गौरी-गणपतीचा सण फार आनंदात साजरा केला होता. घरात नुसती गडबड… बाहेर तर धूम चाललेली होती. गणपतीचे विविध देखावे, आरास, लाइटिंग हे बघायला फार मजा येत होती. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक येऊन गेले. अथर्वशीर्षांची आवर्तनं चालू होती. सगळीकडे विलक्षण उत्साह भरलेला होता. बघता बघता अनंत चतुर्दशी आली… गणपतीच विसर्जन झालं… फुलांच्या माळा, दिवे, चौरंग हे सगळं रात्री आवरून झालं.
आज रोजच्या सारखी सकाळी बागेत चालायला गेले. मैत्रिणी आल्याच होत्या. त्यांच्याबरोबर बाकावर बसले. गप्पा सुरू झाल्या… इतक्यात राधा आली आणि म्हणाली,
“ए, सारखं गोड खाणं चाललंय… आधी चार चार चकरा मारा आणि मग गप्पा…”
तशा सगळ्या म्हणाल्या,
“आम्ही नाही येणार… अगं, दमलो आम्ही. आज नुसत्या बसणार आहोत… तुझी तू जा बाई…”
“ए, असं काय गं… एक तरी चक्कर मारूया की!” ती म्हणाली. पण आज कोणी उठलं नाही. मी पण बसले.
“बरं बाई, मी एकटीच जाते…” असं म्हणत ती गेली.
“काय, कसा साजरा झाला सण?” आपटे ताईंनी विचारलं.
सुजाता म्हणाली, “आधी माझ्या मोदकांची गंमत सांगते ती ऐका… आमच्या सूनबाई मला प्रेमाने म्हणाल्या, ‘आई तुम्ही युट्यूबवर मधुराज रेसिपिज् नेहमी बघत असता… यावेळच्या व्हिडीओत तिने उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने सांगितले आहेत. बघितलेत ना?’ पुढे ती काय बोलणार हे माहिती होतं… म्हणून मीच तिला गोड आवाजात म्हटलं, ‘असं का! ते बघून मग तूच ट्राय कर यावेळेस…’ तिची अशी तंतरली…”
हेही वाचा – माझा गणपती बाप्पा
“मग काय झालं?”
म्हणाली, “नको नको, आई ते काय दिसायला चांगले दिसतात… चव कशी कळणार? तुम्ही नेहमी करता तसे करा, तुमचेच छान होतात…”
सगळ्या हसत सुटल्या…
करूणा वहिनी म्हणाल्या, “आम्ही दोघी सासू-सुना एकमेकींना चांगल्या ओळखून आहोत. आम्ही घरी मोदक करायच्या भानगडीत पडत नाही सरळ आधीच मोदकांची ऑर्डर देऊन येतो…”
जोशी काकू म्हणाल्या, “आमच्याकडे सगळ्यांना तळणीचे मोदक आवडतात. आदल्या दिवशी डबाभर केले की, झालं काम!”
“पण काही म्हणा, गौरी-गणपतीच्या सणानंतर घर एकदम रिकामं… मोकळं मोकळं वाटतंनाही का गं?”
“हो, हो… हे मात्र अगदी खरं आहे. त्या दिवसांत किती चैतन्य असतं घरात!”
आज आम्हाला सगळ्यांना ते जाणवतं होतं. कानडे आजी भावूक झाल्या होत्या. मऊ आवाजात म्हणाल्या, “खरंतर, दरवर्षी माझे उकडीचे मोदक छान होतात. यावर्षी काय झालं कळलं नाही, बरेच मोदक हसले… उघडेच झाले! गणपतीला तसाच नैवेद्य दाखवला…”
तांबे आजी म्हणाल्या, “अगं, ते हसले नाही काही, कसे झाले आहेत ते बघण्यासाठी बाप्पाने चव घेऊन बघितली तुझ्या मोदकांची! म्हणूनच ते उघडले…”
“असं असेल?” कानडे आजींनी निरागसपणे विचारले.
“अगं, नाही तर काय? तू इतकी सुगरण. कधी असं झालं होतं का? उलट प्रचिती दाखवली गं तुला…”
कानडे आजींना हे ऐकून बरे वाटले. त्यांनी श्रद्धेने हात जोडले… मला हे फारच आवडलं… मोदक बिघडले तरी त्याला भावनिक टच देऊन आजींनी सहजपणे त्यांची समजूत काढली होती… हे मी खरंच लक्षात ठेवीन!
असं बरंच काही शिकण्यासाठी तर मी इथे येते… सहज गप्पांतून मोलाचं असं काहीतरी गवसतं… आपोआप लक्षात राहतं.
“ए, खाण्याच्याच काय गप्पा चालल्या आहेत? अथर्वशीर्षाची किती आवर्तन केली? कुठल्या आरत्या म्हटल्या? ब्रह्मणस्पती सूक्तम् एकदा तरी म्हटलं का?” सुमतीने विचारल..
“आता आमची परीक्षा नको घेऊस बाई! गणरायाची केली आम्ही सेवा, जमेल तेवढी…”
नंदा म्हणाली, “अगं, माझ्या घरी सासू-सासरे, त्यात नातवाला सांभाळायचं… मग मी आदल्या दिवशीच गणपतीला सांगितलं – ‘बाबा रे, उद्या मला काही जमणार नाही. मी आजच एकवीस आवर्तन करते…’”
“असू दे, केलीस ना दुसऱ्या दिवशी? पहिल्या दिवशी सगळेच म्हणणार… उलट दुसऱ्या दिवशी शांतपणे गणोबाने तुझी आवर्तन ऐकली असतील…” तांबे आजींनी असं म्हटल्यावर, नंदा मनापासून हसली..
सुरेखा म्हणाली, “गप्पा किती वेळ चालल्या आहेत? आज काय घरी कामं नाहीत का? निघूया गं…”
हेही वाचा – गौरीमायला निरोप…
उठल्या सगळ्या… तांबे आजी म्हणाल्या, “जरा थांबा ग.. उभ्या राहा… हात जोडा… आज निघताना अथर्वशीर्ष म्हणूया.”
‘आत्ता म्हणायचं? झाले की गणपती!’ असा प्रत्येकीचा चेहरा…
आजी शांतपणे म्हणाल्या, “गणपतीचं विसर्जन झालंय… पण त्या पार्थिव मूर्तीचं जलतत्त्वात विसर्जन करून… असं कधी विसर्जन होतं का? तो अनादी, अनंत आहे. तो या विश्वातल्या कणाकणात व्यापून राहिलेला आहे… तो असतोच आपल्या आसपास… आताही आहेच. आज त्या परमतत्वासाठी म्हणूया…”
उभं राहून सगळ्यांनी हात जोडले आणि अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली…
हरी ओम् नमस्ते गणपतये
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि
त्वमेव केवलम् कर्तासि…
डोळे मिटून शांतपणे अथर्वशीर्ष म्हणताना आज बाप्पा समोर दिसत होता… ‘असाच तुझा वरदहस्त डोक्यावर असू दे रे… आहे त्यात आम्ही समाधानी आहोत. तुझ्याकडे आता काही मागणं नाही बघ…’ असं म्हणून प्रसन्न मनाने आम्ही सगळ्याजणी घरी निघालो…


