Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चव्हाणांचे मृत्युपत्र
    ललित

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीOctober 14, 2026No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, दीपक तांबोळी, लेखक दीपक तांबोळी, चव्हाणांचा एकटेपणा, चव्हाणांचे शेजारी, चव्हाण आणि कुलकर्णी, चव्हाण कुलकर्णी शेजारी, चव्हाणांची श्रीमंती, कुलकर्णींचा साधेपणा, सुग्रण मंजू, चव्हाणांची बायपास, चव्हाणांचे मृत्युपत्र, चव्हाणांचा बंगला, चव्हाणांची प्रॉपर्टी, चव्हाणांची मुले
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 3

    मेसचा डबा न आल्याने चव्हाण नव्या मेसच्या चौकशीसाठी शेजारच्या कुलकर्णींकडे गेले होते. तेव्हा कुलकर्णी आणि त्यांची पत्नी मंजूने त्यांना आपल्याच घरी जेवणासाठी येण्याचा आग्रह केला. चव्हाण नाखुशीनेच त्यांच्याकडे जेवायला गेले. पण त्यांना भाजीची चव अप्रतिम असल्याचा साक्षात्कार झाला. पोळ्या तर इतक्या छान होत्या की, त्यांच्याकडे पाहूनच भूक वाढत होती. कितीतरी महिन्यांनी चव्हाणांना असं घरगुती ताजं जेवण मिळत होतं. स्वतःच्या नकळत ते जेवणावर तुटून पडले.

    काही दिवसांनी कुलकर्णींच्या ओळखीने त्यांच्या गावची दोन मुले चव्हाणांकडे राहायला आली. युपीएससीच्या कोर्सेससाठी आलेली ही मुले त्यांना भाडं देणार होते. दोन्ही मुलं चव्हाणांना सभ्य वाटली. चव्हाणांना त्यांचा काहीच त्रास नव्हता. उलट, चहा प्यायला आणि जेवायला त्यांना कंपनी मिळत होती. कुलकर्णींकडून आता एकाऐवजी तिघांचं जेवण येत होतं.

    ‌पुढच्याच आठवड्यात आणखी दहा मुलं घरात दाखल झाली. ती सर्व त्या दोन मुलांचे मित्र होते. भुतांचं घर वाटणारा चव्हाणांचा बंगला माणसांनी गजबजून गेला. आलेली सर्व मुलं एका ध्येयाने झपाटलेली होती. चव्हाणांना त्यांचा त्रास तर नव्हताच, उलट मदतच व्हायची. दूध आणणं, सकाळ-संध्याकाळ चहा करणं, पंखे पुसणं, दर रविवारी टॉयलेट साफ करणं, घरातली किरकोळ दुरुस्ती करणं, चव्हाणांची ॲक्टिव्हा पंक्चर किंवा खराब झाली तर दुरुस्त करून आणणं इत्यादी कामं मुलंच करत होती.

    3 सप्टेंबरला चव्हाणांचा वाढदिवस. मुलं आणि कुलकर्णी दाम्पत्याने मिळून त्यांना सरप्राइज पार्टी दिली. चव्हाणांना गहिवरून आलं. आजपर्यंत त्यांचा वाढदिवस इतका जोरदार कधीही साजरा झाला नव्हता. भरलेल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी त्यांनी केक कापला. त्याचे तुकडे त्यांनी कुलकर्णी आणि त्यांच्या परिवाराला भरवले. मुलं पुढे झाली, त्यांनी चव्हाणांना केक खाऊ घातला. शेजारी उभ्या असलेल्या कुलकर्णींना चव्हाणांनी घट्ट मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

    रात्री जेवण करून चव्हाण घरी परतले, तेव्हा खूप आनंदी होते. गाडीभरुन आलेले गिफ्ट्स मुलांनी घरात आणले. मुलांनी सांगितलं की, वाढदिवस साजरा करायची कल्पना कुलकर्णींची होती. सगळा खर्चही त्यांनीच केला होता.

    ‌दुसऱ्या दिवशी आलेले सगळे गिफ्ट्स चव्हाणांनी मुलांना वाटून दिले. कुलकर्णींनी दिलेलं सुटचं कापड फक्त त्यांनी स्वतःसाठी ठेवलं. त्या दिवसानंतर चव्हाण अमूलाग्र बदलले. कुणीही मदत मागायला आलं तर, त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, हे त्यांनी ठरवून टाकलं. गणेशोत्सवासाठी कार्यकर्ते वर्गणी मागायला आले. चव्हाणांनी झटक्यात 11 हजार काढून दिले. कधीही 101 रुपयापेक्षा जास्त वर्गणी न देणाऱ्या चव्हाणांकडून इतके पैसे मिळालेले पाहून कार्यकर्ते आश्चर्यचकीतच झाले. गणेशोत्सवात झालेल्या कार्यक्रमात चव्हाणांना चीफ गेस्टचा मान मिळाला. गणपती गेले नवरात्रोत्सव आला. कार्यकर्त्यांनी चव्हाणांनाच मंडळाचा अध्यक्ष बनवून टाकलं. वर्गणी मागितली तर चव्हाणांनी सांगितलं, “वर्गणी देणार नाही, पण भंडाऱ्याचा जो 30-40 हजार खर्च येईल तो मी करेन.”

    हेही वाचा – चव्हाण आणि कुलकर्णी…

    कार्यकर्ते खूश झाले. नवरात्रात कधीही बाहेर न पडणारे चव्हाण तरुण पोरांबरोबर जमेल तसा दांडिया खेळू लागले. शेवटच्या दिवशी बक्षिसांचं वाटप चव्हाणांच्या हस्ते झालं.

    ‌सात दिवसांवर दिवाळी आली आणि चव्हाणांकडे पेइंगगेस्ट म्हणून रहाणारी मुलं आपापल्या घरी निघून गेली. घर उदास वाटू लागलं. चव्हाण दिवाळीत एकटं रहाण्याच्या कल्पनेने अस्वस्थ झाले. न रहावून त्यांनी अमेरिकेत रहाणारा मुलगा रमेशला फोन केला. दिवाळीत भारतात येण्याचा प्लॅन आहे का, विचारलं. तो म्हणाला,

    “पप्पा, मी इथल्या महाराष्ट्र मंडळाचा नुकताच सेक्रेटरी झालोय. दिवाळीत बऱ्याच जणांचे पेरेंट्स इथे येणार आहेत. त्याच्यासाठी आम्ही खूप प्रोग्राम ॲरेंज केलेत. मी तुम्हालाही विचारणार होतो, पण तुम्हाला अमेरिका आवडत नाही म्हणून नाही विचारलं…”

    “ठीक आहे, मी परेशला विचारतो.”

    “अहो, परेशही माझ्याकडेच येणार आहे. त्याला मुलगी झाल्याचं त्याने तुम्हाला कळवलं का?”

    चव्हाणांना धक्का बसला. परेश त्यांचा लाडका मुलगा. काय नव्हतं केलं त्यांनी त्याच्यासाठी. 15 वर्षांचा होईपर्यत तो खूप अशक्त होता. बऱ्याचदा दवाखान्यात ॲडमिट व्हायचा. अनेक रात्री चव्हाणांनी त्याच्यासाठी जागून काढल्या होत्या.

    “नाही बुवा, त्याने मला काही कळवलं नाही…” मोठ्या दुःखाने चव्हाण म्हणाले.

    “विसरला असेल बहुतेक!”

    चव्हाणांनी नातवांची चौकशी केली.

    “मजेत आहेत, पण इंडियात जायला नाही म्हणतात. अहो, त्यांचा जन्म इथला, संस्कार इथले, कसं आवडेल त्यांना इंडियासारख्या बॅकवर्ड कंट्रीत यायला?”

    चव्हाणांना पुढचं ऐकवेना. थोडंसं बोलून त्यांनी फोन बंद केला.

    दोन-तीन दिवसांनी कुलकर्णींचा मुलगा आकाशकंदिल आणि लायटिंगच्या माळा घेऊन आला…

    “आजोबा कुठं लावायचं हे? बाबांनी पाठवलंय.”

    “अरे, माझ्या घरातही आहे हे, तरी मी लावत नाही. घेऊन जा ते…” मुलगा परत निघाला तसं त्यांनी त्याला थांबवलं.

    “बरं चल, लावून दे. तुझ्या बाबांना वाईट वाटेल.”

    मुलाने लाइटींग आणि आकाशकंदिल लावून दिला. संध्याकाळी कुलकर्णी त्यांना भेटायला आले.

    “काका, तुमची मुलं किंवा नातेवाईक दिवाळीसाठी येणार आहेत का?”

    “नाहीतर! का हो?”

    “मग चला सामान पॅक करा. तुम्हाला आमच्याकडे दिवाळी साजरी करायची आहे. आठवडाभर तुम्ही आमच्याकडेच रहायचंय!”

    चव्हाण कुलकर्णींकडे पहातच राहिले…

    “अहो, तुमच्या कुटुंबात मी बाहेरचा माणूस कशाला?”

    “काय काका, अजूनही तुम्ही बाहेरचेच आहात का? आम्ही तर तुम्हाला आमचाच एक सदस्य समजतो. ते काही नाही… संध्याकाळी मी तुम्हाला घ्यायला येतोय.”

    चव्हाणांचे डोळे पुन्हा भरून आले.

    चव्हाणांची दिवाळी मजेत गेली. कुलकर्णी कुटुंब इतकं चांगलं वागलं की, त्यांना अजिबात परकेपणा जाणवला नाही. पाडव्याला मंजूताईंनी चव्हाणांना ओवाळलं. ‘वडिलांच्या जागी तुम्हीच आहात,’ असं म्हटल्यावर चव्हाण गहिवरले.

    चव्हाण कुलकर्णींना म्हणाले, “तुमच्या मुलांना कधीही परदेशी पाठवू नका नोकरी करायला. बघताय ना माझे काय हाल होताहेत ते!”

    “अहो काका, पण आपल्या देशात नोकऱ्या मिळत नाहीत. सगळीकडे नुसता भ्रष्टाचार. मुलांच्या गुणांचं चीज होत नाही, अगदी कमी पगारावर काम करावं लागतं. काही ठिकाणी अक्षरशः पिळवणूक असते. काय करायचं त्या मुलांनी? परदेशात तसं होत नाही. तुमच्यात मेरिट असेल तर, चांगले जॉब्स मिळतात, पगारही भरपूर मिळतो. अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. आता प्रश्न आईवडिलांना सांभाळण्याचा, तर तीन मुलं असूनही आईवडिलांना सांभाळणार कोण, यावरून भांडणारी आणि सरतेशेवटी त्यांना वृद्धाश्रमात ठेवणारी असंख्य मुलं आपल्या देशातही आहेतच ना?”

    “सगळी मुलं तशी नसतात. माझे चुलत भाऊ आजही जॉइंट फॅमिलीत रहातात. आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतात,” मंजूताई म्हणाल्या.

    “हो ना. शेवटी मुलांवरचे आपले संस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नशीब यावर सगळं अवलंबून आहे. आता तुम्हाला अमेरिका आणि नेदरलँड आवडलं नाही म्हणून… नाहीतर तुमची मुलंही तुम्हाला सांभाळायला तयार होतीच ना?” कुलकर्णींनी विचारलं.

    चव्हाण चूप बसले. कुठेतरी मनात त्यांना ते पटत होतं, पण मुलांबाबतची मनातली अढी काही कमी झाली नाही.

    कॉलनीतल्या रहिवाशांमध्ये मिसळू लागल्याने आता चव्हाणांना रोज फराळाची बोलावणी येऊ लागली.चव्हाणही आढेवेढे न घेता जाऊ लागले.

    डिसेंबरमध्ये त्यांच्या साडूच्या मुलाचं मुंबईत लग्न होतं. चव्हाणांना सात दिवस अगोदरपासूनच निमंत्रण होतं. पहिल्यांदाच कुठलाही बहाणा न सांगता ते मुंबईला गेले. बऱ्याच दिवसांनी अशी संधी मिळाल्याने रोज मसालेदार नॉनव्हेज आणि सोबतीला दारू यावर चव्हाणांनी आडवा हात मारला. तृप्त होऊन ते घरी परतले ते हायपर ॲसिडिटी घेऊनच!

    सात-आठ दिवसांनी रात्री एक वाजता त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आपल्याला अटॅक येतोय, हे मागच्या अनुभवावरून त्यांना समजलं. शेजारच्या खोलीतल्या मुलांना त्यांनी हाक मारली. मुलं धावत आली. एकाने कुलकर्णींना फोन लावला. चव्हाणांची अवस्था पाहून कुलकर्णींनी ताबडतोब त्यांना गाडीत बसवलं आणि त्यांना हॉस्पिटलला नेले. तोपर्यंत चव्हाण बेशुद्ध झाले होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सकाळी चव्हाण शुद्धीवर आले. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. सकाळी 11 वाजता डॉक्टरांनी कुलकर्णींना बोलावून घेतलं.

    “प्रकरण फार गंभीर आहे. यांची ताबडतोब बायपास करणं आवश्यक आहे. पुणे किंवा मुंबई यापैकी तुम्हाला जिथं सोयीस्कर होईल, तिथे घेऊन जा. अर्थात, तेही धोक्याचंच आहे… पण त्याला इलाज नाही.”

    “मला फक्त एक दिवस द्या. पैशांची जुळवाजुळव करावी लागेल,” कुलकर्णी म्हणाले.

    खरंतर, चव्हाणांकडे पैशांची कमतरता नाहीये, हे कुलकर्णींना माहीत होतं; पण या अवस्थेत पैसे मागणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. घरी येऊन त्यांनी बायकोशी सल्लामसलत केली. मंजूताईंनी मंगळसूत्र सोडून सगळे दागिने काढून दिले. कुलकर्णी मग कॉलनीत फिरले…

    “आता ताबडतोब तुम्हाला जेवढी जमेल तेवढी मदत करा. तुमचे पैसे परत मिळण्याची गॅरंटी माझी…” असं बोलून त्यांनी जवळजवळ सगळ्यांकडून पैसे घेऊन कच्च्या पावत्या दिल्या. संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे दहा लाख जमा झाले. पुण्याकडे निघता-निघता त्यांनी चव्हाणांच्या मोबाइलवरून त्यांच्या मुलांचे फोन नंबर घेतले आणि त्यांना सर्व कल्पना दिली.

    चव्हाणांची बायपास सर्जरी यशस्वी झाली. पंधरा दिवस कुलकर्णी आणि चव्हाणांच्या घरात रहाणारी दोन मुलं हॉस्पिटललाच राहिली.

    चव्हाण मृत्यूच्या दारावर जाऊन घरी परतले. सगळा खर्च कुलकर्णी, त्यांचे मित्र आणि कॉलनीतल्या रहिवाशांनी केल्याचं त्यांना कळलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या सर्जरीच्या खर्चासाठी मंजूताईंनी आपले दागिने दिले, याचं त्यांना जास्तच वाईट वाटलं. त्यांनी ताबडतोब चेकवर सह्या करून कुलकर्णींना सगळ्यांचे पैसे फेडायला सांगितले.

    कुलकर्णींची 15 दिवस बिनपगारी रजा झाली होती, त्याचेही पैसे चव्हाणांनी त्यांना देऊ केले पण त्यांनी ते घेतले नाहीत.

    अमेरिका आणि नेदरलँडवरुन त्यांच्या मुलांनी फोन करून त्यांची चौकशी केली. चव्हाण त्यांच्याशी बोलले खरे, पण ही मुलं अजून आपल्याला भेटायला आली नाहीत, याचा त्यांना राग आला.

    आपल्या आयुष्याचं आता काही खरं नाही, याची चव्हाणांना जाणीव झाली होती. मरणाअगोदर एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणं आवश्यक होतं. ते वकीलाकडे पोहोचले. मृत्युपत्र करण्याची इच्छा त्याला सांगितली…

    “सांगा साहेब मी लिहून घेतो,” वकील म्हणाले.

    “वृद्धाश्रमाला दहा लाख, अनाथ मुलांच्या संस्थेला पाच लाख… युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या गरीब मुलांसाठी पाच लाख शिष्यवृत्ती, मुंबईतला फ्लॅट विकून त्याची येणारी रक्कम, जी साधारण दोन-तीन कोटीच्या आसपास असेल ती अंध, अपंग मुलांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. पुण्यातले दोन आणि नाशिकमधले दोन फ्लॅट आणि गावातले चार प्लॉट विकून जे आठ-दहा कोटी येतील त्याचं एक नाट्यगृह माझ्या पत्नीच्या नावाने बांधण्यात यावं. याची पूर्ण जबाबदारी माझे शेजारी कुलकर्णी यांना देण्यात यावी.”

    हेही वाचा – चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    “तुम्ही रहाता तो बंगला कोणत्या मुलाच्या नावावर करणार आहात?” वकिलांनी विचारलं.

    “नाही, तो बंगला माझे शेजारी कुलकर्णी यांच्या नावावर मी करणार आहे.”

    “काय्य्य? शेजाऱ्यांच्या नावावर? अहो साहेब, मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर तर करा! असं काय केलं त्यांनी तुमच्यासाठी?”

    “अहो साहेब, आज मी तुमच्यासमोर बसलो आहे, ते केवळ तो माणूस आणि त्याच्या कुटुंबामुळे. माझी मुलं आणि नातेवाईकांनी मला कधीच प्रेम दिलं नाही. पण या माणसाने मला कायम वडिलांसारखी वागणूक दिली. त्याच्या कुटुंबानेही मला खूप प्रेम दिलं. मला कधी एकटं वाटू दिलं नाही. ते नसते तर मी कधीचाच मरून गेलो असतो. माझी बायपास झाली. 15 दिवस हलला नाही तो माणूस माझ्यापासून. तो ना माझ्या जातीचा ना पातीचा पण त्याने जे केलं त्याला तोड नाही. त्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. हा बंगला तर क्षुल्लक गोष्ट आहे,” बोलताबोलता चव्हाणांना गहिवरून आलं.

    “चव्हाण साहेब कशावरून तुमच्या प्रॉपर्टीसाठी त्यांनी हे केलं नसेल?”

    “वकीलसाहेब माझी 99% लाकडं मसणात गेली आहेत. मला माणसांची पारख नाही, असं तुम्हाला म्हणायचं की काय?”

    चव्हाण संतापून बोलले तसे वकीलसाहेब चपापले.

    “गावाकडे तुमचं शेत आहे ना? त्याचं काय?”

    “ते मुलांच्या नावावर करा. भारतातल्या खेड्यातले लोक कसं जीवन जगतात आणि शेती करणं किती अवघड आहे, हे त्यांना त्यामुळे कळेल. त्या 200 एकर शेतावर जी माणसं जगताहेत, त्यांना तसंच जगू द्यावं, असं मला वाटतंय. पण तो निर्णय मुलांनी घ्यावा…”

    “ठीक आहे. मी कागदपत्र बनवून तुम्हाला सह्या करायला बोलावतो.”

    समाधानी होऊन चव्हाण घरी परतले. संध्याकाळी कुलकर्णी घरी आले…

    “काका, एका व्यापारी मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी मला अमेरिकेत जायची संधी आलीय. तुमच्या मुलाचा पत्ता द्या, जमलं तर भेटेन म्हणतो.”

    “पत्ता देतो, पण ती दोघं नवराबायको नोकरी करतात. त्यांच्याकडून चांगल्या पाहुणचाराची अपेक्षा ठेवू नका”

    “छे छे! मी फक्त एक तासासाठी भेटायला जाणार आहे.”

    कुलकर्णी अमेरिकेत जाऊन आले. चव्हाणांच्या मुलाशी चांगल्या गप्पा झाल्या, असं ते म्हणाले.

    एक महिन्याने त्यांच्या मुलाचा अमेरिकेतून फोन आला… “पप्पा एक आनंदाची गोष्ट सांगतो, मी आणि परेश कुटुंबासहीत भारतात येतोय. पुण्यात मला नोकरी मिळालीय आणि परेश तिथे एक इंडस्ट्री सुरू करतोय. कोथरुडला आम्ही एक बंगला खरेदी केलाय. त्यात आपण सगळे एकत्र राहू.”

    “काय सांगतोस काय?” चव्हाण आनंदाने ओरडले… “अरे पण एवढा मोठा डिसिजन तुम्ही कसा काय घेतलात?”

    “अहो, मागच्या महिन्यात ते कुलकर्णी आले होते, त्यांनी आम्हाला खूप समजावलं. योगायोगाने परेशही त्यावेळी इथेच होता. शेवटच्या दिवसांत तरी तुमच्या वडिलांना नातवंडांचं सुख मिळू द्या, असा त्यांनी आग्रह धरला. आम्हालाही ते पटलं. शिवाय आता मुलं मोठी होताहेत. त्यांच्यावर भारतीय संस्कार व्हावेत, असंही आम्हाला वाटू लागलं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.”

    चव्हाणांना आनंदाने उड्या माराव्या असं वाटू लागलं.

    “…आणि पप्पा, सगळी प्रॉपर्टी कशी डिस्पोज करायची, ते तुम्ही ठरवा. आम्हांला त्यातला एक रुपयासुद्धा नको. आम्ही तुमच्यासाठी कधीच काही केलं नाही. तुमच्या आजारपणात, जेव्हा तुम्हाला आमची खूप गरज होती, तेव्हाही आम्ही तुमच्यासोबत नव्हतो. आमचा तुमच्या संपत्तीवर काहीही हक्क नाहीये.”

    चव्हाणांना एकदम हायसं वाटलं. मुलांनी प्रॉपर्टीसाठी तर हा निर्णय घेतला नाही, ही त्यांना मघापासून छळणारी शंका फोल ठरली. त्यांना एकदम आपल्या मृत्युपत्राची आठवण झाली. त्यांनी लगेच वकिलांना फोन केला…

    “वकीलसाहेब मुलं भारतात परत येताहेत. मी पुण्याकडे त्यांच्याकडे रहायला जाणार आहे. आता आपल्याला मृत्युपत्रात काही बदल करावा लागणार आहे.”

    “कुलकर्णींना बंगला द्यायचा निर्णय तुम्ही बदलला की काय?” वकिलांनी हसत विचारलं.

    “अजिबात नाही. उलट तो अजून पक्का झालाय… कारण त्यांच्यामुळेच या चांगल्या घटना घडल्या आहेत. माझ्या नातवांसाठी मी काही ठेवू इच्छितो… आणि हो, कुलकर्णींच्या मुलीच्या लग्नासाठी पाच लाख आणि मुलाच्या शिक्षणासाठी पाच लाख ॲड करा. शेवटी तीही माझीच नातवंडं आहेत, नाही का?”

    समाप्त

    (ही कथा माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे.)

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    बापाची माया..

    October 14, 2026 ललित

    पहिला पाऊस आणि भिजायची हौस

    October 14, 2026 ललित

    विश्वास

    October 13, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बापाची माया..

    By ॲड. कृष्णा पाटीलOctober 14, 2026

    पूर्वार्ध “उंबऱ्याच्या आत मी तुझा पाहिजे तेवढा लाड करू शकतो. पण उंबऱ्याच्या बाहेरचं जग खूप…

    पहिला पाऊस आणि भिजायची हौस

    October 14, 2026

    विश्वास

    October 13, 2026

    लॉकडाऊन

    October 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026

    पहिला पाऊस आणि भिजायची हौस

    October 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सांग पां धनुर्धरा, रावो रायपणें डोंगरा

    October 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑक्टोबर 2026

    October 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 469
    • अवांतर 217
    • आरोग्य 158
    • पंचांग आणि भविष्य 629
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 31
    • ललित 993
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.