकडून टाकले गेलेले आहेत ॥291॥ ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो अथवा ज्याप्रमाणे सूर्याला काळोख सापडत नाही, त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैतबुद्धीचा नेहेमी दुष्काळ असतो ॥292॥ अरे अर्जुना, सुखदु:खरूपी द्वंद्वे, जी या देहांत अनुभवास येतात, ती ज्या पुरुषांच्या समोर येतच नाहीत. ॥293॥ ज्याप्रमाणे जागे असता स्वप्नांतील राज्यप्राप्ती अथवा मरण ही आनंदास व दु:खास कारण होत नाहीत, असे समज. ॥294॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आणीकही एक तया, वोळखण असे धनंजया


