घटस्थापना होऊन देवी आईचा नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. ती देवी कशी आहे? नीट बघा… फुलांनी सजवलेल्या देवघरात तिची स्थापना केलेली आहे. अखंड नंदादीप तेवत आहे. त्याच्या शांत प्रकाशात तिचे रूप न्याहाळून बघा… केसापासून पायाच्या नखांपर्यंत ती सर्वांग सुंदर आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी, प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. ती विश्वाची स्वामिनी, जगतजननी आहे. अशी ही देवी सुंदर, कोमल, शांत, समंजस, नाजूक आहे…
पण इतकंच तिचं वर्णन आहे का?
तर, नाही…
ती अष्टभुजा आहे. तिच्या प्रत्येक हातात गदा, चक्र, शंख, धनुष्य बाण, शूल, पाश, खड्ग अशी विविध आयुधं आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे… ती चंडिका आहे. प्रत्यक्ष देवांनीही तिची स्तुती केलेली आहे. अत्यंत नाजूक, शांत, कोमल पण वेळप्रसंगी उग्र, भयानक रूप धारण करून दुष्टांचा नाश करणारी आहे.
जेव्हा असुर उन्मत्त झाले, तेव्हा तिने अवतार धारण करून राक्षसांचा नाश केला. पराक्रम, शौर्य आणि अन्यायाविरुद्ध लढाईची प्रेरणा देणारी, अशी ही देवी आहे. या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता…
एक स्त्री म्हणून आता बघूया!
ती आपल्यासारखीच आहे. या देवीचा दैवी अंश आपल्याही प्रत्येकाच्या शरीरात आहे. आपण देवीची प्रार्थना करूया. प्रार्थना करून झाली की, आपण तिच्याकडे काहीतरी मागतो. आता असा विचार करा की काय मागायचे?
लौकिकात जे हवं आहे, ते सगळे मागून झालेले आहे. जे आहे त्यात आपण समाधानी आणि तृप्त आहोत. आता तिच्याकडे थोडं वेगळं काही मागू या… तिच्याकडे असलेली राक्षसांशी लढण्याची प्रचंड शक्ती… तीच आता हवी आहे…
राक्षस म्हटलं की, अतिभयंकर, क्रूर, अक्राळविक्राळ असं काहीसं स्वरूप आपल्यासमोर येतं. पण लक्षात घ्या की, राक्षस ही एक वृत्ती पण आहे. ती विचारांत, शब्दांत, कृतीतही असू शकते. ते प्रचंड मोठे, भयानक आकाराचे असतात असे नाही. काही मनाला नकळत, सूक्ष्मपणे सतत त्रास देत राहतात. काही बहुरूप्यासारखे असतात. वरून गोड गोड बोलून फसवणारे… त्यांच्यातला राक्षस ओळखायला शिकूया!
हेही वाचा – माझी गौरी माय
आपण या सर्वांशी लढूया…
अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात. त्यासाठी देवी सहाय्य करेलच. त्याबरोबर आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे. हे लक्षात ठेवायला हवे. सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत.
अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करा. आपण सतत कशाला तरी भीत असतो… एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला सुद्धा अंगी सामर्थ्य यावं लागतं. ते यायला हवं… तसंच वेळ प्रसंगी शांत राहण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते. ‘मौन’ ही आपली आपण आपल्याशीच लढलेली लढाई असते. ती जिंकता आली पाहिजे. अपप्रवृत्तींचा नाशही करायला हवा आहे… त्यासाठी आपल्या अंगात जोशही यायला हवा… शत्रूला भ्यायचं नाही तर, त्याच्याशी सामना करायचा… निकराने आणि सर्व शक्तीनिशी!
लढायचं… असं ती आपल्याला शिकवते. देवी कशी दैत्यांचा पूर्णपणे संहार करते… मगच थांबते. ते आपण तिच्याकडून शिकायला हवे आहे. विजय मिळेपर्यंत झुंजायचं ही तिची वृत्ती आपणही अंगी बाणूया.वे ळप्रसंगी आपल्यालाही दुर्गेचं रूप धारण करण्याची गरज आहे…
देवीचं गुणगान करा. श्री सूक्त, कुंकुमार्चन, देवी अथर्वशीर्ष, सप्तशतीचा पाठ हे सर्व काही करा. शंकराचार्यांनी रचलेली देवीची स्तोत्र खूप सुरेख, नादमय, जोशपूर्ण आहेत… ती पाठ करा. ती म्हणताना विलक्षण आनंद होतो. देवीची गाणी म्हणा. टाळ हातात घेऊन खणखणीत आवाजात आरती करा. तुमची तुम्हालाच ऊर्जा जाणवेल…
आता तिच्याकडे ही प्रार्थना करा –
‘हे देवी मला निर्भय आणि सबल कर… आज जगात वावरताना प्रत्येकाला/ प्रत्येकीला असं बनायला हवं आहे.’ तसेच तिला आश्वासन द्या की, ‘मी सुद्धा माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन…’ तो मनापासून करा.
देवी यश देईलच.
दोन भुजा असलेल्या अनेक जणी अष्टभुजा असल्यासारख्या अनेक आघाड्यांवर लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत. त्यांच्यात अफाट क्षमता आहे. त्यांचं आत्मभान जागृत आहे. तुम्ही थोडा विचार केलात तर, तुमच्या समोरही अनेक नावे येतील. त्यांच्या इतकं आपल्याला जमलं नाही तरी चालेल… पण आपण थोडा प्रयत्न जरूर करूया. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या. आईचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच.
हेही वाचा – गौरीमायला निरोप…
सप्तशतीत देवीचे वर्णन करताना मातृरूपेण संस्थिता, लक्ष्मी रुपेण संस्थिता इत्यादी वर्णनानंतर देवीच वर्णन “शक्तीरूपेण संस्थिता” असंही आहे… हे आपण निश्चित लक्षात ठेवूया.
अशा या महिषासुरमर्दिनीला माझा नम्रपणे मनापासून नमस्कार. लक्षात ठेवायचं की, नवरात्र हा केवळ उत्सव नाही. देवी रूपातील स्त्रीशक्तीची आपण पूजा करायची आहे. शक्ती रूपात असलेल्या देवीची उपासना करायची आहे. आपली आत्मिक शक्ती जागृत करण्याचा हा पर्वकाळ आहे…
जगतजननी आई तुझ्यासमोर पदर पसरून एक जोगवा मागते गं…
तू आम्हाला आंतरिक बळ दे… शक्ती दे… ऊर्जा दे… आणि संकटाशी सामना करायला हिंमत दे.


