पूर्वार्ध
“उंबऱ्याच्या आत मी तुझा पाहिजे तेवढा लाड करू शकतो. पण उंबऱ्याच्या बाहेरचं जग खूप वाईट आहे. किती वेळा सांगितलं तुला, मुलीच्या नादाला लागू नको… मुलीच्या नादाला लागू नको… तरी पण तुझा नाद काय सुटत नाही. आता पुन्हा चूक झाली, तर घराच्या बाहेर काढीन.”
पाठीवर वळ उठले होते. गालावर बोटे उठली होती… तरीही बाप हाणतच होता. गिरीश गाल चोळत ढसाढसा रडत होता. बऱ्याच वेळाने गणपाचा आवेग ओसरला. तो थोडा शांत झाला. उंच राक्षसासारखा तो नुसताच उभा राहिला. नंतर हातातली फोक खाली टाकून तो त्याच्या खोलीत निघून गेला.
आत आल्यावर मात्र त्याचंच मन त्याला खाऊ लागलं. किती केलं तरी पोराची जात. अजून नाकळतं आहे. कुठला पोच नाही. सगळं जग सरळमार्गी आहे, असं वाटणारं वय. हाणून, मारून तरी काय उपयोग? पण समजावून तरी किती सांगणार? एकदा झालं… दोनदा झालं… या वयात एकदा पाय घसरला तर, पुन्हा सावरंल का? त्यातच कोसळून जाईल.
गिरीशचा बाप – गणपत – गावात ओळखला जायचा तो त्याच्या स्वच्छ चारित्र्यामुळे आणि निर्व्यसनी आयुष्यामुळे. दारू, सिगारेट, तंबाखू आणि पर-नारी यापासून तो कायम चार हात दूर. “माणसाने स्वच्छ जगावं, चार माणसांत मानानं वागावं,” हेच त्याचं तत्व.
स्वभावाने मात्र तो खूप कडक होता. त्याचं बोलणं मोजकं होतं. पण राग पटकन येत होता. तो प्रेम व्यक्त करायचा, पण त्याची पद्धत रांगडी होती. सगळंच काम कडक.
गिरीश लहानपणापासूनच या कडकपणात वाढला. चुका केल्या की, समजावणं कमी आणि बापाचा मारच जास्त. गणपतला वाटायचं – “आज जर हात उगारला नाही, तर उद्या हा वाकड्या वाटेवर जाईल. नको त्या मुलीच्या नादी लागला, तर आयुष्य बरबाद होईल. कुठले व्यसन लागले तर जगणं मुश्किल होईल.” हीच काळजी त्याला होती. त्यामुळे गणपतची प्रतिमा ‘मारका बाप’ अशीच झाली होती. चांगल्या गुणांचं कौतुक होतच होतं. परंतु बऱ्याच वेळेला गिरीश चुकाच जास्त करायचा. ज्या चुका अत्यंत गंभीर होत्या. त्या चुका तशाच राहू दिल्या असत्या तर, त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला असता.
तरीही आतून गणपत हळवाच होता. नारळासारखा… वरवर कठीण, पण आतून काळजाचं पाणीच होता. त्याचा रागही अल्पायुषी होता. आजही पोराच्या डोळ्यांत पाणी पाहून तो आतून पाझरला. त्याच्या मनात कालवाकालव सुरू झाली. तो खूपच अस्वस्थ झाला. उठून आतल्या आत येरझाऱ्या मारू लागला. न राहून तो खोलीच्या बाहेर पडला. हळूहळू गिरीशच्या जवळ आला. त्याला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला. त्याचे डोळे पुसले. पाठीवर थोपटत राहिला. “किती वेळा त्याच त्या चुका करायच्या बाळा? अभ्यास करावा. शाळेत नंबर काढावा. चांगलं नाव कमवावं… हे राहिलं बाजूला. तू हे तिसरंच काय करतोयस?” तो बोलत राहिला. गिरीश आवंढे गिळत ऐकत राहिला. गिरीश शांत झाल्यावर गणपत पुन्हा त्याच्या खोलीत निघून गेला.
हेही वाचा – हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!
रात्रीचे दहा वाजून गेले होते. गंगू अजून झोपली नव्हती. तिने तर केव्हापासून डोळ्याला पदर लावला होता. गणपतचा राग तिला माहीत होता. त्याच्या रूद्रावतारापुढं ती हतबल होत होती. तिला काही सुचत नव्हतं. तिला वाटायचं, ‘गणपतचं बरोबरच आहे. एकुलतं एक पोरगं… नको त्या वयात चुकीच्या नादाला लागलं, तर हुत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अजून त्याची पुरी जिंदगी पडलेली आहे. त्याला प्रेमाने किती वेळा सांगितलं. परंतु ते एकच चुक पुन्हा पुन्हा करत बसतंय.’
गणपत आत आला आणि तिच्या शेजारी गपचूप बसला. त्याचा राग आता निवळला होता. तो पूर्णपणे शांत झाला होता.
“अहो. ऐकलं का?”
गणपतने मान वर करून तिच्याकडं खिन्नपणे पाहिलं. तो नुसताच उदासपणे पाहात राहिला.
“मी काय म्हणते? एवढी परीक्षा होऊ द्या. आठवीला त्याला दुसरीकडेच शाळेला घालूया. इथं त्याचे भरपूर मित्र आहेत. त्यांच्या संगतीत हा वाईट नादाला लागतोय. त्यापेक्षा इथली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत किंवा अकॅडमीत टाकूया.”
“मग तर त्याला रानच मोकळं होईल.”
“तसं नाही होणार. आता आठवड्यातून एकदा पालक भेट असते. शिवाय, मोबाइल वापरायला बंदी असते. अकॅडमीत कॅमेरे असतात. शिक्षकांचे लक्ष असते.”
“बघूया. त्याची परीक्षा तर संपू दे. परीक्षा संपल्यानंतर आपण निर्णय घेऊ या. झोप आता.”
पोराच्या भविष्याच्या काळजीने दोघेही धास्तावले होते. कुठली झोप लागतीय? पडायचं म्हणून अंथरुणावर पडले होते. अंधारात दोघांचे डोळे टक्क् उघडे होते. अजून ओठावर मिसरूड फुटलं नाही, तोपर्यंत पोराला असला वाईट नाद लागला. अभ्यासात लक्ष नाही. जेवणात लक्ष नाही. पुढे भविष्यात त्याचं काय होईल? नुसती तळमळ तळमळ. जीवाची घालमेल. खोलीतला पंखा गरगर फिरत होता. पंख्याच्या वाऱ्याने खोलीतला अंधार सुद्धा हेलकावे खात होता. डोक्यात एकुलत्या एका मुलाच्या भविष्याचा काळाकुट्ट किडा मेंदू पोखरत होता. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर… काळजीच्या काळ्याकुट्ट अंधारात दोन जीव तडफडत होते. पहाटे कुठं डोळ्याला डोळा लागला.
दारावर अचानक टकटक वाजल्यावर त्यांना जाग आली. गंगू तर खडबडून उठली. घाबरतच तिने दरवाजा उघडला. टक्क् ऊन पडलं होतं. सकाळचे आठ वाजले होते. शेजारच्या नळावर पाणी भरण्यासाठी बायकांनी गर्दी केली होती. रस्त्यावर वाहनांची रहदारी सुरू झाली होती. अंगणात गिरीशच्या शाळेतले खंदारे सर आले होते. त्यांच्याबरोबर आणखी तीन-चार माणसे आली होती. दांडगट, पिळदार शरीराची. एकाने तर अंगात नुसतीच मळकट बंडी घातली होती. त्यांच्या उग्र चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. हाताच्या मुठी आवळून ते उभे राहिले होते. गंगू मनातल्या मनात गळंगून गेली. आता आणखी काय वाढून ठेवलंय काय माहीत?
घाबऱ्या जीवानिशी ती आत आली… “अहो ऐकलं का? बाहेर खंदारे सर आले आहेत. त्यांच्याबरोबर तीन-चार अनोळखी माणसे पण आली आहेत. उठा लवकर.”
गणपत पटकन उठला. कसंतरी तोंडावर पाणी मारलं. चूळ भरली. टावेल खांद्यावर टाकून तो तसाच बाहेर गेला. “नमस्कार सर. या की… आत तरी या.”
त्या अनोळखी माणसापैकी दोघेजण पुढे सरसावले. गणपतला म्हणाले, “आत नको. इथंच बोलायचं आहे. तुमचा मुलगा कुठं आहे?”
गणपतच्या पोटात खड्डा पडला. पोरानं आणखी कायतरी नवीनच वाढवून ठेवलंय. पोरगा आम्हाला जगू देत नाही, असं दिसतंय. एक दिवस खाडा जात नाही. रोज काहीतरी लडतर आहेच. त्याच्या कपाळावर घाम फुटला. मनात संतापाची लाट उसळली. ह्रदय धडधडू लागले. तरीही संयम ठेवून तो बोलला…
“अजून झोपलाय तो. बोला की काय काम आहे त्याच्याकडे?”
“तुमच्या मुलाला चांगल्या शब्दांत ताकीत द्या. तुमचं ऐकत नसेल तर आमच्या स्वाधीन करा. आम्ही बघतो त्याला. नको त्या वयात टारगट पोरांच्या नादी लागलंय. आमच्या मुलींना त्याचा खूप त्रास होतोय. शिवाय वैरणपेठेतल्या त्या कोपऱ्यावर गांजा ओढणारी पोरं असतात. तिथं जाऊन बसतोय. त्याचं वय तरी आहे का?”
एवढ्यात खंदारे सर पुढे येऊन म्हणाले, “आता त्याची वार्षिक परीक्षा आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती गप्प बसली आहे. नाहीतर त्याला शाळेतून काढून टाकला असता.”
गणपत थोडा पुढे झाला. दोन्ही हात जोडून म्हणाला, “अजून पोराची जात आहे. चुकलं असेल तर त्याच्या वतीने मी माफी मागतो. एवढी परीक्षा संपली की त्यावर कायमस्वरूपी इलाज काढतो. काही राग मानू नका.”
अनोळखी माणसे निघून गेली. खंदारे सर एकटेच पाठीमागे राहिले. अंगणातून गणपत आत आला. त्याने खंदारे सरांना आत बोलवले. गंगूला चहा ठेवायला सांगितले. खंदारे सर आत येऊन ऐसपैस बसले. पाण्याचे दोन घोट घेतले. ते गिरीशचे क्लास-टीचर असल्याने वारंवार गणपतच्या घरी येत असत. त्यांनी गंगूलाही बाहेर बोलवले. दोघांना उद्देशून बोलू लागले.
“तुमचा गिरीश हुशार आहे. अभ्यासात चांगला आहे. पण चुकीच्या संगतीला लागलाय. तुमचं धाडस होत असेल तर, एक पर्याय मी काढला आहे.”
“आम्ही पण त्याच विचारात आहोत, सर. कसलाही पर्याय सांगा. आम्ही तो अमलात आणू.”
“गिरीश माझा लाडका विद्यार्थी म्हणून सांगतो. त्याला आता या शाळेत ठेवू नका. आपण त्याला ‘सक्सेस अकॅडमीत’ घालूया. इथून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. जरी ती दुसऱ्या तालुक्यात असली तरी त्यांच्याकडे स्टाफ चांगला आहे.”
खंदारे सर निघून गेले. पुढच्या पंधरा तारखेला परीक्षा संपणार होती. लगेचच त्याला अकॅडमीत प्रवेश घ्यायचा होता. अकॅडमीत फी पण जास्त होती. पैशाची जमवाजमव करावी लागणार होती. गणपत आणि गंगू विचार करू लागले.
“भटकीच्या माळाचं एकरभर रान आहे तेवढं विकूया. कारण आता दुसरा काहीच इलाज नाही. अकॅडमीत घातल्यानंतर दोन-तीन वर्षे फीच भरावी लागणार आहे. दहावी झाल्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू.”
गंगू काहीच बोलली नाही. ती विचारात पडली होती. पैशासाठी काय करावं, तिलाही सुचत नव्हतं. मुलाच्या या वागण्याने सगळं घरदार बुचकळ्यात पडलं होतं.
“शेत विकायचा निर्णय मी तरी कसा सांगू? शेत विकलं तर आपण खाणार काय? आत्ता कुठं पसा पुरतं धान्य येतंय. ते पण येणार नाही. दोघांनाही बाहेरचा रोजगार करावा लागेल. शिवाय, पुढे जाऊन हा काय दिवे लावणार आहे काय माहीत! त्यापेक्षा शाळा बदलायला नको. काय होईल ते होईल. इथंच ठेवूया का?”
“अगं, असं म्हणून कसं चालेल? अजून नाकळतं आहे. हळूहळू समज येईल. कधीतरी सुधरेलच की! तुला खरं सांगू का? माझा मुलगा माझ्यासारखा राबणारा मजूर नको. तो शिकलेला हवा, हेच माझं स्वप्न आहे.”
हेही वाचा – बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!
गिरीशला अकॅडमीत प्रवेश घेतला. तो तेथेच शिकू लागला. वर्ष, सहा महिन्यांतून पालकभेट होत होती. गंगू आणि गणपत त्याला भेटायला जात होते. गणपत दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करत होता. गंगू बीडी कारखान्यात कामाला जात होती.
एके दिवशी गंगूला खूप खोकला यायला लागला. रात्रभर ती खोकत होती. दुसऱ्या दिवशी गणपतने तिला दवाखान्यात नेली. डॉक्टरने सर्व तपासण्या केल्या. तिला कॅन्सर झाला होता. त्यानंतर सर्व इलाज केले. पण काही उपयोग झाला नाही. एके दिवशी गंगू गणपतला सोडून कायमची निघून गेली.
गिरीशचे शिक्षण पूर्ण झाले. परंतु अजून नोकरी नव्हती. तरीही घरात जेवणाची आबाळ नको म्हणून त्याचे लग्न ठरले. त्यालाही मुलगी पसंत पडली. त्याचे लग्न झाले आणि आठव्या दिवशी त्याला नोकरीही मिळाली. परंतु ती तात्पुरती होती. गिरीशने निर्णय घेतला. गावातील कौलारू घराला त्याने सरळ कुलूप ठोकलं. नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच पुण्याला तो निघून गेला. सोबत बायको आणि गणपतलाही घेऊन गेला.
दोन वर्षांतच गिरीश परमनंट झाला. गिरीशला कायमची नोकरी लागल्याची बातमी ‘हा’ ‘हा’ म्हणता गावाकडे पसरली.


