मालती नावाची एक साधी, परंतु मेहनती स्त्री छोट्याशा घरात राहणारी. चार-पाच घरांत कामं करत होती. तिच्या जीवनाची साधी ओळख म्हणजे ती दोन मुलांची आई आणि धुणं-भांडी, लादी पुसणारी कामवाली बाई! आपल्या मुलांची भूक भागवण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी ती मेहनत करत होती आणि तिच्या डोक्यावर घराचं ऋणाचही ओझं होतंच. आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य आपल्या मुलांना देण्यासाठी ती सदैव कामाच्या शोधात असायचे.
एकेदिवशी ती जिथे काम करत होती त्या देशपांडे कुटुंबीयांनी एका समारंभासाठी घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लॉकरमधून बाहेर काढली होती. ते सर्व सांभाळून एका कपाटात ठेवले होते… कुटुंबीयांना याची फार काळजी होती.
संध्याकाळी सर्वजण बाहेर गेले होते, आणि मालती आपले नेहमीचे काम करण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी देशपांडे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांनी बघितले की, कपाट उघडे होते आणि त्यातील एक दागिना आणि काही रक्कम गायब झाली होती. घरभर शोधाशोध करूनही काही मिळाले नाही, आणि त्यांच्या डोक्यात एकाच विचाराने घर केले – मालतीच हे करू शकते! तिनेच घरातले दागिने चोरले असतील, असा त्यांचा ठाम विश्वास झाला.
देशपांडे मॅडमने मालतीला बोलावून, तिला कठोर शब्दांत विचारले, “मालती, तुझ्याशिवाय घरी कोणी नव्हते. हे सर्व तूच केले असणार! तूच चोरी केली आहेस, नाहीतर दुसरे कोण करेल?”
मालतीला हे ऐकून मोठा धक्का बसला. तिच्या स्वाभिमानावर घाव घालणारे हे शब्द होते… तिच्यासाठी हे सर्व असह्य होते. तिने डोळ्यांत पाणी आणून देशपांडे दाम्पत्यासमोर हात जोडले, “साहेब, मॅडम… मी कधीही असं काही केलं नाही. माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी प्रामाणिकपणे काम करते. असा अन्याय करू नका माझ्यावर.”
परंतु, देशपांडे कुटुंबीय काहीही ऐकायला तयार नव्हते. मालतीच्या संपूर्ण ईमानदारीवर संशय घेतला गेला. आपण निरपराध असल्याचे ती सांगत होती, पण तिच्या बोलण्याचा कोणताही परिणाम देशपांडे कुटुंबीयांवर होत नव्हता. शेवटी, मालतीने आपला स्वाभिमान सांभाळत ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसांनी, देशपांडे यांच्या घरातल्या एका मुलाने त्याच्या मित्राला दागिने आणि पैसे चोरताना पकडले. त्या मुलाने सर्व काही कबूल केले, आणि तत्काळ मालती निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. देशपांडे कुटुंबीयांना खूप पश्चाताप झाला. त्यांनी माफी मागण्यासाठी मालतीला परत बोलावले.
मालतीने शांतपणे ऐकले, पण ती आता त्या घरात काम करण्यास तयार नव्हती. ती म्हणाली, “मी तुमच्याकडे प्रामाणिकपणे काम केलं, पण जेव्हा सच्चाईसाठी मी उभी राहिली, तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आता मी इथे राहून माझ्या आत्मसन्मानाला तडा देणार नाही.”
मालतीने ती नोकरी पुन्हा स्वीकारली नाही आणि एका नवीन ठिकाणी काम सुरू केले… जिथे तिला आदर आणि प्रेम मिळाले. तिच्या संघर्षाचा एक नवा अध्याय सुरू झाला होता… परंतु आता ती जास्त आत्मविश्वासाने उभी राहिली होती, कारण तिला माहीत होते की, सत्य आणि श्रमाचा कधीही पराभव होत नाही.
हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”
एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थितीवरून (म्हणजेच ती व्यक्ती किती गरीब किंवा श्रीमंत आहे) तिचं व्यक्तिमत्त्व ठरवणं चुकीचं आहे. एका व्यक्तीचं मूल्य हे तिच्या चारित्र्यावर, तिच्या कर्तृत्वावर, आणि तिच्या आचार-विचारांवर अवलंबून असतं. प्रत्येक गरीब हा चोरच असतो असं नाही. चोरी करणे माझी वृत्ती नाही… मी प्रामाणिक आहे, हीच माझी संपत्ती आहे, हेच मालतीने दाखवून दिले.
ज्या प्रमाणे नोकरी करणाऱ्या महिलांकडे साधारणत: चांगले शिक्षण असते, ज्यामुळे त्यांना उच्च पदं आणि चांगले पगार मिळतात. त्यांचं शिक्षण समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवून देतं. त्याउलट, मोलकरणी बहुतेकदा अल्पशिक्षित किंवा अशिक्षित असतात. त्यांची आर्थिक स्थितीही बेताचीच असते. समाजात, शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य यांचा आदर केला जातो, त्यामुळेच नोकरी करणाऱ्या महिलांना अधिक मानसन्मान मिळतो. पण दोघेही आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत असतात… आपल्याकडे मेहनत करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहॆ. त्यांना हवा तेवढा मानसन्मान मिळतच नाही… त्यांचा आदर केला जात नाही.
हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!
म्हणूच सर्व प्रकारच्या श्रमाला आणि श्रमिकाला आदर दिला पाहिजे. शिक्षण, आर्थिक स्थिती किंवा कामाचं स्वरूप यावरून कोणाचंही मूल्य ठरवू नये. समाजाने घरकाम करणाऱ्या महिलांकडे सन्मानाने पाहावे,. त्या आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, म्हणून त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी योग्य आदर द्यावा… त्यांचं काम देखील आपल्याला एक चांगलं जीवन जगायला मदत करतं.
कितीही गरीबी असली तरी, संबंधित व्यक्तीचा आत्मसन्मान आणि आशा जिवंत असायला हवी. त्याच्यातील जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा ही त्याची खरी संपत्ती असते. त्यामुळे गरीब असणं, हा दोष नाही… परिस्थिती बदलण्यासाठी त्याला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे. “श्रमांनी केवळ गजरे गुंफले जात नाहीत, त्यातील वास सारा जगभर पसरतो.”


