मागील तीन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील मुक्त व्यवसाय या विषयाची खेळगट, शिशुगट आणि बालगट या वर्गांसंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्तव्यवसाय या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत.
बालशाळेतील हस्तव्यवसाय
हस्तव्यवसाय हा बालशाळेतील मुलांचा खूप आवडीचा विषय असून मुलं शाळेत रमण्यासाठी याचा खरोखरच चांगला उपयोग होतो. आधी सांगितल्याप्रमाणे स्थूलाकडून सूक्ष्माकडे या तत्वाचा अवलंब या विषयात देखील करण्यात येतो.
हस्तव्यवसायात विविध उपक्रमांचा समावेश होतो :
कागदकाम (ओरिगामी)
या विभागात फाडकाम, चुरगाळाकाम आणि घडीकाम यांचा समावेश होतो.
ठसेकाम
या विभागात शिक्षिका वहीवर चित्रे काढून देतात. ठसेकामासाठी रंगीत शाई तसेच वेगवेगळे रंग वापरले जातात.
चित्रकला
यात चित्रे काढणे आणि रंगविणे यांचा समावेश होतो.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : मुक्त व्यवसाय
आता आपण खेळगटातील हस्तव्यवसाय याबाबत जाणून घेऊयात.
कागदकाम
कागदकामातील फाडकाम याबद्दल आपण मुक्त व्यवसायात जाणून घेतले आहेच. खेळगटातील कागदकामासाठी अगदी सोपी कृती द्यावी लागते. समजा त्यांना घडी घालायला शिकवायची असेल तर, मुलांना चौरसाकृती कागद द्यावेत. यासाठी हस्त व्यवसायाचे कागद वापरतात. या कागदाची एक बाजू पांढरी असून दुसरी बाजू रंगीत असते. कागदाच्या पांढऱ्या बाजूवर मध्यभागी पेन्सिलीने तुटक रेषा काढावी, म्हणजे मुलांना या रेषेवर घडी घालता येईल. कागदाची घडी घालणे वरकरणी सोपे वाटत असले तरी, खेळगटातील मुलांसाठी हे अवघड असते. परंतु सरावाने मुलांना घडी घालायला जमते. नंतर मुलांना घडी घातलेल्या रेषेवर बोटाने दाब देऊन घडी पक्की करायला शिकवावे.
ठसेकाम
ठसेकाम करायला देताना कागदावर एक साधेसोपं चित्र काढावे. उदाहरणार्थ – गोल, चौकोन, त्रिकोण इत्यादी. मुलांना शिक्के आणि स्टॅम्पपॅड देऊन कागदावरील चित्रात ठसे द्यायला शिकवावे.
चित्रकला
चित्र काढणे – खेळगटातील मुलांना गोल, अर्ध गोल, त्रिकोण आणि चौकोन असे आकार काढायला शिकवावे. मुलं गोल, अर्ध गोल काढायला शिकली की, त्यांना अक्षरे आणि अंक काढायला सोपे जाते.
चित्र रंगवणे – खेळगटातील मुलांना आपली चित्रे एका विशिष्ट पद्धतीने रंगवायला शिकवावे. असे करताना रंग रेषेबाहेर जाणार नाहीत ही काळजी घेण्यास शिकवावे. सरावाने मुलं हळूहळू चित्रं काढायला तसेच रंगवायला शिकतात.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटासाठी मुक्त व्यवसाय
खेळगटातील मुलांना हस्त व्यवसायातून मेंदू, डोळे आणि हात यांचा समन्वय साधण्याचे बाळकडू मिळते. त्याबरोबरच मुलांना स्वनिर्मिताचा आनंद मिळतो तसेच त्यांच्या सृजनशीलतेचा विकास होण्यास सुरुवात होते.
पुढील लेखात आपण शिशुगटातील हस्त व्यवसाय या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
क्रमश:


