पहाटेच्या वेळी गावाजवळून वाहणारी नदी पाहिली की, एक गोष्ट सहज लक्षात येते. नदी वाहते आहे, पण तिच्या प्रवाहामध्ये थकवा नाहीये. ती पर्वत ओलांडतेय, दऱ्या पार करतेय, किनाऱ्यावरच्या खडकांना भिजवत, हलकासा स्पर्श करतेय, असंख्य वळणे घेतेय, तरी तिच्या प्रवासामध्ये कुठल्याच ओझ्याचा आक्रोश नाही.
नदीला वाहणे हेच कर्तव्य दिलेले आहे. तिच्या मनात परोपकाराची, देण्याची, सेवेची भावना आहे. म्हणून तिला तिचे कार्य हे ओझे कधीही होणार नाही. कर्तव्य जेव्हा स्वभाव बनतो, तेव्हा श्रम पडतील पण थकवा मागे राहणार नाही. प्रवास सुरुच राहील अंतर तेवढेच असेल पण मनात तक्रार राहणार नाही.
माणसाचे जीवनही यापेक्षा वेगळे नाही. प्रत्येकाला काही भूमिका लाभतात. कोणी माता, तर कोणी पिता म्हणून जन्म घेतलेला असेल, कोणी शिक्षक असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी चिकित्सक असेल, तर क्वचित कोणी साधक असेल. या भूमिका जीवनाने, ईश्वराने काही हेतूने त्यांना दिलेल्या असतात. त्यांचे पालन करणे म्हणजे कर्तव्य. परंतु त्यांच्याभोवती आपण विणलेला अहंकार, अपेक्षा, मानापमान, भीती, तुलना आणि भविष्याची चिंता यांचे जे अदृश्य आवरण तयार होते, त्याचे नाव ओझे.
हेही वाचा- सुसंगती… साधनेचा सुंदर मार्ग
कर्तव्य झेपणारे असते. न झेपणारे ओझे आत असते. कर्तव्य हाताने, शरीराने होत असले तरी ओझे मात्र मनच वाहते. कर्तव्य वर्तमानात घडते. ओझे भूतकाळ आणि भविष्य यांच्या दरम्यान अडकून बसते.
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनावरचे युद्धाचे ओझे उतरवले. समोर प्रत्यक्ष महाभारत घडणार होते. आपल्यासमोर महाभारत तर नाहीये ना? मग ओझे आपण उतरवू शकू की नाही हे स्वतःलाच विचारुन पाहिले पाहिजे. आणि मनावरचे ओझे उतरणारच नसेल तर का? हा प्रश्न देखील आपण स्वतःला विचारला पाहिजे.
मान्य की, आपल्यासमोरही युद्धच आहे, पण युद्ध कर्तव्य म्हणून स्वीकारले की त्याचा योग होतो. अहंकार, मोह आणि फलाची आसक्ती यांच्याशी बांधले की मग मात्र ते ओझे होते. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतात,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
या वचनात कर्मयोगाचे पूर्ण तत्त्व दडले आहे. ही कर्म सोडण्याची आज्ञा नाही तर कर्माला ओझे बनवणारी आसक्ती सोडायची आहे.
कर्तव्यं निर्मलं नित्यं जीवनस्य विभूषणम्।
आसक्तिर्भाररूपेण बध्नाति हृदयं नृणाम्॥
यः करोति समत्वेन स्वधर्मं विनयान्वितः।
तस्य कर्मैव साधना तस्य जीवनमर्चनम्॥
(गीताव्रत साधना)
एका आश्रमामध्ये एक वृद्ध संत राहात होते. त्यांच्याकडे दोन शिष्य आले. दोघांनाही एकसारखे काम देण्यात आले. आश्रमाजवळील डोंगरावरून दररोज पाण्याचे दोन माठ आणायचे. काही दिवसांनी पहिला शिष्य म्हणाला, “गुरुदेव, हे काम फार जड आणि कठीण आहे. माझा सगळा दिवस यामध्येच जातो.” दुसरा शिष्य मात्र अगदी शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर छान प्रसन्नता होती. संतांनी दोघांनाही जवळ बोलावले आणि विचारले, “तुम्ही दोघे एकाच वाटेने जाता, एकसारखे वजनाचे माठ उचलता, एकाच अंतरावरून पाणी आणता. पण मग एक थकतो आहे आणि दुसरा प्रसन्न दिसतो आहे असे
दुसरा शिष्य नम्रपणे म्हणाला, “गुरुदेव, मी माठ उचलतो. पण शरीराने. माठ माझ्या मनावर ठेवत नाही.” संत म्हणाले, “आज तुला जीवनाचे रहस्य समजले. साधक म्हणून जगण्यास पात्र झालास! ”
माणूस कामामुळे थकत नाहीत. व्यायामामुळे थकत नाही. उलट उत्तम कर्माच्या सरावाने प्रसन्नता वाढते. आपण कष्ट केले नाहीत, व्यायाम केला नाही तर आपले स्नायू कमकुवत होतात. पण ते कष्ट मनापासून केले गेले पाहिजेत.
हेही वाचा- माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?
आनंदाने केलेले काम कधी थकवत नाही. म्हणून तर आई कधी थकत नाही.
कामाभोवती मनाने उभे केलेले अदृश्य गाठोडे मात्र थकवत जाते. आपल्या अपेक्षा प्रचंड असतात, कित्येकदा त्या उगाच असतात. आपल्याला प्रत्येक कृतीसोबत मान्यता हवी, प्रत्येक प्रयत्नानंतर कोणाकडून तरी कौतुक हवे, प्रत्येक नात्यात अपेक्षा भरुन उरल्या आहेत. प्रत्येक दिवस उद्याच्या भीतीने भरलेला असावा, अशी वृत्ती मनाला थकवते. संत तुकाराम महाराज म्हणतात,
ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असो द्यावे समाधान॥
समाधान म्हणजे कर्तव्य. ते करीत असताना मनाला ओझ्यापासून मुक्त ठेवणे.
निसर्गाकडे पाहिले तर हा धडा प्रत्येक क्षणी दिसतो. वृक्षाला फळे लगडतात, पण फळांचे ओझे वृक्षाला थकवत नाही. आई नऊ महिने पोटामध्ये बाळाचे ओझे आनंदाने सांभाळते. ओझे होत नसेल का? पण ते ओझे आईला वाटत नाही. अजून आई व्हायची आहे. पण ती मनाने आई झाली आहे. ती बाळाचे ओझे मनात साठवत नाही.
सूर्य रोज उगवतो, पण कालच्या प्रकाशाची नोंद ठेवत नाही. माझी किरणे तू का अडवतोस आज पासून मी तुला प्रकाश देणार नाही असे म्हणत नाही. नदी किनाऱ्यांना स्पर्श करते, पण प्रत्येक त्रासदायक वळणाची आठवण बाळगत नाही. म्हणूनच निसर्ग थकत नाही. तो अखंड सर्जनशील राहतो.
आपणही स्वतःला एक प्रश्न विचारलाच पाहिजे. मी आज कर्तव्य करीत आहे की, नको वाटणारे कर्माचे ओझे मी वाहत आहे? या प्रश्नाचे उत्तर आपल्या अंतर्मनाने देणे आवश्यक आहे. ते स्वतःला कसे विचारायचे हे आपले आपल्यालाच ठरवावे लागेल.
भारो न कर्मणि प्रोक्तो भारो मोहसमुद्भवः।
कर्तव्यं यत्स्वभावेन तत्सुखस्यैव कारणम्॥
यदा त्यजति सङ्गं वै मानदर्पफलाशिषाम्।
तदा प्रत्येककर्मापि भवतीश्वरपूजनम्॥
(गीताव्रत साधना)
साधकाची ओळख त्याने किती कामे केली यावरून होणार नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत तो किती राब राब राबला याने किमान साधकाची तरी ओळख निर्माण होत नाही. साधकाची ओळख त्याने मनावरची डोक्यावरची किती ओझी खाली ठेवली यावरून होते.
परमेश्वराला आपल्या हातातील कर्मापेक्षा अंतःकरणातील निर्मळता अधिक प्रिय असते.
थेंब समुद्रापर्यंत पोहोचतो, कारण तो पाण्याचा स्वभाव आहे. तो थेंब दगड होण्याचा प्रयत्न करत नाही. अडून रहात नाही, हट्ट करत नाही.
साधक आपल्या कर्तव्याला ईश्वरार्पण मानू लागला की, त्याच्या जीवनातील प्रत्येक दिवस साधना होते. पुढेही काम पूर्वीसारखेच असते, जबाबदाऱ्या पूर्वीसारख्याच असतात, जगही पूर्वीसारखेच असते. पण बदललेले असते ते फक्त मन. आणि जेव्हा मन हलके होते, तेव्हा जीवनाला, जगण्याला, आनंदाला अक्षरशः पंख फुटतात.
म्हणूनच साधकाने कर्तव्यापासून दूर जाऊ नये. पण ओझ्यापासून लगेच मुक्त व्हावे. कारण कर्तव्य जीवन घडवते, तर ओझे जगणे कठीण करते, जणू जीवन थकवते. आणि ज्या दिवशी कर्तव्याला प्रेमाची, समत्वाची आणि ईश्वरार्पणाची दिशा मिळते, त्या दिवशी आपली साधना सुरू होते. त्या दिवसापासून चालणारा माणूस प्रवासी राहत नाही. तो स्वत: प्रवाह बनतो.


