शैलेश विजया सोमनाथ महाजन
देश घडविताना, समाज घडविताना आपण नेहमी तरुणांच्या कार्यशक्तीचा विचार करत असतो. तरुणशक्ती ही देशाची खरी शक्ती आहे. यावर देशाची सक्षमता अवलंबून असते, असे म्हणतात. पण, देशातील किती तरुणवर्ग, आपल्या कार्यशक्तीचा वापर, समाजासाठी, देशासाठी करतात?
तथापि, आज मी इथे एक वेगळ्या कार्यशक्तीचा वापर, देशासाठी समाजासाठी कसा करून घेता येईल? या बाबतचे मत मांडत आहे. ही सक्षम पण दुर्लक्षित कार्यशक्ती म्हणजे साधारण 60 ते 70 वयोगटातील व्यक्तींची! आपण म्हणाल, हे म्हातारे? परंतु, शांतपणे विचार करा आणि उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला या वयोगटातील माणसांचे अवलोकन करा. काय आपण यांना म्हातारे किंवा वयोवृद्ध म्हणू शकतो? नाही.
खरे पाहिले तर, या वयोगटातील व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असतात. साधारणपणे ज्या व्याधी, त्रास चालू होतो, ते वय वर्षे 70 नंतरच. पण आपण आपले उगाच 60 वर्षे झाली की, अशा सक्षम व्यक्तींना, म्हातारे, वयोवृद्ध म्हणायला सुरुवात करतो!
खरोखर तपासून बघा, मी म्हणतो त्या वयोगटातील 80 ते 90 टक्के व्यक्ती या टुणटुणीत, खणखणीत, कणखर, सक्षम, आनंदी गोपाळ असतात. वाटल्यास, 60 ते 70 वयोगटातील व्यक्तींना थेट विचारून बघा?… तुम्ही म्हातारे झाले आहात का? कूचकामी आहात का?
मान्य करतील का ते?
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
आपल्या समाज व्यवस्थेनुसार, आपण या अशा सक्षम व्यक्तींना उगीच अडगळीत टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यांना म्हातारे, अक्षम समजतो… आणि आपल्या समाज व्यवस्थेनुसार ते सुद्धा हे स्वीकारतात. त्यातून मग ते एक वेगळेच असे, मन मारून रिटायर्ड आयुष्य जगू लागतात. त्यांनाही समजत असते, कळत असते, “अरे बाबांनो, मी अजून इतका म्हातारा झालेलो नाही! मला अडगळीत टाकण्याचा प्रयत्न करू नका; मी अजून सक्षम आहे.” पण त्यांचा आवाज ऐकतो कोण?
काय खरं आहे ना, मी काय म्हणतो ते?
म्हणून म्हणतो ही वेगळी अशी कार्यशक्ती देशासाठी, समाजासाठी वापरली गेली पाहिजे. त्याचा योग्य असा वापर करून घेतला पाहिजे. या वयोगटातील बरीच मंडळी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. प्रत्येक काम पैशांसाठीच करायचे, अशी त्यांना अजिबात गरज नसते. आजकालच्या भाषेत ते ‘फायनान्शिअल साऊंड’ असतात. मग शारीरिक आणि मानसिक क्षमता असली तरी, ते आपला टाइमपास शोधत असतात. त्यांच्यात असलेली शक्ती ते उगीच वाया घालवत असतात.
अशी ही देशव्यापी सामूहिक, अदृश्य अशी कार्यशक्ती जर देशाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेता आली तर? त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर करून घेता आला तर?
हेही वाचा – सदाफुली… आयुष्यातील सुख
यावर सरकारने, सामजिक संस्थांनी किंवा इतर जे कोणी या विषयावर कार्य करतात त्यांनी तसेच ज्येष्ठ नागरिक संघांनी आणि इतरांनी विशेष लक्ष देऊन काम केले पाहिजे, संशोधन केले पाहिजे! आणि अशी ही लपलेली 60 ते 70 वयोगटातील अफाट कार्यशक्ती समाजकार्याच्या, देशकार्याच्या मुख्य प्रवाहात आणली पाहिजे!
विशेष म्हणजे, ही सर्व 60 ते 70 वयोगटातील कार्यशक्ती ऐच्छिक स्वरूपाची असेल. यासाठी या वयोगटातील व्यक्ती विचार करू शकतात. वैयक्तिकरीत्या कार्यक्षमता देशासाठी, समाजासाठी वापरू शकतात, असे माझे प्रामाणिक मत आहे. माझ्या मनात ज्येष्ठांबद्दल आदर आहे, योग्य सन्मान आहे. पण प्रश्न देशाच्या आणि समाजाच्या कार्यशक्तीचा आहे. त्यादृष्टीनेही विचार व्हावा!
माझा लेख, मत आवडले तर नक्की शेअर करा…. ही तर सुरुवात आहे.
(लेख लिहिताना महिला आणि पुरुष अशा दुहेरी कार्यशक्तीचा विचार केला आहे, याची विशेष नोंद घ्यावी.)
मो. : 9322755462