अध्याय चौदावा
वेद वानूनि तंव चांग । जंव न दिसे तुझें आंग । मग आम्हां तया मूग । एकी पांती ॥11॥ जी एकार्णवाचां ठाईं । पाहतां थेंबाचा पाडु नाहीं । मा महानदी काई । जाणिजती ॥12॥ कां उदयलिया भास्वतु । चंद्र जैसा खद्योतु । आम्हां श्रुति तुजआंतु । तो पाडु असे ॥13॥ आणि दुजया थांवो मोडे । जेथ परेशीं वैखरी बुडे । तो तूं मा कोणें तोंडें । वानावासी ॥14॥ यालागीं आतां । स्तुति सांडूनि निवांता । चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें ॥15॥ तरी तुज तैसिया । नमो जी गुरुराया । मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होईं ॥16॥ आतां कृपाभांडवल सोडीं । भरीं मति माझी पोतडी । करीं ज्ञानपद्मजोडी । थोरा मातें ॥17॥ मग मी संसरेन तेणें । करीन संतांसी कर्णभूषणें । लेववीन सुलक्षणें । विवेकाचीं ॥18॥ जी गीतार्थनिधान । काढू माझें मन । सुयीं स्नेहांजन । आपलें तूं ॥19॥ हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे । तैसा उदैजो जो निर्मळें । कारुण्यबिंबें ॥20॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा
अर्थ
जोपर्यंत तुझ्या स्वरूपापर्यंत पोचला नाही, तोपर्यंत वेद वर्णन करून प्रतिष्ठेत राहतो, मग तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्याला (वेदाला) व आम्हाला एका पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात. (मुकाट्याने बसावे लागते). ॥11॥ महाराज, प्रलयकाळच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही, मग महानद्या तरी जाणल्या जातील का? (तर नाही) ॥12॥ अथवा सूर्य उगवल्यावर जसा चंद्र काजव्यासारखा, त्याचप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची व वेदाची अवस्था होते. ॥13॥ आणि द्वैताचा जेथे बळ नाहीसे होते, व वैखरी वाचाही परावाणीसह जेथे नाहीशी होते, असा जो तू, त्या तुझे मग ‘परा, पश्यन्ती’ इत्यादि वाचांपैकी कोणत्या वाचेने वर्णन करावे? ॥14॥ याकरता आता स्तुती करण्याचे सोडून देऊन, मुकाट्याने आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे हेच चांगले. ॥15॥ तर अहो गुरुमहाराज, (आपण जसे आहात) तशाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो. (आपण मजवर एवढी कृपा करा की) माझा ग्रंथरूप उद्योग सफल होण्यास आपण सावकार व्हा. ॥16॥ आता कृपारूपी भांडवल सोडा व तिने माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा. ॥17॥ मग मी त्या योगाने सावरेन आणि विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे करून ती संतांना घालीन. ॥18॥ महाराज, माझे मन गीतार्थरूपी ठेवा काढण्यास समर्थ व्हावे, याकरिता तुम्ही आपले कृपारूपी अंजन (माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात) घाला. ॥19॥ जेणेकरून ही शब्दसृष्टी माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला एकदम आकलन करता येईल, त्या तर्हेने, हे श्रीगुरुसूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयास यावे. ॥20॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे, हा दृष्टिबंधु निफजे


