उत्तरार्ध
कविता आणि निरंजनचे लग्न होऊन 18 वर्षं झाली तरी, त्यांना मुलबाळ नव्हतं. कविताला हेच दु:ख होतं. घरी सासू, नणंद अन् माहेरी आईबाबा वाट पहातायत… काही बातमी येईल, पण… अखेर कविताने निर्णय घेतला आणि निरंजनला घेऊन ती पुण्याला गेली. तिथे एका अनाथाश्रमातून एक मुलगा दत्तक घेतला. घरातल्या घरात बारसं केलं, नाव ठेवलं – ‘आशू’!
आशू दोन वर्षांचा झाला. वयाच्या मानाने तो मोठा वाटत होता. सर्व काही छान होते… आणि… गोड बातमी आली! कविता आई होणार हे सर्वाना कळले. सासूबाई खूश. आशू भांबवला होता… हे नवीन बाळ घरात येणार म्हणून खूश पण झाला होता. शेजारीपाजारी ‘हा आशूचा पायगुण बरं…’ असं सांगत होते. कविताची सासू पण आशूची पाठ थोपटत होती. नवीन बाळाचे बारसं हॉलमध्ये नातेवाईकांना, शेजाऱ्यांना बोलावून केलं. मुलाचे नाव ठेवले – ‘अधीर’!
सात वर्षानंतर…
आशू नऊ वर्षांचा आणि अधीर सहा वर्षांचा. दोघे भाऊ एकमेकांशिवाय रहात नसतं. आशू शाळेत जाताना अधीरला संभाळून नेई. कविताला छान वाटे. असेच दोन्ही भावांचे एकमेकांवर प्रेम असावे असे तिला वाटे… पण मोठ्यांच्या प्रेमात फरक जाणवत होता. आजी अधीरला जवळ घेऊन खाऊ देई आणि आशूच्या हातावर टाकी. निरंजन साफ बदलला होता. आशूचा स्कॉलरशिप निकाल लागला आणि तो तालुक्यात पहिला आला. कविताला रिझल्ट कळला तेव्हा ती हरकून गेली. तिने नवऱ्याला फोन केला आणि ही आनंदाची बातमी सांगितली. तिला वाटले होते.. नवऱ्याला पण आपल्यासारखा आनंद होईल. पण त्याने शांतपणे रिझल्ट ऐकला आणि फोन ठेवला.
संध्याकाळी ती पेढे घेऊन घरी गेली, तिने आशूला सांगितले, “आजीला पेढे दे आणि नमस्कार कर.” आशू नमस्कार करायला गेला, तेव्हा तिने पेढे घेतले आणि बाजूला ठेवले… “किती मार्क्स?” वगैरे काही विचारलं नाही. आशू हिरमुसला. रात्री बाबा आल्यावर त्याने बाबांना पेढे दिले… त्याने पण पेढे शांतपणे बाजूला ठेवले. पण अधीर दुसरी पास झाला तर, त्याच्या बाबांनी गुलाबजाम वाटले बिल्डिंगमध्ये!
हेही वाचा – आशू आणि अधीर
कविताला हे जाणवत होते, ती नवऱ्याला सांगत होती.. ‘हे बरे नव्हे. आशू आणि अधीर यात भेदभाव असता कामा नये…’ पण तो होतच होता. आशू सायकल शिकत होता. त्याने अधीरला पुढे घेतले आणि पॅडल मारत होता. सायकल स्लिप झाली आणि दोघे पडले. अधीरच्या पोटावर सायकल पडली आणि त्यावर आशू. अधीरला खूप लागले. गुढघे फुटले, हात मुरगळला… आशू वर पडल्याने त्याला काही लागले नाही… दोघांना शेजाऱ्यांनी घरी आणले. आशूला काही लागले नाही आणि अधीरला बराच मार लागला, हे पाहून त्याची आजी चिडली. वाट्टेल तशी आशूला बोलायला लागली… ‘तू मुद्दाम पाडलंस अधीरला… तुला तो नकोच असतो. वेगळे रक्त ना तुझे… कोण कुणाचे कोण जाणे? छळ आहे नुसता…’
कविता नुकतीच घरी येत होती. आशू धावत तिला सांगायला आला. तिने आशूला जवळ घेतले आणि ती अधीरला डॉक्टरकडे घेऊन गेली. गुढघ्याला मलमपट्टी करून आणि गोळ्या घेऊन ती घरी आली. रात्री निरंजन लवकर घरी आला; त्याला बहुतेक त्याच्या आईने तिखटमीठ लावून सर्व सांगितले असणार. त्याने आशूच्या दोन थोबाडीत दिल्या. आशू रडतरडत कविताकडे आला. कविता चिडली…
“का मारलस तू आशूला? तू त्याचा बाप आहेस म्हणून?”
“मी बाप नाही त्याचा… मी फक्त अधीरचा बाप आहे! माझ्या मुलाला मुद्दाम पाडलेलं मला आवडणार नाही.”
“तू आशूचा बाप नाहीस? अरे, आशू शाळेत बाप म्हणून तुझं नाव लावतो.”
“मला आवडत नाही ते… कुण्या पाप्याचे रक्त असेल कोण जाणे? माझं नाव लावू नकोस म्हणावं.”
“निरंजन, एवढा बदललास? का आणलं आपण आशूला? तो आपणहून आला नाही इथं. त्याला दत्तक मुलगा म्हणून आणलंय. त्या वेळी बरा सांगत होतास… आपण योग्य निर्णय घेतला म्हणून.”
“त्याला दत्तक घेण्याचा निर्णय तुझा होता. मला नकोच होत हे पोर…”
“मग पुण्याला अनाथाश्रमात कोण गेलं होत? बाप म्हणून कुणी सही केली?”
“मी केली असेल… पण तुझ्या हट्टसाठी!”
“ठीक आहे. योग्य वेळी मी उत्तर देईन.”
कविता आणि निरंजन यांच्यात अबोला आला. जेवढ्यास तेवढे बोलणे होत होते. ती अधीर आणि आशू यांना सारखेच खाऊ, कपडे, बूट आणायची. पण तिच्या लक्षात आले अधीरची आजी आता त्याला जास्त आपल्याकडे ओढायला लागली आहे.
आशूला कांजण्या आल्या. कांजण्यांनी तो फुलला… ती त्यावर घरगुती आणि वैद्याचे उपचार करत होती. एक दिवस निरंजन चिडला…
“त्याचे इन्फेक्शन अधीरला होईल. त्याला दुसरीकडे ठेव, नाहीतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर.. पण अधीरला काही होता कामा नये.”
कविता चिडली, “होऊदे ना इन्फेकशन! भावाचे भावाला होणारच… तुला मागे कांजण्या आलेल्या, त्या मग मला नाही का आल्या?”
“पण अधीरला…”
“अधीर माझाच मुलगा आहे. मी त्याला जन्म दिलाय. त्याची काळजी मला आहेच… पण आशूची पण आई आहे, कारण तो पण मुलगाच आहे माझा!”
त्या दिवसापासून अधीर आजीसोबत झोपू लागला. आजी अधीरची जास्त काळजी घेत होती. त्यामुळे असेल पण अधीर जास्तीतजास्त वेळ आजीच्या खोलीत राहू लागला.
कविताची कुचंबणा होत होती. केव्हा केव्हा तिच्या मनात यायचे… आपण घाई केली का दत्तक घेण्याची? पण दुसरे मन सांगत होते… केली म्हणूनच आशूसारखा मुलगा मिळाला.
भाऊबीजेला निरंजनची बहीण सर्वाना बोलवी. तिची छोटी मुलगी होती, पियू. बहीण निरंजनला ओवाळी आणि पियू आशू आणि अधीरला. दरवर्षी पियू अधीरला किमती वास्तू देई आणि आशूला पेन किंवा पेन्सिल. लहान असताना आशूच्या हे लक्षात येत नव्हते, पण आता त्याच्या लक्षात येऊ लागले.
या भाऊबीजेला पियूने अधीरला महागडी क्रिकेट बॅट दिली आणि आशूला बॉलपेन. आशूने अधीरच्या हातातील बॅट पाहिली… आपल्याला दिलेले पेन पाहिले आणि पेन फेकून दिले. निरंजनच्या बहिणीने हे पाहिले आणि ती आशूला मारायला धावली…
“भिकारड्या, पेन फेकतोस…”
दुसऱ्या क्षणी कविता नणंदेवर ओरडली, “खबरदार माझ्या मुलाला भिकारड्या म्हणालीस तर…”
“तुझा मुलगा? कविता, कोण कुठल्या बेवारशी मुलासाठी माझ्यावर चिडतेस. दादाला सांगावे लागेल मला…”
“अग जा… दादाला सांगणारी… अधीर व्हायच्या आधी आशूचेच लाड करायचीस ना? माझ्या दादाचा कुलदीपक म्हणायचीस… अधीर झाल्याबरोबर एवढी बदललीस? यापुढे तुझ्या घरची पायरी चढणार नाही, लक्षात ठेव.”
अधीरला आणि आशूला घेऊन ती बाहेर पडली.
कविताला झोप येईनाशी झाली. सासू, नवरा, नणंद सारेच बोलेनासे झाले. काही तरी निर्णय घ्यायला हवा… हे तिच्या लक्षात आले. आशूसाठी तिचा जीव तडफडत होता. या पोराला बापाचे, आजीचे प्रेम मिळत नाही… जसजसा तो मोठा होईल, तसे त्याला जास्त कळायला लागेल…
एक दिवस शाळेतून दोघेही एकदम आले. कविता रजेवर होती. आशू आईला म्हणाला, “आई, मी तुझा मुलगा नाही काय?”
तिला धक्काच बसला… “अरे, कोण म्हणतं असं? तू आमचाच मुलगा आहेस…”
“अगं, ती शेजारची जांभळे काकू सांगत होती, तू कविताचा मुलगा नाहीस… तुला विकत घेतलंय तुझ्या आईबाबांनी! अधीर त्त्यांचा मुलगा आहे, म्हणून त्याची आजी अधीरचे लाड करते, तुझे नाही.”
तिने आशूला जवळ ओढले, “नाही रे बाळा… लोक दुष्ट असतात, काहीबाही सांगतात माझ्या बाळाला…”
एवढ्यात अधीर म्हणाला, “होय आई, मला पण रिक्षावाले मामा सांगत होते – हा तुझा खरा भाऊ नाही म्हणून… याला आश्रमातून आणलाय!”
तिने अधीरलाही जवळ घेतले… “लोक लबाड असतात माझ्या पिल्लांनो. लोकांना बरे बघवत नाही. मी विचारते त्या जांभळे काकूंना आणि रिक्षावाल्याला…”
हेही वाचा – मैत्रीण
दोघे खेळायला गेली, पण कविता खूप रडली. आपल्यामुळे आशूला असं ऐकावे लागते आणि यापुढे जास्त जास्त ऐकावे लागेल… त्यामुळे या दोन भावात… नको नको… माझ्या मुलांत दुरावा नको… त्यासाठी मलाच उंबरठा ओलांडावा लागेल.
आशू सहावीत गेला, तसा तिने त्याचे नाव पुण्याच्या शाळेत घातले. आपली बदली पुण्यात करून घेतली. पुण्यात भाड्याने लहानसा प्लॅट पाहिला. घरी हे कुणाला माहीत नव्हते… तिने भरलेल्या बॅग पाहून निरंजनने विचारले,
“कुठे जातेयस? एवढ्या बॅगा…?”
“मी आशूचा हात पकडून घर सोडतेय…”
“काय? डोके फिरलं का तुझं?”
“डोके जागेवरच आहे… निर्णय घेतलाय मी. आशूला तुम्ही आपला मानत नाही… त्याच्यातील रक्त तुमचे नाही, यात त्याचा काय दोष? त्याला आपण आणले नसते, तर कुणी दुसऱ्या गरजवंताने नेले असते. पण तुमची गरज संपली कारण अधीर जन्मला… मग काय, गरज सरो अन् वैद्य मरो! पण मी त्याला टाकू शकत नाही, कारण जसा अधीर माझा मुलगा आहे, तसाच आशू सुद्धा!
अधीर आता आजीकडेच असतो. त्याला बाबा आहे, आत्या आहे… आशूला कोणच नाही… आणि आता घरची तसेच आजूबाजूची लोक आशूला सांगायला लागली आहेत की, तू अधीरचा भाऊ नाहीस… तुला विकत घेतलंय म्हणून… काय परिणाम होत असेल त्याच्या मनावर? त्याने जर मला विचारले, का घेऊन आलीस मला अनाथाश्रमातून? मी तेथेच बरा होतो… तर काय उत्तर देऊ मी?
निरंजन, मी आशूला घेऊन पुण्याला शिफ्ट होतेय. माझी बदली पुण्याला झाली आहे. छोटे घर घेतलंय मी आम्हा दोघांपुरते. मी या घराचा उंबरठा ओलांडतेय…”
“म्हणजे कायमची चाललीस तू? आणि अधीर… मी… आई…”
“नाही… कायमची नाही. येत-जात राहीन, सणासुदीला येईन पण पाहुण्यासारखी… गरज असेल तेव्हा मध्यरात्री हाक मार, धावत येईन. पण माझ्या आशूसाठी मला हा निर्णय घायलाच लागला.. मी आणि आशू उद्याच पुण्याला जातोय.”


