माधवी जोशी माहुलकर
भातावरचे पिठले हा एक भन्नाट स्वादिष्ट पदार्थ आहे. ‘वन पॉट मिल’ या संकल्पनेत हा पदार्थ चपखल बसतो. कमीत कमी वेळेत पोटभर आणि चविष्ट पदार्थ काय करता येईल, याचे उत्तर शोधतानाच अशा ‘वन पॅाट मिल’ असलेल्या बिर्याणी, गोळाभात, वडाभात, खिचडी, दाल खिचडी इत्यादी पदार्थांचा शोध लागला असावा. ‘भातावरचे पिठले’ हा देखील त्यापैकीच एक. चला तर मग जाणून घेऊया हा पदार्थ कसा तयार करायचा ते!
साहित्य
- तांदूळ – 1 वाटी
- बेसन – अर्धी वाटी
- हिरव्या मिरच्या – 2-3
- आलं – 1 इंच
- लसूण – 4 ते 5 पाकळ्या
- कोथिंबीरी – 1 वाटी
- कांदा – 1 (मध्यम आकाराचा)
- तिखट – दोन ते अडीच चमचे
- मीठ – चवीनुसार
- हळद – 1 चमचा
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- हिंग – चिमुटभर
- तेल – अर्धा पळी
पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी
तयारीला लागणारा वेळ – तयारीसह अर्धातास
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात
कृती
- तांदूळ स्वच्छ धुवावेत. त्यानंतर तांदळाच्या अडीचपट म्हणजे एक वाटी तांदळाला अडीच वाट्या पाणी घालून भात एका मोकळ्या भांड्यात शिजायला ठेवावा. (भात मऊसर शिजवावा लागतो.)
- भात शिजेपर्यंत आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची जाडसर पेस्ट करून घ्यावी.
- एक भांड्यात अर्धी वाटी बेसन घेऊन त्यात तयार केलेली पेस्ट, हळद, तिखट, मीठ आणि हिंग टाकावे. हे बेसन सरसरीत भिजवून घ्यावे.
- आता भातावरील ताटली काढून भातामधील पाणी कमी झाले असेल आणि भाताची शिते शिजली असतील तर त्यावर बेसनाचा घोळ गोलाकार पसरवून टाकावा आणि त्यावर ताटली ठेवून मंद आचेवर भातासह बेसन शिजू द्यावे.
- एका कढईत अर्धी पळी तेल घालून ते तापले की, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग टाकून हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतवून घ्यावेत. त्यानंतर लगेच चिरलेला कांदा घालून तो गुलाबीसर झाला की, अगदी चिमूटभर हळद घालावी आणि ही फोडणी भातावरच्या पिठल्यावर टाकून एखादा मिनिट त्या भाताला वाफ येऊ द्यावी.
- एका मिनिटाने भातावरची ताटली काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.
- अशा प्रकारे केवळ दहा मिनिटात ‘भातावरचे पिठले’ हा अप्रतिम चवीचा पदार्थ तयार होतो.
हेही वाचा – Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…
टीप
- या पिठल्याकरता बेसनाचा घोळ तयार करताना पाण्याऐवजी ताकही वापरू शकता.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.