मागील लेखात आपण बालशाळेतील अभ्यासक्रमाची रुपरेषा आणि त्यातील समाविष्ट विषय याबाबत सविस्तर माहिती घेतली. आता आपण बालशाळेतील अभ्यासक्रमातील एकामागोमाग एक विषयांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासाची सुरुवात आपण ‘मुक्त व्यवसाय’ हा विषय घेऊन करुयात.
मुक्त व्यवसाय म्हणजे काय?
सोप्या भाषेत सहज समजेल अशा पद्धतीने सांगायचे झाल्यास मुक्तव्यवसाय म्हणजे असे व्यवसाय जे मुलं त्यांच्या मनात येईल तसे आणि त्या पद्धतीनुसार करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलं मुक्त व्यवसाय करत असताना शिक्षिकेने मार्गदर्शन करायचे नसते, मात्र तिने मुलांवर बारीक लक्ष ठेवणे अपेक्षित असते. मुलं मनात येईल तसं, त्यांना दिलेले विविध व्यवसाय पूर्ण करत असतात. मुलं वर्गात एकमेकांशी खेळत असतील तर, ती भांडण-मारामारी न करता गोडीगुलाबीने खेळतात ना, हे शिक्षिकेने बघायचे असते.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रमाची रुपरेषा
मुक्त व्यवसायाचे स्वरूप
मुक्त व्यवसायामधे सर्वसाधारणपणे खालील बाबींचा अंतर्भाव होतो :
- फाडकाम
- चुरगळा काम
- माती काम
- मणी ओवणे
- फुले ओवणे
- फळ्यावर चित्र काढणे.
- मनोरा लावणे.
- चेंडूशी खेळणे.
वरील विविध खेळांवरून मुक्त व्यवसायाचे स्वरूप लक्षात येते.
खेळगटातील मुक्त व्यवसाय
खेळगटातील मुलांसाठी फाडकाम, चित्र काढणे, चेंडूशी खेळणे अशा सोप्या खेळांचा मुक्त व्यवसायात समावेश करता येईल.
फाडकाम करताना सुरुवातीला जुनी वर्तमानपत्रे उपयोगी पडतात. नंतर रंगीत पतंगी कागद मुलांना फाडकामासाठी देता येतात. खेळगटाच्या वयोगटातील मुलांना फाडकाम खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या मनावरील ताण हलका होतो. (जसं की भांडी घासताना गृहिणींच्या मनावरील ताण हलका होतो.)
तसेच, मुलांना फाडकाम करताना अंगठा, पहिले आणि दुसरे बोट यांचा उपयोग करण्यास शिकवावे. यामुळे मुलांना बोटांच्या स्नायूंचे नियंत्रण करणे शक्य होते. आपण लिहिण्यासाठी याच तीन बोटांचा वापर करतो… आणि लेखनाची पूर्वतयारी ती हीच, ही गोष्ट लक्षात आलीच असेल.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा आणि वर्ग सजावट
सुरुवातीला कागदाचे मोठमोठे तुकडे करणारी मुलं लहान-लहान तुकडे करायला शिकतील. हे कागदांचे तुकडे टाकून न देता एका मोठ्या पांढर्या किंवा रंगीत कार्डशीटवर वेगवेगळे आकार काढून मुलांना चिकटवायला शिकवावे. सुरुवातीला शिक्षिकेने तुकडे चिकटवून दाखवावेत. मुलं बघून हळुहळु शिकतील. ही चित्रे वर्गात लावून ठेवावीत. आपली कलाकृती वर्गात ठेवलेली पाहून मुलांना खूप आनंद होतो.
मुलांना फळ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रेघोट्या मारायला नेहमीच आवडते. यातूनच मुलं स्वतःच्या कल्पनेने चित्र काढतात आणि त्याला नावही देतात. मुलांच्या अशा कलाकृतींचे शाळेत तसेच आपणही कौतुक करणे गरजेचे आहे.
मुलं जेव्हा चेंडूशी खेळतात, तेव्हा त्यांचे हात आणि डोळे यांचा समन्वय साधण्यास सहाय्य होते.
मुक्त व्यवसायातून खेळगटातील मुलांच्या विविध कौशल्याचा विकास होण्यास आरंभ होतो. पुढील लेखात आपण शिशुगट आणि बालगट या वर्गांसाठी मुक्त व्यवसाय या विषयासंबंधीत माहिती घेऊयात.
क्रमश:


