अध्याय तेरावा
क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा । भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥34॥
शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणी तेचि प्रज्ञा । जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा । अपाडु देखे ॥1128॥ इया दोहींचें अंतर । देखावया चतुर । ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥1129॥ याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ॥1130॥ योगाचिया आकाशा । वळघिजे येवढाचि धिंवसा । याचियाचि आशा । पुरुषासि गा ॥1131॥ शरीरादि समस्त । मानिताति तृणवत । जीवें संतांचे होत । वाहणधरु ॥1132॥ ऐसैसियापरी । ज्ञानाचिया भरोवरी । करूनियां अंतरीं । निरुतें होत ॥1133॥ मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचें । जें अंतर देखती साचें । ज्ञानें उन्मेख तयांचें । वोवाळूं आम्ही ॥1134॥ आणि महाभूतादिकीं । प्रभेदलीं अनेकीं । पसरलीसे लटिकी । प्रकृति जे हे ॥1135॥ जे शुकनळिकान्यायें । न लगती लागली आहे । हें जैसें तैसें होये । ठाउवें जयां ॥1136॥ जैसी माळा ते माळा । ऐसीचि देखिजे डोळां । सर्पबुद्धि टवाळा । उखी होउनि ॥1137॥ कां शुक्ति ते शुक्ती । हे साच होय प्रतीती । रुपेयाची भ्रांती । जाऊनियां ॥1138॥ तैसी वेगळी वेगळेपणें । प्रकृति जे अंतःकरणें । देखती ते मी म्हणें । ब्रह्म होती ॥1139॥
हेही वाचा – Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 20 सप्टेंबर 2026
अर्थ
याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणार्या प्रकृतीचा मोक्ष (म्हणजे तिचे मिथ्यात्व अथवा अनात्मत्व) जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात. ॥34॥
हे शब्दांच्या खर्या खर्या स्वरूपाचे मर्म जाणणार्या अर्जुना, तीच बुद्धि डोळस, की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहाते. ॥1128॥ या दोन्हींचे अंतर समजण्याकरिता चतुर पुरुष, ज्ञानी पुरुषांची सेवा करितात. ॥1129॥ चांगल्या बुद्धीचे लोक याचकरता शांतिरूप संपत्ति मिळवितात व शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पोसतात. ॥1130॥ योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्याच (क्षेत्र-क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याच्या) आशेने करावे लागते. ॥1131॥ शरीरादि सर्व गोष्टी तृणवत् मानतात व जीवभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात. ॥1132॥ मग अशा प्रकारांनी ज्ञानाकरिता सायास करून, अंत:करणात निश्चित होतात. ॥1133॥ मग देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात, त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू. ॥1134॥ आणि पंचमहाभूतादि अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृति पसरली आहे ॥1135॥ ती (प्रकृति) शुकनलिकान्यायाप्रमाणे वास्तविक (जीवात्म्याला) चिकटलेली नसतांनाही चिकटलेल्यासारखी आहे, हे तत्व जसे आहे, असेच ज्याला ठाऊक आहे, ॥1136॥ ज्याप्रमाणे (माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी) मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन, माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पहातो ॥1137॥ अथवा (शिंपेवर भासलेल्या) रूप्याची भ्रांति जाऊन, शिंप ही शिंपच आहे, असा खरा अनुभव जसा यावा ॥1138॥ त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृति, तिला वेगळेपणाने अंत:करणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात, असे मी (श्रीकृष्ण) म्हणतो. ॥1139॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची


