गोष्ट खूप जुनी. फारसे चढउतार नसलेली. तरीही छान आठवण… माझ्यासाठी तरी!
मी मॅट्रिक पास झालो आणि कॉलेजमध्ये जायची गडबड सुरू झाली. आमच्या गावाची लोकसंख्या बऱ्यापैकी. दोन-तीन वर्षांपूर्वीच कॉलेज उघडलेले; पण गावापासून चार किलोमीटर दूर. साहजिकच मी अप्पांकडे म्हणजे माझ्या वडिलांकडे नवीन सायकल घेण्यासाठी भूणभूण लावली. त्याकाळी नवीन सायकची किंमत 300 ते 400 रुपये होती. आम्ही खाऊन-पिऊन सुखी असलो तरी, एकदम एवढे पैसे अप्पांकडे नसायचे. त्यामुळे कोणाकडे तरी उधार पैसे मागण्याशिवाय पर्याय नव्हता. अप्पांची ही अडचण आमच्या घरमालकांच्या कानावर गेली. (आम्ही भाड्याच्या घरात राहायचो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.)
त्यांच्याकडे त्यांच्या मुलीसाठी घेतलेली लेडिज सायकल होती. तिने ती एक-दोन वर्षं वापरली. नंतर तिचे लग्न झाल्याने ती तशीच पडलेली होती. त्यांनी अप्पांना बोलवून, “कशाला नवीन सायकल घेता? आमच्याकडची सायकल चांगलीच आहे, फक्त पडून पडून थोडी खराब झालीय. पंक्चर काढून घ्या, ऑयलिंग करून घ्या, की झाले!” असं सांगून ती सायकल फुकट अप्पांना दिली… आणि खरोखर 30-40 रुपयांत ती उत्तम स्थितीत आली.
हेही वाचा – कहाणी सकिना अन् खुशबूची
सायकल मिळाल्याच्या आनंदात ती लेडीज असल्याकडे माझे दुर्लक्ष झाले. पण कॉलेजात जाऊ लागल्यानंतर थोड्या दिवसांत मला मित्र लेडीज सायकल चालवतो म्हणून चिडवू लागले. पण अप्पा काहीही झालं तरी, मला दुसरी सायकल घेऊन देणार नाहीत, हे पक्के माहिती असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले.
एव्हाना कॉलेजात मी रुळायला लागलो होतो. वर्गात आम्ही 35 मुलं तर 15 मुली. त्यातही एक मुसलमान सुंदर मुलगी आल्याचे आम्हाला कळलं होतं. ती दुसरीकडे रहाते, पण शिक्षण घेण्यासाठी मामाकडे आल्याचीही माहिती काही गुप्तहेरांनी काढली होती. त्याकाळी मुलंमुली एकमेकांशी गरजेपुरती बोलत. कोणी मुलगा एखाद्या मुलीशी 10 मिनिटे बोलला, तर अख्खं कॉलेज त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाही!
एकदा कॉलेजच्या व्हरांड्यात मित्रांशी गप्पा मारत असताना मागून “वैद्य…” अशी मंजूळ हाक ऐकू आली. गर्रकन मागे वळून पाहतो तर काय आमच्याच वर्गातली ती मुसलमान मुलगी! (तिचं नाव ‘शबीना’ आहे, हे एव्हाना समजलं होतं)
“वैद्य, तुझी सायकल देतो का जरा? नेमके आज मॅडम जर्नल तपासणार आणि मी वही घरी विसरले. आमच्या मैत्रिणींपैकी कोणाकडेही सायकल नाही.” ती शुद्ध मराठीत बोलली.
लेडीज सायकल असण्याचा मला पहिल्यांदाच आनंद झाला. ‘नाही’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मी मुकाटयाने चावी तिच्या हातात दिली. थोड्यावेळाने ‘थँक्यू’ म्हणून तिने ती परत आणून दिली.
असेच दिवस जात राहिले. समोरासमोर आल्यास स्मितहास्याची देवाणघेवाण व्हायची. पुन्हा एकदा त्याच गोड आवाजात तिची हाक ऐकू येताच, मी सायकलची चावी देण्यासाठी हात पुढे केला. ती हसतहसत म्हणाली, “सायकल नकोय आज. तू चंदनमल ॲण्ड सन्सच्या बाजूला राहतोस का?” मी मान डोलावली.
“अरे, मामीला कपडे धुवायचा गोटा साबण पाहिजे. तो फक्त त्याच्याकडेच मिळतो. तू आणून देशील, अर्धा डझन?” मी पुन्हा मान डोलावली. तिने पटकन पर्समधून पैसे काढले आणि माझ्या हातावर ठेवले. मीही दुसऱ्या दिवशी तिला साबण आणून दिले. मी तिच्या हातात साबणाचे पॅक ठेवताच ती म्हणाली, “थांब… तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे…” तिने पर्समधून एक लहानसं पाकीट काढलं…
“काही नाही रे. खजूर आहेत. अब्बा हजला गेले होते ना? तिथून आणले…” तिने पाकीट माझ्याकडे दिले आणि निघून गेली.
खजूर अप्रतिम होते. तोंडात टाकताच विरघळायचे.
एव्हाना, काही मित्र ती तुझ्याशीच का बोलते वै! म्हणून माझी फिरकी घ्यायचे. पण ज्या अर्थी ती माझ्याकडे येते आहे, त्याअर्थी तिचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्या विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा नव्हता.
कॉलेजमध्ये काही सण साजरे करायची पद्धत होती. त्यातलाच एक रक्षाबंधन. ज्या मुलींना कोणाला राखी बांधायची असेल, त्यांनी ती येताना घरून आणावी; मग वर्गात तिने त्याला बोलावून राखी बांधायची, असा कार्यक्रम असायचा.
त्यादिवशी सरांनी सांगितले, “ज्या मुलींना राखी बांधायचीय, त्यांनी एक-एक करून पुढे यावे.” पहिल्यांदाच उभी राहिली, ती शबीना. पांढरा शुभ्र ड्रेस आणि डोक्यावर ओढणी घेऊन ती खूप सुंदर आणि सोज्ज्वळ दिसत होती. स्टेजजवळ येता येताच तिने मला पुढे येण्याची खूण केली. सारा वर्ग एकदम स्तब्ध. मी पुढे आलो. मला सख्खी बहीण नव्हती. का कोण जाणे, पण ती राखी बांधत असताना माझ्या डोळ्यांत टचकन् पाणीच आले. माझ्या डोळ्यांतलं पाणी दिसलं तर, वर्गातील मुलं चिडवतील म्हणून मी घाईघाईने परत बेंचवर येऊन बसलो. मग लक्षात आलं, आपण तिच्या हातात काहीतरी पैसे द्यायला पाहिजे होते. त्यावेळेस खिशात पाकिटच नसायचे, तर पॉकेटमनी कुठून असणार?
घरी आल्या-आल्या आईला सर्व सांगितले आणि तिने अप्पांकडून सकाळी 10 रुपये घ्यायला लावले. लगेचच कॉलेजमध्ये तिला गाठले आणि तिच्या हातावर ती दहाची नोट ठेवली.
“हे कशासाठी?” तिचा सवाल.
“अगं, तू राखी बांधली म्हणून!”
“नको मला. तिने ती नोट परत दिली.”
“अगं, पण तशी पद्धत आहे,” मी कसंबसं म्हणालो.
“ठीक आहे… मी मागशील ते देशील?”
मी क्षणभर विचारात पडलो… हिने काही महागडी वस्तू मागितली तर?
तरीही म्हणालो, “काय पाहिजे?”
“तुम्ही लोक गणपतीला मोदक करतात ना तळलेले. ते मला खूप आवडतात. या गणपतीला ते आणून देशील?” मी लगेचच होकार दिला.
घरी आईला तिची मागणी सांगितली. आई म्हणाली, “एवढंच ना! त्यासाठी गणपतीपर्यंत कशाला वाट पहायची? दोन दिवसांतच देते तिला डबा भरून…”
मी आईने दिलेला डबा तिच्या हातात ठेवताच, तिने लगोलग त्यातला एक मोदक तोंडात टाकला. “मस्त…! आईला सांग मोदक खरेच छान झालेत.”
मी घरी आईला हे सांगताच ती म्हणाली, “त्यात काय एवढे? तिला म्हणावं, घरी येशील तर शिकवून पण देईन…”
काहीतरी आठवल्यासारखं आई म्हणाली, “अरे, पोरीला दिवाळीला आपल्या घरी फराळाला तरी बोलवं.”
मी म्हटलं, “अगं, दिवाळीच्या सुट्टीत ती जाईल तिच्या घरी… तिच्या अम्मी-अब्बाकडे!” त्यावेळेस दिवाळीच्या सुट्टीनंतर तिची भेट होणारच नाही हे कुठे माहिती होते.
हेही वाचा – प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा
दिवाळीची सुट्टी लागली आणि संपली. शबीना काही आली नाही. काही दिवसांनी येईल, असं वाटले, पण नंतरही आली नाही. मित्रांनीही, ‘तुझी बहीण कुठे?’ असं विचारले, पण मलाच माहिती नव्हते, तर मी काय सांगणार?
पुढे उडत-उडत बातमी आली की, तिचं लग्न झाले. कोणत्या गावाला दिली, हे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. तिच्या मामाकडे जाऊन हे विचारण्याची हिम्मत तिच्या मैत्रिणींकडेही नव्हती, आमची गोष्ट तर दूरच. त्यावेळेस मोबाइल वगैरे भानगडी नसल्याने संपर्क शक्यच नव्हता.
काळ कोणासाठी थांबत नाही. तिची आठवण पुसट होत गेली. दर राखीपौर्णिमेला आठवण यायची… तीही नंतर येईनाशी झाली.
अनंत चतुर्दशीला घरात मोदक तळले जात असताना अचानक तिची आठवण आली… ‘सौ.’ला म्हटलं, “दोन मोदक माझ्या बहीणीसाठीही जास्त टाक.”
सौ. आश्चर्याने म्हणाली, “तुम्हाला कुठली हो बहीण?”
मी म्हणालो “आहे ना! तिला मोदक फार आवडतात. बाप्पा, ती जिथेही कुठे असो… तिला सुखी ठेव!”


