अध्याय चौदावा
माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सुफळ । तो वसंतु होय स्नेहाळ- । शिरोमणी ॥21॥ प्रमेयमहापूरें । मतिगंगा ये थोरें । तैसा वरिष उदारे । दिठीवेनी ॥22॥ अगा विश्वैकधामा । तुझा प्रसादुचंद्रमा । करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी ॥23॥ जी अवलोकिलिया मातें । उन्मेषसागरीं भरितें । वोसंडेल स्फूर्तीतें । रसवृत्तीचें ॥24॥ तंव तोषोनि गुरुराजें । म्हणितलें विनतिव्याजें । मांडिलें देखोनि दुजें । स्तवनमिषें ॥25॥ हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥26॥ हो कां जो स्वामी । हेंचि पाहतु होतों मी । जे श्रीमुखें म्हणा तुम्ही । ग्रंथु सांग ॥27॥ सहजें दुर्वेचा हिरु । आंगेंचि तंव अमरु । वरी आला पूरु । पीयूषाचा ॥28॥ तरी आतां येणें प्रसादें । विन्यासें विदग्धें । मूळशास्त्रपदें । वाखाणीन ॥29॥ परी जीवा आंतुलीकडे । जैसी संदेहाची डोणी बुडे । ना श्रवणीं तरी चाडे । वाढु दिसे ॥30॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे, हा दृष्टिबंधु निफजे
अर्थ
हे कृपाळू श्रेष्ठा, श्रीगुरो, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल, तो वसंतऋतु आपण व्हा. ॥21॥ ज्या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्मसिद्धांतरूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोफावेल, तसा उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे. ॥22॥ हे सर्व जगताला एकच आश्रय असणार्या श्रीगुरुराया, तुझा प्रसन्नतारूप चंद्र माझ्या अंत:करणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो. ॥23॥ महाराज, आपण माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले असता, माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांतादि नवरसांची मोठी भरती येईल. ॥24॥ तेव्हा संतुष्ट होऊन श्रीगुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या मिषाने स्तुतीच्या पांघरुणाखाली, तू द्वैत केलेस, असे आम्हास दिसून येते. ॥25॥ हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयी उत्कट इच्छा मोडू देऊ नकोस. ॥26॥ यावर (ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात) : स्वामी महाराज, अशी का आपली इच्छा आहे? मी याचीच वाट पहात होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ‘ग्रंथ सांग’ असे म्हणावे. ॥27॥ हरळीची मुळी स्वभावत: तर अंगाने अमर आहेच, जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला (तर मग तिच्या अमरपणाविषायी शंका धरणे नको). ॥28॥ तर आता या श्रीगुरूंच्या प्रसादाने, मूळ जी गीताशास्त्रातील पदे, ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करीन. ॥29॥ पण (असे वर्णन करीन की) जेणे करून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल. (संशय नाहीसे होतील) एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल. ॥30॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं


