माधवी जोशी माहुलकर
खरंतर शेगाव कचोरीचे सारण हे इतर कचोऱ्यापेक्षा (जसे मूगडाळ कचोरी, प्याज कचोरी, मटर कचोरी) वेगळे असते. शेगावच्या तीरथराम शर्मांची जी कचोरी आहे, तिची बातच निराळी! त्यांचे जे वंशज आहेत भूपेश शर्मा त्यांच्याकडे रोजच्या सुमारे अडीच हजार कचोऱ्या तयार होतात… 20 किलो मैदा याकरिता वापरला जातो. काय खप असेल नाही या कचोरीचा!! तीरथराम शर्मांच्या या कचोरीच्या सारणात आणि मसाल्यात ते वारंवार बदल करत असतात; परंतु ते नेमके काय असतात, त्याबाबत शर्मा बंधू किंवा त्यांचे कामगार याबाबतीत ताकास तूर लागू देत नाही. आता मला माहीत असलेल्या शेगाव कचोरीची रेसीपी देते…
साहित्य
- मैदा – 4 वाट्या
- कणीक – 2 वाट्या
- बेसन – 4 वाट्या
- हिरव्या मिरच्या – 4 ते 5
- लसूण – 4-5 पाकळ्या
- बारीक चिरलेली कोथिंबीर – मूठभर
- आले – 1 इंच
- धणे – 1 चमचा
- जिरे – 1 चमचा
- बडीशेप – 1 चमचा
- मीठ – चवीनुसार
- हळद – 1 चमचा
- तिखट – दोन ते अडीच चमचे
- गरम मसाला – 1 चमचा
- हिंग – 1 लहान चमचा
- आमचूर पावडर – अर्धा चमचा
- साखर – चिमूटभर
- तेल – तळणासाठी
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात
कृती
- प्रथम मैदा, कणीक, किंचित मीठ एकत्र करावे आणि त्यामध्ये तेलाचे मोहन घालून लागेल तसे पाणी वापरत घट्टसर मळू घ्यावे. नंतर ते 10-15 मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
- हिरव्या मिरच्या, लसूण, आले आणि कोथिंबीर यांचा जाडसर ठेचा करून ठेवावा.
- बडीशेप, धणे यांचीही जाडसर पूड करून ठेवावी.
- कढईत एक पळीभर तेल टाकून ते तापले की, जिरे टाकून त्यामध्ये एक चमचा हिंग टाकावा.
- नंतर त्यात मिरची, लसूण, आले आणि कोथिंबीरीचा ठेचा टाकून तो परतून घ्यावा.
- लगेचच धणे, जिरे आणि बडीशेप यांची भरड टाकावी.
- नंतर हळद, तिखट टाकून ते तेलावर परतुन घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, आमचूर पावडर आणि साखर टाकावी.
- लगेच यामध्ये बेसन घालून ते या मसाल्यात छान परतून घ्यावे. थोडे पाणी शिंपडून बेसन एकसारखे करावे.
- बेसन छान खमंग भाजून झाले की गॅस बंद करून ते एखाद्या वाटीने मऊ होईपर्यंत रगडावे; जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाहीत. असे केल्याने बेसनाचा छान गोळा तयार होतो.
- हे सारण थंड होईपर्यंत भिजवलेल्या मैद्याला एकदा तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत.
- आता या गोळ्यांची थोडी जाडसर पुरी लाटून त्यामधे बेसनाचे सारण भरावे आणि हलक्या हाताने चारही कडा दाबत कचोऱ्या लाटून घ्याव्यात.
- कढईत तेल तापल्यावर मंद आचेवर लालसर होईपर्यंत या कचोऱ्या तळून घ्याव्यात.
हेही वाचा – Recipe : नागपूरची खासियत… तर्री पोहे
टीप
- बेसन भाजताना पाण्याचा अगदी किंचित वापर करायचा आहे. पाणी फक्त बेसन मऊ होण्याकरिता वापरायचे आहे.
- आमचूर पावडर आणि साखर ऐच्छिक आहे.
एकूण कालावधी – एक तास
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


