सकाळी बागेत चालायला गेले होते. नेहमीचा ग्रुप बसला होता. सगळ्याजणी पासष्ठ ते पंच्याहत्तरीच्या आहेत. एक, दोन राऊंड घेऊन थोडा वेळ गप्पा मारत बसतात. संगीताचा खणखणीत आवाज लांबूनच कानी आला…
“इतकं गुण्यागोविंदानी शांततेत सगळं जग चाललं होतं, तर मी म्हणते कशाला भांडणं उकरून काढायची?”
“हो गं खरंच, त्या ट्रम्पला युद्ध करायची काय गरज होती?”
जया म्हणाली, “त्यांचंही काहीतरी कारण असेल ना? त्याशिवाय का कोणी युद्ध करेल?”
आज यांचा वेगळाच विषय ऐकून राऊंड न घेता मी तिकडेच गेले विचारलं, “आज काय इराण अमेरिका विषय का?”
“सध्याचा तोच ज्वलंत प्रश्न आहे. म्हणूनच आज आम्ही त्याची चर्चा करत आहोत. ये…”
मी त्यांच्या गप्पा ऐकायला बसले.
” माझं तर ठाम मत आहे, ट्रम्प यांचं चुकलंच!”
“म्हणजे तू इराणची बाजू घेणार आहेस का?”
“खरं म्हणजे मी तटस्थ भूमिकेत आहे. (हिचं मत कोण विचारणार आहे देव जाणे… मनात म्हटलं!) माझं म्हणणं इतकंच आहे की, युद्धानंतर होणारे भयानक विनाशकारी परिणाम विचारात घ्या.”
सुधाताई मधेच म्हणाल्या, “एकेकांना पट्ट्या मारून सरळ केलं पाहिजे…”
“अहो, पट्ट्या कसल्या मारताय? ती काय शाळा आहे का? मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड होऊन पंधरा वर्षे झाली… तरी अजून तीच शिक्षा सांगताय.”
हेही वाचा – मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!
“तुम्हाला समजलं नाही, मी प्रतिकात्मक बोलले. ज्याला जी भाषा समजते, त्याला तसं उत्तर दिलं तरच त्याला ते समजते.”
मधेच विनया म्हणाली, “पंचमहाभूतातील जल आणि ही चराचर सृष्टी, ईश्वराने सर्वांसाठी निर्माण केलेली आहे. अशा सखोल अध्यात्मिक विचारांची आपल्यासारखी त्यांना बैठक नाही. तिथे जाऊन कोणीतरी त्यांना हे शिकवायला पाहिजे.”
“हो, ते पण खरं आहे. तुझं हे म्हणणं मला अगदी पटलं! म्हणूनच शांततेत समाधान आहे… हे त्यांना कधी कळणार नाही.”
“मला तर वाटतं, त्या होर्मुझ का काय सामुद्रधुनीतून जहाजांनी एकमेकांना वाट करून द्यायची. जरा कडेकडेने जायचं… जा बाबा तुम्ही जा, आम्ही पण जातो! कोणी कोणत्या दिवशी जायचं आपापसात चर्चा करून ठरवून घ्यायचं. त्यासाठी युद्ध कशाला?”
“बरोबर आहे… आणि एखादी गोष्ट करायचीच, असं मनाने ठरवलं तर ती करता येते.”
“हो… आता रोजचच उदाहरण घे… पुण्यात कसं आम्ही छोट्या गल्लीत कार, टेम्पो, रिक्षा, स्कूटर, शिवाय कडेला भाजीवाले, भेळ पाणीपुरीवाले असले तरी त्यातून वाट काढत जातो.”
निशा लगेच म्हणाली, “याचं कसलं कौतुक? तुम्ही पुणेकर कशाचाही अभिमान बाळगता.”
“निशा, तुम्ही सोलापूरकर तर काही बोलूच नका. इतक्या वर्षांत तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. पाच दिवसांनी तुमच्याकडे पाणी येतंय!”
विनिता म्हणाली, “हो म्हणूनच तर पुढची पिढी पुण्यात राहायला येत आहे.”
“त्यांच्यामुळे इथल्या जागेचे भाव वाढले आहेत. पुढे या सर्वांना पाणी कसं पुरणार? हीच चिंता आम्हाला आहे.”
आता यांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरून एकदम जिल्हास्तरीयवर आली.
निशा म्हणाली,
“आमच्या सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी, हुरडा तुम्हाला आवडतो.”
“अगं, पण त्याचा इथे काय संबंध?”
खरंतर कशाचाच, कुणाचाही, कसलाच संबंध नव्हता. या मैत्रिणी बागेत येतात… येऊन कुठलीही मतं मांडतात. घरी त्यांचं कोणी ऐकत नाही आणि यांच्याशी बोलायला घरी कुणाला वेळही नाही!
इथं कसं मैत्रिणींशी काहीही बोलता येतं. वाट्टेल ती मतं मांडता येतात. आपण सगळ्या विषयांवर कसं बोलू शकतो… असं उगीच आपलं मनाचं समाधान करून घेता येतं… या सहज आनंदासाठी खरंतर सगळ्याजणी इथे जमतात…
स्वाती इतका वेळ गप्प होती. ती एकदम उभीच राहिली. म्हणाली, “अगं, आज संध्याकाळी मी कैरीची डाळ करून आणायचं ठरल आहे ना? ती भिजत घालायची आहे. आत्ता पाण्यात घातली तरच ती चांगली भिजेल.”
आता पाण्याची चर्चा एकदम वैयक्तिक पातळीवर आली… सगळ्या भानावर आल्या.
“हो गं, पाच-सहा तास तरी भिजली पाहिजे,” असं एकजण म्हणाली
मी स्वातीला विचारले, “कैरीची डाळ घेऊन कुठे जाणार आहेस?”
” अगं अनुकडे… तिचे मिस्टर बेड रिडन आहेत. ती बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही चार-पाच जणी अधून मधून तिच्याकडे जातो, गप्पा मारतो. तिचा दिवस चांगला जातो.”
संगीता म्हणाली, “मी गोड करंज्या नेणार आहे. ती विचारत असते मी काय करू? वय झालं… दमते गं बिचारी… म्हणून तिला सांगितल आहे, तू फक्त पाणी दे.”
हेही वाचा – गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…
“आमची अगदी वाट पाहत असते… चला निघू या…”
“ए सोलापूरकर गुडघे दुखतात ना? चालत जाऊ नको, मी गाडीवर सोडते तुला घरी.”
दोघींनी तिचा हात धरला. सगळ्याजणी घरी निघाल्या.
खरंच, मनात सामंजस्य, प्रेम, माया, आपुलकी, आपलेपणा असला की, अनेक प्रश्न सोडवता येतात…
ट्रम्प साहेबांनी खरंतर आमच्या मैत्रिणींशी बोलून त्यांचा सल्ला एकदा घेतला पाहिजे… आंतरराष्ट्रीय चर्चा करता करता करता सहजपणे रोजच्या जीवनातले प्रश्न सोडवणाऱ्या, हातात हात घालून एकमेकींना आधार देत घरी निघालेल्या या मैत्रिणींची मैत्री बघून माझ्या डोळ्यांत आपोआप पाणी आलं…


