कुमार चोप्रा / सुनील इनामदार
सकाळी उठल्यापासूनच आपल्या डोक्यात ऑफिसच्या कामांची यादी सुरू होते. घरातील कामं आवरून ऑफिसला पोहोचेपर्यंत आज दिवसभरात कोणती, किती कामं पूर्ण करायची याचं नियोजन मनात सुरू असतं.
ऑफिसमध्ये पोहोचल्यावर लगेच कामाला सुरुवात होते. कामाच्या गडबडीत अनेकदा पाणी प्यायचंही भान राहत नाही! कधी कामाचा इतका लोड असतो की, दुपार झाली आणि जेवणाची वेळ झाली, हेही लक्षात येत नाही. सतत खुर्चीत बसल्यामुळे डोळे, हात, पाठ आणि मान यांच्यावर ताण येतो आणि शरीराला शीण जाणवतो.
हा शीण घालवण्यासाठी आपण चहा-कॉफी किंवा कँटीन ब्रेक घेतो. पण त्याऐवजी काही सोप्या आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास अधिक फ्रेश वाटण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा – वयोमानानुसार रोज किती चालावे?
डोळ्यांना छोटा ब्रेक द्या
- सतत लॅपटॉप किंवा मोबाइलच्या स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो.
- ठराविक वेळाने स्क्रीनपासून नजर दूर करा.
- काही क्षण डोळे मिटून विश्रांती द्या.
- जवळच्या वस्तूपासून दूरच्या वस्तूकडे नजर वळवा.
- डोळ्यांची हालचाल हळूवारपणे वर-खाली आणि डावीकडे-उजवीकडे करा.
डोळ्यांना नियमित विश्रांती देणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येक ब्रेकमध्ये चहा-कॉफी आणि जंक फूड नको!
कामाचा कंटाळा आला की आपण चहा-कॉफीसाठी मित्रांसोबत कँटीनमध्ये जातो. पण त्यासोबत बिस्किटे, तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खाण्याची सवय लागते. त्याऐवजी शक्य असल्यास —
- एखादे फळ
- मूठभर दाणे/ नट्स
- पौष्टिक स्नॅक
- पुरेसे पाणी
यांचा पर्याय निवडा.
छोटा ब्रेक + योग्य स्नॅक = शरीराला आणि मनाला फ्रेश ठेवण्यास मदत!
हेही वाचा – रक्तदाब कमी झालाय… कसे ओळखायचे?
काही मिनिटे श्वसन आणि अन्य हलका व्यायाम करा
- कामाच्या मधे काही मिनिटांचा ब्रेक घ्या.
- खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा.
- खुर्चीत बसून मान, खांदे आणि हात हलके स्ट्रेच करा.
- शक्य असल्यास थोडे उभे राहा आणि चालून या.
- आपल्या क्षमतेनुसार सोपे स्ट्रेचिंग किंवा योगासने करा.
यामुळे शरीरातील ताण कमी होण्यास आणि मन अधिक रिलॅक्स वाटण्यास मदत होऊ शकते.
लक्षात ठेवा!
काम महत्त्वाचे आहे, पण आरोग्य त्याहूनही महत्त्वाचे आहे! दिवसभर काम करताना छोटे-छोटे ब्रेक घ्या, पाणी प्या, पौष्टिक आहार घ्या, शरीराची हालचाल ठेवा आणि मनालाही थोडी विश्रांती द्या.
(सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)
संपर्क – 9150014545


