Saturday, August 2, 2025

banner 468x60

HomeअवांतरTechnology Vs Manpower : तंत्रज्ञान वापराबाबत स्वनियमनाची गरज

Technology Vs Manpower : तंत्रज्ञान वापराबाबत स्वनियमनाची गरज

शैलेश विजया सोमनाथ महाजन

मागील लेखात आपण पौराणिक काळातील भस्मासुर राक्षस आणि आधुनिक काळातील अद्यावत तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीचा भस्मासुर राक्षस म्हणजे काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखात थोडे पुढे जाऊयात.

अद्ययावत भस्मासुर म्हणजे, कॅलक्युलेटर आल्यावर बेरीज आणि वजाबाकी करण्याची, पाढे पाठ करण्याची आपली बुद्धीची क्षमता भस्म झाली. अद्यावत तंत्रज्ञान आले आणि मानवाची शारीरिक कामे करण्याची क्षमता नष्ट होत चालली. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबिटीस यासारख्या असुरांची देखील संख्या वाढू लागली.

त्यात मोबाईल हा एक मोठा भस्मासुर आला. त्याने तर जवळ जवळ एक पिढी भस्मसात केली आणि त्यातून पुढील पिढीचे तर काही खरे नाही, असे म्हणावे लागेल. जसे लिफ्टच्या अतिवापराने आपण पायऱ्या चढणे-उतरणे कमी केले आणि गुडघ्याचे आजार वाढले. त्याचप्रकारे टीव्हीमुळे माणसे दुरावली. अद्ययावत यंत्रांनी आणि आधुनिक तंत्रज्ञानाने, बेरोजगारी वाढली, नोकऱ्यांची संख्या कमी झाली. काही व्यवसाय डबघाईला आले. आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी छोटी-मोठी उदाहरणे आपल्याला दिसतील.

हेही वाचा – Technology Vs Manpower : तंत्रज्ञानाचा भस्मासुर

या अद्ययावत भस्मासुरांनी आपले किती प्रचंड नुकसान केले आहे आणि करत आहे,  याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना नाही. भूतलावरील सर्व प्राण्यांमध्ये मानव हा असा प्राणी आहे, ज्याला बुद्धीचे वरदान आहे, बुद्धीची वेगळी क्षमता आहे. पण आधुनिक भस्मासुर आपल्या बुद्धीवर पण आरूढ झालेला आपल्याला दिसतो. तसे पूर्वी आपले फोन नंबर पाठ असत, आता? अशी बरीच उदाहरणे आहेत. ती येथे देत बसत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात आपणच विचार करा? की आवश्यकता नाही अशा कितीतरी ठिकाणी या आधुनिक भस्मासुराचा वापर आपण करतो आणि आपली क्षमता हळूहळू गमावून बसत आहोत.

हा भस्मासुर कसे कार्य करतो? ते आपण खालील गोष्टीरूपी उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करुयात.

एकदा सकाळी राजा शिकारीला जंगलात जातो. खूप आत जंगलात जाऊन देखील त्याला शिकार मिळत नाही. दुपार होते राजाला भूक लागते, जंगलातील फळे खाऊयात, या विचाराने राजा झाडावरील एक दोन फळे पाडतो. तेव्हा तिथे झाडावर बसलेले एक माकड हे सर्व पाहते आणि पटापट झाडावरील चार-पाच फळे तोडून राजाकडे फेकते. राज खुश होतो आणि आनंदाने ती फळे खातो. शेवटी माकडच त्या झाडावरील अजून फळे तोडून राजाकडे फेकते. आता राजा माकडावर आणखीन खुश होतो. जंगलातून परत निघताना राजा माकडाला आपल्याबरोबर राजवाड्यात नेतो. आपली सरबराई पाहून माकडही हरखून जाते. राजवाड्यात विविध करामती करून दाखवते. राजाचेच माकड ते! त्याला संपूर्ण राजवाड्यात कुठे जाण्यास मज्जावच नसतो. राजा विश्रांती घेत असेल तिथे, राजा झोपला असेल तर ते माकड त्याच्या शयन कक्षात येऊन बसत असे.

एके दिवशी राजा झोपलेला असताना एक माशी राजच्या नाकावर बसते. माकड ती राजच्या नाकावरील माशी पाहतो आणि जवळच राजाची तलवार ठेवलेली असते, ती तलवार घेऊन राजच्या नाकावर बसलेल्या माशीवर जोरदार प्रहार करतो. माशी उडून जाते, पण तलवारीच्या वारामुळे राजा मृत्युमुखी पडतो.

ही अशी एक गोष्ट आहे, जी आपल्या बरेच काही सांगून जाते. या गोष्टीतील राजा म्हणजे आधुनिक काळातील राज्यकर्ते किंवा अधिकारी वर्ग, जो जनतेसाठी विविध धोरणे ठरवितो, राबवतो. जो आधुनिक तंत्रज्ञान आणि उपलब्ध मानवीय कार्यशक्ती (मॅनपॉवर) याचे योग्य नियोजन करू शकतो.

हेही वाचा – या ‘तरुणां’च्या कार्यशक्तीचा देखील विचार व्हावा!

झाडावरील फळे म्हणजे आपण भौतिक सुखासाठी, आळसासाठी गरज नसताना जे सहज उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान आहे, त्याचा अतिवापर करतो. माकड म्हणजेच तंत्रज्ञान, जे आपल्याला आळशी करते. आपल्यातील शारीरिक, मानसिक (बौद्धिक) आणि आर्थिक क्षमता नष्ट करते.

पण आपण हे सर्व टाळू शकतो का?

एकदम टाळू शकत नाही. पण याचे जर योग्य नियोजन आणि समाज जागृती केली तर आपण आपल्या पुढील पिढ्या या आधुनिक भस्मासुरापासून नक्कीच वाचविण्यास मदत करू शकतो. काळाच्या बरोबर राहण्यासाठी आधुनिकतेचा पुरस्कार करावाच लागेल, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी स्वत:हून नियमन केले पाहिजे. याची सुरुवात कुठे तरी झाली पाहिजे, म्हणून हा लेख प्रपंच.

समाप्त

(मोबाइल नंबर – 9322755462)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!