उत्तरार्ध
इंजिनीअरिंग पूर्ण झाले आणि कॅम्पसमधून बेंगलोरमधील कंपनीत माझी निवड झाली. आईबाबा नर्व्हस झाले, पण माझा बेंगलोरला जायचा निर्णय पक्का होता. एकतर बेंगलोर आयटीचे मुख्य केंद्र बनत होते. त्यामुळे बेंगलोरमध्ये एक से एक हुशार माणसे जमा झाली होती. दुसरं म्हणजे, बेंगलोरमध्ये पुढील शिक्षणासाठी चांगली सोय होती…
मी बेंगलोरला आलो. कंपनीने जागा दिली होती. कंपनीत जीव तोडून काम केले. पदोन्नती मिळत होती. मुंबईला सहा महिन्यानंतर जात होतो. इकडे मुन्नी आणि मिता ग्रॅज्युएट झाल्या. मुन्नीला संस्कृतमध्ये पीएचडी करायची होती म्हणून तिने पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतली. मिता अभ्यासात यथातथाच होती. ग्रॅज्युएशननंतर तिने शिक्षण थांबविले आणि तिच्या आवडत्या कथक नृत्यामध्ये तिने जीव झोकून दिला.
मी बेंगलोरमध्ये आणि मुन्नी पुण्याला… बाबा नेहमीप्रमाणे त्यांच्या व्यवसायात… आई घरी एकटी पडली होती… पण मिता सकाळ-संध्याकाळ घरी येऊन सर्वकाही पाहात होती. आईला घेऊन बाजारात जाणे, डॉक्टरकडे जाणे, बारीकसारीक सर्व गोष्टी मिताच पाहत होती. मिता आईजवळ येऊन जाऊन असते म्हणून मी आणि मुन्नी निर्धास्त होतो. मी मुंबईत आलो की, मिता तिच्या क्लासची वेळ सोडून आमच्या घरी येत होती. माझ्या आवडीचे पदार्थ घरात शिजत होते. माझ्या खोलीत आवडती पुस्तके, कॅसेट ठेवली जात होती. पण मी मुंबईत जास्त काळ राहू शकत नव्हतो. आत फक्त एक वर्ष… एमबीए पुरे करावे आणि मिताला लग्नाचे विचारावे… मी तिचा होकार गृहित धरला होताच, पण…
काल मी मुंबईत आलो, आणि आईने मिताच्या लग्नाची बातमी सांगितली… मी सटपटलो.
हेही वाचा – मिता आवडत होती, पण…
मिताला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून आतापर्यंतचा काळ संपूर्ण रात्रभर चित्रपटासारखा समोर येत होता. या कुशीवरून त्या कुशीवर होत, रात्रभर जागा होतो. आयुष्याची जोडीदार म्हणून मिताशिवाय कुणाचा विचारच केला नव्हता. आता पुढे काय? माझं मन समजणारी मिता म्हणजे मिताच. तिची जागा दुसरी कुणीच घेऊ शकत नाही.
सकाळी चहा घेताना आई माझ्याकडे पाहून म्हणाली, “अरे वल्लभ, चेहरा असा काय? डोळे किती लाल! रात्रभर झोपला नाहीस की काय? काल मिताच्या लग्नाची बातमी ऐकलीस तेव्हापासून तू बेचैन झालास. अरे, गोष्टी वेळच्यावेळी कराव्यात रे. मग पश्चाताप करून काय उपयोग?”
चहा घेऊन मी उठलो आणि बाहेर जायची आवराआवर करू लागलो. तेवढ्यात बेल वाजली. आईने दरवाजा उघडला… “अगं मिता, ये ये आत. मुन्नीने बातमी कळविली, पण तू केव्हा सांगणार म्हणून वाट पाहत होते… बस, बस… वल्लभ आलाय काल. आठ दिवसांची रजा घेऊन आलो म्हणाला, पण काल रात्री म्हणाला, उद्या रात्री म्हणजे आजच्या रात्रीच्या विमानाने निघणार. इथे आल्यानंतर काहीतरी बिनसलं त्याचं.”
मी माझ्या खोलीतून आईचे बोलणे ऐकत होतो. ‘‘तुम्हाला आधी कळविले नाही… मुन्नीच्या आई राग मानू नका, सारे कसे अचानक झाले.’’ मिताचा रडवेला आवाज मला ऐकू आला. ‘‘मावशीने माझ्या आईला तिच्या पुतण्याबद्दल विचारले. तो ऑस्ट्रेलियाहून आलाय आणि लग्न करूनच जाणार म्हणाली, आईबाबा एवढे खूश झाले की, मला ‘हो’ ‘नाही’ विचारण्याची संधी न देता सर्व काही ठरवून मोकळे झाले. माझा काही निर्णय होत नव्हता, तोपर्यंत लग्नाची तारीख, हॉल सर्वकाही ठरवून झाले.’’
आता मिताचे हुंदके मला स्पष्ट ऐकू येत होते. मला काय वाटले कोण जाणे… तिरमिरीत खाड्कन माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. मुख्य दरवाजाजवळच आई आणि मिता बोलत होत्या. रडवेली मिता मला पटकन सामोरी आली. तिच्याकडे दुर्लक्ष करुन मी आईला म्हणालो, “आई मी बँकेत जातो.”
बाहेर पडणार एवढ्यात आई म्हणाली, “अरे वल्लभ, मिता तिच्या लग्नाचे सांगायला आली रे…”
मी चटकन मागे आलो आणि जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहून ‘‘अभिनंदन’’ म्हणालो, आणि धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडलो. बाहेर आलो. पोर्चमध्ये जाऊन किल्लीने गाडीचा दरवाजा उघडला. आत बसलो. गाडीचा दरवाजा, खिडक्या सर्व बंद केल्या आणि स्टिअरिंगवर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडू लागलो.
मिता
धाड्कन दरवाजा बंद करुन वल्लभ बाहेर चालता झाला. मला माझे अश्रू आवरतच नव्हते. मुन्नीच्या आईने मला जवळ घेतले… “योग्य वेळी मन मोकळं करावं गं मिता. एकदा वेळ सटकली की, हळहळण्याशिवाय हातात काही राहत नाही.” माझं रडू काही आवरत नव्हतं. शेवटी मुन्नीच्या आईला, ‘येते’ म्हणून परत निघाले. आता कसला निर्णय घेण्याची क्षमता आहे का माझ्यात? बाबा कालपासून आमंत्रणे द्यायला नातेवाईकांकडे जाऊन आलेसुद्धा. वल्लभने आणि वल्लभच्या आईने पुढाकार घ्यायला नको?
चार दिवसापूर्वी पाहून गेलेला मावशीचा पुतण्या विनोद आठवला. खरंच, त्याच्यात काहीच दोष नव्हता. सुशिक्षित, उमदा, देखणा, स्थिरस्थावर सर्व काही उत्तम. पण वल्लभ….
कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मुन्नीची ओळख झाली आणि तिच्या बडबड्या स्वभावामुळे ती मैत्रीणच झाली. एक दिवस ती फार आनंदात होती, म्हणाली, माझ्या दादाला व्हीजेटीआयमध्ये अॅडमिशन मिळाली. मला म्हणाली – “तू चल आमच्या घरी.” मी तिच्या घरी जायला निघाले. तिच्या दादाचे कसे अभिनंदन करावे? असा विचार करताना कॉलेजच्या आवारात पिवळ्या गुलाबाची कळी दिसली. कोणी पाहात नाही, हे पाहून हळूच ती खुडली आणि पर्समध्ये टाकली. मुन्नीच्या घरी गेलो तर, मुन्नीची आई आणि भाऊ खुर्चीवर बसून कॉफी पित होते. मुन्नीच्या भावाकडे मी पाहात राहिले. अनोळखी तरुण मुलाकडे सतत पाहू नये, हे माहीत असूनही त्याच्यावरून नजर हटवू नये, असे वाटत होते. विलक्षण आकर्षण होते त्याच्यात. सरळ नाक, गोरा रंग, चेहर्यावर हुशारीची लकाकी आणि हसतमुख…
मी पर्स उघडून गुलाबकळी बाहेर काढली आणि हळूच त्याच्या समोर धरली. त्याने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि गुलाबकळी घेण्यासाठी हात पुढे केला. माझ्या बोटांना त्याच्या बोटांचा ओझरता स्पर्श झाला… सारं शरीर थरारलं. पुरुषांचा स्पर्श घरीदारी होतच असतो. पण शरीरात अशी स्पंदने झाल्याचे कधी जाणवले नाही. मुन्नीच्या दादात काहीतरी विलक्षण जादू होती खरी…
मग मी त्या घरी कधी मुन्नीसोबत, तर कधी एकटी जातच राहिली. मुन्नीचा दादा नेहमी कॉलेजात किंवा घरी असेल तेव्हा त्याच्या खोलीत बंद दाराआड अभ्यास करत असायचा. मला आता पक्के माहीत झाले होते, त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असेल तर तो घरी आहे, आणि त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा असेल, तर समाजवं तो घरी नाही.
मुन्नीच्या घरचं वातावरण मला आवडायचं. सर्वजण प्रेमळ आणि एकमेकांची थट्टा-मस्करी करत रहायचे. मुन्नीचे बाबा फक्त रविवारी घरी असायचे. पण घरी असले की, दोन्ही मुलांसमवेत गप्पा, आपल्या धंद्यातल्या गोष्टी, मुलांचा अभ्यास, नातेवाईकांकडे जाणे असा मस्त कार्यक्रम असायचा. मुन्नीची आई म्हणजे मुन्नीची मैत्रीणच. मुन्नी आणि मुन्नीचा दादा आपल्या आईला कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या गंमतीजमती सांगायचे आणि एकदम मोकळं वातावरण ठेवायचे.
उलट, आमच्या घरी हिटलरशाही. बाबा रागीट आणि हेकेखोर. त्यांच्यापुढे कुणाचे काही चालायचे नाही. आमची आर्थिक स्थिती यथातथाच. बाबा एका केमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरी करीत होते. ते एकटेच मिळवणारे आणि आम्ही चारजण खाणारे. माझी आईमात्र कमालीची सोशिक. संसार काटकसरीने करणारी. तिचे सर्वगुण माझ्यात आहेत, असे सर्वांचे म्हणणे. पण बाबांसमोर बोलायला मला भीती वाटते. त्यांनी एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतलाच. आई बिचारी भांडण नको म्हणून पडतं घ्यायची. आमच्या घरच्या या कोंदट वातावरणामुळे मी मुन्नीच्या घरी वारंवार जायला लागले आणि कळायच्या आधी मुन्नीच्या दादाच्या प्रेमात पडले.
मुन्नीचा दादा इंजिनीअर झाला आणि बेंगलोरला निघाला पण. माझे काळीज कासावीस झाले. आता तो नेहमी नेहमी दिसणार नाही, हे समजत होते. पण मला वाटत होते. तो मला आपल्या प्रेमाबद्दल बोलेल. अगदी ट्रेन सुटेपर्यंत मला आशा वाटत होती… त्याच्या डोळ्यात माझे प्रेम दिसत होते. मग ओठांवर का येत नव्हते?
मुन्नीचा दादा बेंगलोरला गेला आणि काही महिन्यात मुन्नी पुण्याला गेली. मी मुन्नीच्या घरी जातच राहिले. मुन्नीच्या दादाची खबरबात घेत राहिले. मला वाटायचे. मुन्नीची आईतरी मला विचारेल? ती पण गप्प होती. मी मुलगी, आपल्या संस्कृतीत मुली असे उघड उघड प्रेम दाखवतात का? केव्हा केव्हा वाटत असे, मी नोकरी करणारी नाही म्हणून मुन्नीचा दादा माझा विचार करत नाही की काय? हल्ली सर्वांना नोकरीवाली बायको हवी असते. मुन्नीचा दादा आपले प्रेम व्यक्त करील यासाठी जीव आसूसला होता. तीन महिन्यांपूर्वी मुन्नीची आई म्हणाली, “अगं, वल्लभ कंपनीत असिस्टंट मॅनेजर झाला. आता एक्सटर्नल एमबीए करतोय.” तेव्हा मात्र मी मनात घाबरले. हा असाच शिकत राहणार असेल तर माझे काय?
आमच्या घरी गेली दोन वर्षे माझ्या लग्नाचा विचार सुरू होता. मी गप्पच होते. पण गेल्या आठवड्यात पुण्याच्या मावशीने तिच्या पुतण्याचे म्हणजेच विनोदचे स्थळ आणले आणि सर्वजण हुरळून गेली. आईवडिलांचे म्हणणे सोन्यासारखा मुलगा आहे. असा नवरा मिळणे म्हणजे मिताचे भाग्य. माझ्या इतर मावश्या, मामा यांचे हेच म्हणणे. मी विनोदला कोणत्या तोंडाने नाही म्हणणार होते. वल्लभकडून निश्चित काही कळत नव्हते, किंवा वल्लभची आई ठोस काही बोलत नव्हती. माझं ‘मौनम्’ हीच संमती समजून आईबाबा तयारीला लागले सुद्धा!
मी मुन्नीला फोन करून माझे लग्न ठरतयं हे कळविले. म्हटलं वल्लभकडून किंवा वल्लभच्या आईवडिलांकडून काही हालचाल होते का हे पहावे. दोन दिवस वाट पाहून शेवटी वल्लभच्या घरी गेली. आईंना सर्व कसे गडबडीत ठरले, हे सांगत होते. आता लग्न करून पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाला जावे लागणार हे सांगताना डोळ्यातून पाणी वाहू लागले. एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडून वल्लभ बाहेर आला. एक क्षणभर त्याची आणि माझी नजरानजर झाली. रात्रभर झोप न झाल्याने ताठरलेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे पाहिले. माझ्याकडे दुर्लक्ष करून आईंना ‘बँकेत जाऊन येतो’ असे म्हणून तो निघाला.
हेही वाचा – लग्नाची बेडी अन् स्वच्छंद आयुष्य!
आई
काल मिता आणि विनोद यांचे लग्न झाले. मुन्नी मैत्रिणीच्या लग्नासाठी मुद्दाम पुण्याहून आली. मी मुन्नीच्या बाबांना एक दिवस घरी थांबायला सांगितले आणि आम्ही तिघेही लग्नाला गेलो. मुन्नी कार्यालयात गेली ती मिताच्या खोलीत तिची लग्नाची तयारी करायला. लग्नात मिताच्या शेजारी विनोदला पाहताना खूप त्रास होत होता. मुन्नीचे बाबापण गप्प गप्प होते. लग्नाच्या मंगलाष्टका सुरू झाल्या आणि मला वाटले, या आनंदाप्रसंगी मला आता हुंदका येणार. कसे बसे रडू आवरले. मिता, विनोदला भेटायला स्टेजवर गेलो. मला पाहताच मिता गळ्यात पडली. तिच्या डोळ्यातील दोन अश्रू माझ्या खांद्यावर पडले. आम्ही तिला अहेर केला आणि निघालोच. बाहेर पडून गाडी स्टार्ट करता करता हे म्हणाले, “मला वाटलं होतं, वल्लभचं मिताशी लग्न होईल. हे असे कसे झाले?”
मी म्हटले, “वल्लभच्या मनात मिता होतीच. पण तो करिअरच्या मागे लागला. मिताला तो गृहित धरून बसला… आता दुखावलाय. मिताने तरी किती वाट पाहायची. प्रेमात पुरुषाने पुढाकार घ्यायला नको? तो तुमच्यावर गेलाय. मन मोकळ करावं माणसाने. नुसतं शिक्षण, शिक्षण… मिता किती दिवस वाट पाहील याची?”
मुन्नीचे बाबा शांतपणे गाडी चालवत होते, घरी येईपर्यंत कोण कोणाशी बोलले नाही. घरी आल्यावर कपडे बदलले आणि बेडवर शांतपणे डोळे मिटून पडले. पहिल्यांदा मुन्नीसोबत आलेली 15-16 वर्षाची मिता ते आज लग्नात शालू घातलेली मिता… मिताची अनेक रुपे डोळ्यासमोर आली. फार काहीतरी गमावलयं अशी हुरहूर मनाला लागून गेली. यात माझे काही चुकले का? या दोन तरुण मुलांची मने ओळखून मी पुढाकार घ्यायला हवा होता का? का नाही मी वल्लभला मिताबद्दल विचारले आणि मिताला वल्लभबद्दल? आता पुढे वल्लभ काय करील? विसरेल का तो मिताला आणि मिता वल्लभला?
होय, वल्लभ आणि मिताप्रमाणे माझेपण चुकलेच. आता ही हुरहूर आयुष्यभर मन पोखरणार. त्रिकोणाच्या दोन बाजू तयार होत्या, तिसरी बाजू त्याला जोडण्याची गरज होती…
मी कुस बदलली आणि उशीत डोकं खूपसून रडू लागले.


