अध्याय चौदावा
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् । तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् ॥7॥
हें रज याचि कारणें । जीवातें रंजऊं जाणे । हें अभिलाखाचें तरुणें । सदाचि गा ॥160॥ हें जीवीं मोटकें रिगे । आणि कामाचां मदीं लागे । मग वारया वळघे । चिंतेचिया ॥161॥ घृतें आंबुखूनि आगियाळें । वज्राग्नीचें सादुकलें । आतां बहु थेंकुलें । आहे तेथ ॥162॥ तैसी खवळें चाड । होय दुःखासकट गोड । इंद्रश्रीहि सांकड । गमों लागे ॥163॥ तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरुही हाता आलिया । तऱ्ही म्हणे एखादिया । दारुणाहि वळघो ॥164॥ आजि असतें वेंचिजेल । परी पाहे काय कीजेल । ऐसा पांगीं वडील । व्यवसाय मांडी ॥165॥ जीविताचि कुरोंडी । वोवाळूं लागे कवडी । मानी तृणाचिये जोडी । कृतकृत्यता ॥166॥ म्हणे स्वर्गा हन जावें । तरी काय तेथें खावें । ययालागीं धांवें । याग करूं ॥167॥ व्रतापाठीं व्रतें । आचरें इष्टापूर्तें । काम्यावांचूनि हातें । शिवणें नाहीं ॥168॥ पैं ग्रीष्मांतींचा वारा । विसवों नेणें वीरा । तैसा न म्हणे व्यापारा । रातिदिवो ॥169॥ काय चंचळु मासा । कामिनीकटाक्षु जैसा । लवलाहो तैसा । विजू नाहीं ॥170॥ तेतुलेनि गा वेगें । स्वर्गसंसारपांगें । आगीमाजीं रिगे । क्रियांचिये ॥171॥ ऐसा देहीं देहावेगळा । ले तृष्णेचिया सांखळा । खटाटोपु वाहे गळां । व्यापाराचा ॥172॥ हें रजोगुणाचें दारुण । देहीं देहियासी बंधन । परिस आतां विंदाण । तमाचें तें ॥173॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम
अर्थ
रजोगुण हा अभिलाषरूप असून तृष्णा व आसक्ति ही यापासून उत्पन्न होतात असे समज. हे कौंतेया, तो कर्मपाशाने (म्हणजे मी अमुक करीन, मी तमुक करीन, अशा तृष्णेने) प्राण्याला बद्ध करतो ॥7॥
रजोगुणाला रज हे नाव याच कारणाकरिता आहे की, जो रजोगुण जीवाला विषयात रंजविण्याची कला जाणतो व हा रजोगुण हा अभिलाषाचे (लोभाचे) नेहेमीचे (कधी कमी न होणारे) तारुण्य आहे. ॥160॥ या रजोगुणाने अंत:करणात थोडासा प्रवेश केल्याबरोबर, तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वार्यावर स्वार होतो. ॥161॥ पेटलेल्या अग्निकुंडात तूप शिंपडले व त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झाले असता त्या अग्नीस हे कमी आहे अथवा हे जास्त आहे, असे म्हणता येईल काय? ॥162॥ त्याप्रमाणे इच्छा खवळते व दु:खासकट सर्व गोष्टी गोड वाटतात व इंद्राचे वैभव- (ऐश्वर्य) सुद्धा थोडे वाटू लागते. ॥163॥ तशा प्रकारे इच्छा वाढल्यावर मग जरी मेरु पर्वत हाती आला, तरी (तो) असे म्हणतो की, यापेक्षाही आणखी भयंकर श्रमाने मिळणारे असे एखादे स्थान असेल, तर तेही मिळविण्याच्या खटपटीस लागू. ॥164॥ जवळचे असलेले आज खर्च केले तर उद्या काय करावे, असा तो अतितृष्णेने मोठ्या धंद्याला आरंभ करतो ॥165॥ कवडीवरून आपले जीवित ओवाळून टाकतो आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीने कृतकृत्यता (जन्माला आल्याचे सार्थक) समजतो. ॥166॥ स्वर्गाला गेले असता तेथे काय खावे असे म्हणतो व म्हणून याकरिता यज्ञ करण्यास धावतो. ॥167॥ व्रतामागे व्रते आचरण करतो; इष्ट व पूर्त कर्मे करतो व काम्य कर्मावाचून दुसर्या कशाला हाताने स्पर्श करीत नाही. ॥168॥ हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूचा शेवटला वारा एक क्षणभर विश्रांती घेणे जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही. ॥169॥ रजोगुणापुढे मासा कसला चंचल आहे? जसा स्त्रीचा नेत्रकटाक्ष चंचल असतो, तसा तो रजोगुणी पुरुष चंचल असतो. विजेमध्येही तसा चंचलतेचा वेग नसतो. ॥170॥ तितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नीमधे प्रवेश करतो. ॥171॥ देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामध्ये असतो तेव्हा तृष्णेची बेडी (आपल्या पायामधे) अडकवून, याप्रमाणे व्यापाराचा खटाटोप आपल्या गळ्यात अडकवून घेतो. ॥172॥ देहधारी जो आत्मा त्यास देहामधे असतांना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते. आता तमोगुणाचे कौशल्य ऐक. ॥173॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे


