चिंचा विकत असलेल्या एक ताई रस्त्यावर दिसल्या. त्यांना बघून माझे मन एकदम खूप मागे गेले. शाळा डोळ्यासमोर आली… शाळेच्या दारात बसून चिंचा, आवळे विकणाऱ्या मावशी आठवल्या. मैत्रिणींबरोबर शाळेत जाताना किती आनंद असायचा नाही का? त्यावेळी घराजवळ असलेल्या शाळेत प्रवेश घेतला जायचा. पायी पायी मैत्रिणींशी गप्पा मारत रमत गमत शाळेत जायचं. त्यावेळेस गृहपाठ, वर्गपाठाची वही आणि त्या विषयाचं पुस्तक दप्तरात असे. पण त्याचं ‘ओझं’ कधी वाटलं नाही.
मीना माझ्याकडे येत असे. तिच्याकडे आवळ्याचे झाड होते. ती खिसा भरून आवळे आणायची. रस्त्याने खात खात जायचं. मग आम्ही दोघी वाट वाकडी करून दयाकडे जात असू… दयाचं घर खूप मोठं होतं. मागेपुढे बाग होती. तिच्याकडे स्वयंपाकाला बाई होती, याचं आम्हाला कौतुक वाटायचं. दया आमची वाट पाहात असायची. सगळ्या वर्गात तिचा एकटीचा ड्रेस इस्त्री केलेला असायचा. ती श्रीमंत होती. पण त्याचा कधी ती गर्व बाळगत नसे. हे आता लक्षात येते!
मग तिथून पुढे आम्ही तिघी सरोजकडे जात असू. ती बाहेर दिसली नाही, की हाक मारायची. “आले… आले” म्हणत ती बाहेर यायची. तिचे केस खूप लांब होते. शाळेचा नियम होता की, दोन वेण्या घालायच्या आणि त्या काळ्या रीबिनीने वर बांधायच्या.
काही वेळेस तिच्या वेण्या कशातरीच असायच्या. मग ती सांगायची… “काही नाही, नेहमीचंच… आई सकाळीच बाजूला बसलीय…”
ती हिरमुसायची… “ताईला येत नाही गं माझी वेणी घालायला…” तिची ताई तिच्यापेक्षा फक्त दीड वर्षांनी मोठी होती. तिच्या वेणीवरून सगळ्या वर्गाला समजायचे…
हेही वाचा – मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा
आमच्या वर्गात रेळे नावाची मुलगी नवीन आली. तिने सांगितलं की, तिची आई कधी बाजूला बसतच नाही. आम्हाला तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं. घरी गेल्या गेल्या मी आईला विचारलं, तर ती म्हणाली,
“आधी हात-पाय धू, डबा घासायला टाक, दप्तर जागेवर ठेव.”
“अगं पण सांग ना…”
आई म्हणाली, “मोठी झालीस की, तुला आपोआप कळेल… पोळीचा लाडू ठेवलाय तो खाऊन घे.”
लाडू म्हटल्यावर तो विषय मी विसरून गेले… किती निरागस मन आणि भोळं वय होतं तेव्हा!
आमची चौकडी मग प्रभाकडे जात असे. ती शाळेसमोर राहात होती. पण आम्ही आल्याशिवाय ती शाळेत जात नसे. तिची आई खाद्यपदार्थ करून विकायची. त्यावेळेस आम्हाला शाळेत फक्त पोळी-भाजी डब्यात आणायची परवानगी होती. प्रभाच्या आईला खोबऱ्याच्या वड्यांची ऑर्डर असली की, आमच्यासाठी ती वड्या घेऊन यायची. मग आम्ही डबा खाल्ल्यानंतर गुपचूप सर्वांच्या नकळत त्या वड्या खात होतो… त्याची गंमत काही औरच असायची.
आम्हाला चौघींना घरून कधी खाऊला पैसे मिळायचे नाही. पण दयाला तिचे वडील कधीतरी तिला पैसे द्यायचे. त्या दिवशी ती सांगायची, “आज मला बाबांनी खाऊला दहा पैसे दिलेले आहेत…”
आम्ही पाच जणी एकदम खूश! कारण दया आम्हाला सोडून कधीही काही खायची नाही. सुट्टीची घंटा झाली की, दया पळत पळत दारातल्या चिंचवाल्या मावशींकडे जाऊन चिंचा घेऊन यायची. त्यादिवशी पोळी-भाजीचा डबा पटकन संपायचा. डबा कट्ट्यावर बसून खायचा. पण चिंचा खायला ‘जंगलजिम’वर जात असू… तिथे बसून चिंचा खाण्यात काहीतरी खूप विशेष गोष्ट केली आहे, असं वाटायचे. तेव्हा साध्या साध्या गोष्टीतही अपार आनंद मिळायचा.
का कोण जाणे, पण आज चिंचा विकणाऱ्या ताईंमुळे हे सगळं आठवलं… हल्ली मन असंच कधीतरी अचानक मागे जातं… तिथेच रेंगाळतं… आठवणींमध्ये रमून जातं… त्यावेळचं सगळं काही लख्ख नजरेसमोर दिसतं…
हेही वाचा – ते दोघे…
शाळेने खूप काही शिकवलं. तसंच हा न विसरता येणारा आनंद आणि मैत्रिणी पण दिल्या. आजही त्या तेवढ्याच आठवतात… आणि मन प्रफुल्लित करतात! शाळेत अभ्यास, परीक्षा होती… पण नंतर सुट्टी असायची. मोठं झाल की, लक्षात येते… जीवन हीच एक परीक्षा आहे तिथे सुट्टी नाहीच… म्हणून आपल्या मनानेच सुट्टी घ्यायची… असंच आपलं आपण कुठेतरी भटकून यायचं. भूतकाळातल्या आठवणी काढत… अपार आनंद मिळतो…
तुम्हाला आठवते का तुमची शाळा?
खरंच सांगते… परत एकदा त्या रस्त्यावरून जाऊन या… खूप छान वाटते… पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलसमोरून जाताना अजूनही ही माझी शाळा…. असं मनात येते. चिंचवाल्या मावशी दारात बसल्याचा भासही होतो…
तुम्ही पण बघा ना… एकदा हा अनुभव घेऊन! त्याच्या इतका निखालस आनंद कशातही नाही…


