संध्याकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे स्वाती स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. तिचा नवरा निलेश ऑफिसमधून घरी आला आणि हातपाय धुऊन तिच्याजवळ येऊन बसला.
“अगं स्वाती, आज आईचा फोन आला होता. बाबांची औषधं संपली आहेत आणि घरातल्या काही वस्तूही आणायच्या आहेत म्हणत होती,” निलेश म्हणाला.
“मग उद्या जाऊन घेऊन या ना,” स्वाती सहज म्हणाली.
“हो, पण मी विचार करत होतो, तुझा पगार झाला आहे ना? आपण त्यातून काही पैसे आई-बाबांना देऊया का?”
स्वातीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तिला वाटलं, नेहमीप्रमाणे तो आपल्याच आई-वडिलांच्या खर्चाची बोलणी करत असेल. पण निलेशचे पुढचे शब्द ऐकून ती थक्कच झाली.
निलेश अगदी सहजतेने म्हणाला, “तुझ्या आई-वडिलांनाही गरज असेल तर त्यांच्यासाठीही पैसे बाजूला ठेव, त्यांना पाठव. तू नोकरी करतेस, स्वतः कमावतेस. तुझ्या कमाईवर तुझा पूर्ण अधिकार आहे… आणि स्वतःच्या आई-वडिलांसाठी काही करावंसं वाटत असेल, तर त्यासाठी कुणाची परवानगी घेण्याची गरज का पडावी? मुलगी असणं किंवा लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणं म्हणजे माहेराशी असलेले सगळे हक्क आणि नातं संपतं असं थोडंच असतं? जसा मी माझ्या आई-वडिलांना सांभाळतो, त्यांची काळजी घेतो, तशीच तुझीही जबाबदारी आहे की, तू तुझ्या आई-वडिलांना सांभाळावंस. यात जेंडरचा (लिंगभावाचा) प्रश्न कुठे येतो? मुलगी आहे म्हणून तिची कर्तव्ये बदलतात का?”
हेही वाचा – फोटो आणि परंपरा… काळाच्या आरशातले क्षण
स्वाती काही क्षण त्याच्याकडे पाहातच राहिली. डोळ्यांत पाणी दाटून आलं. आई-वडिलांसाठी काही घ्यायचं किंवा मदत करायची म्हटली, की समाजातल्या रुढींचा विचार करून ती अनेकदा स्वतःचं मन मारायची. पण आज निलेशने तिच्या मनातली तीच भीती आणि ओघळलेली बंधनं पुसून टाकली होती.
दुसऱ्या दिवशी स्वातीने आईला फोन केला…
“आई, या रविवारी आम्ही दोघं येतोय. बाबांना डॉक्टरांकडे न्यायचं आहे ना? आपण जाऊया.”
आई म्हणाली, “अगं, जावयाला कशाला त्रास देतेस? तू एकटी ये. त्याला सुट्टीच्या दिवशी आराम करू दे.”
स्वाती हसली. “आई, तो फक्त माझा नवरा नाही, तुझा जावईही आहे… आणि तुम्ही दोघं माझे आई-बाबा आहात, या नात्याची जाणीव त्याला माझ्याइतकीच आहे!”
फोन ठेवल्यावर स्वातीला जाणवलं की, निलेशने तिला फक्त पैसे खर्च करण्याची मोकळीक दिली नव्हती, तर स्त्रीच्या अस्तित्वाला आणि तिच्या माहेरच्या नात्यांना एक सन्मान मिळवून दिला होता.
आपल्या समाजात अनेकदा लग्नानंतर मुलीने सासरच्या माणसांनाच आपलं सर्वस्व मानलं पाहिजे, अशी एकतर्फी अपेक्षा असते. ती अपेक्षा चुकीची नाही, सासरची माणसंही आपलीच असतात. पण सासरच्यांना आपलं मानताना मुलीला माहेरच्या माणसांपासून मनाने, अधिकाराने आणि जबाबदारीने दूर का ढकललं जावं?
अशाच चौकटी आपण नकळत समाज म्हणून तयार करत असतो. कुठे सुनेनेच घरची सगळी कामं करायची असतात, तर कुठे मुलानेच आई-वडिलांची जबाबदारी घ्यायची असते. पण जर एखाद्या घरात नवरा स्वयंपाक करत असेल आणि बायको विश्रांती घेत असेल, तर त्यात कमीपणा कसला? आणि जर मुलगी आपल्या आई-वडिलांच्या वृद्धावस्थेत त्यांचा आधार बनत असेल, तर त्यात वेगळं किंवा चुकीचं काय आहे?
चौकटीपलीकडचा विचार म्हणजे प्रत्येक गोष्ट उलटी करणं नव्हे, तर एखादी रूढी पिढ्यानपिढ्या अशीच का चालत आली आहे, हा प्रश्न स्वतःला विचारणं!
हेही वाचा – दोन कन्यादानांतून मिळाले दोन पुत्र
कधी नवऱ्याने बायकोच्या माहेरच्या कुटुंबाला आपलीच जबाबदारी मानणं, कधी सासू-सासर्यांनी सुनेच्या आई-वडिलांबद्दलही तितकाच आदर राखणं, तर कधी मुलगा आणि मुलगी या दोघांनाही समान मापदंडानं जगू देणं… हे सगळेच तर विचारांचे नवे आणि सुंदर मार्ग आहेत. अशा विचारांनी घरातली नाती कधीही कमकुवत होत नाहीत, उलट ती अधिक घट्ट आणि विश्वासाची होतात. कारण, तिथे हुकूम गाजवण्यापेक्षा एकमेकांच्या भावनांना समजून घेण्याला महत्त्व असतं.
शेवटी, घर मोठं असण्यासाठी मोठा बंगला किंवा अथांग पैसा लागतोच असं नाही. त्या घरातल्या माणसांचे विचार जर चौकटीपलीकडचे आणि मोठे असतील, तर छोटंसं घरही मायेने आणि आनंदाने भरून जातं.
कधी कधी घर बदलण्यासाठी किंवा नात्यांना नवा श्वास देण्यासाठी भिंती पाडाव्या लागत नाहीत; फक्त मनाभोवती आणि विचारांभोवती बांधलेल्या जुन्या चौकटी पाडल्या, तरी पुरेसं असतं!


