Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी

    September 20, 2026

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी
    ललित

    Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारSeptember 20, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, Bookshelf, स्वामी कादंबरी, कालजयी कादंबरी, रणजित देसाई यांची स्वामी, माधवराव पेशवे, रमाबाई पेशवे, पेशवेशाही, राघोबादादा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रसिद्ध लेखक रणजीत देसाई यांची ‘स्वामी’ कादंबरी 1962मध्ये प्रसिद्ध झाली आणि 1964चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या कादंबरीच्या 35पेक्षा जास्त आवृत्या निघाल्या आहेत. आजही ही वाचकांची आवडती कादंबरी आहे. ‘स्वामी’ नावाची मालिका दूरदर्शनवर आली होती. तीही खूप गाजली होती. थोरले माधवराव पेशवे आणि पत्नी रमाबाई यांच्यावर ही कादंबरी असली तरी, ती केवळ प्रेमकथा नाही. माधवरावांच्या राजकीय कारकि‍र्दीची 11 वर्षे यात दाखवली आहेत. त्यांचा राज्याभिषेक ते अकाली मृत्यू इतका हा कालखंड आहे. प्रस्तावनेत लेखक म्हणतात की, हे पुस्तक त्यांच्या हातून लिहून झाले, कारण पेशव्यांचे गतजन्मीचे काही ऋण फेडायचे राहून गेले असावे; पण या पुस्तकाचे यश पाहता वाटते की, पेशव्यांनीच माझे गतजन्मीचे ऋण फेडले आहे!

    मुखपृष्ठावर गजाननाचे सुंदर चित्र आहे. हे पेशव्यांचे दैवत. माधवराव गजाननाचे निस्सीम भक्त होते. पानिपतच्या युद्धापेक्षाही मराठेशाहीचे अधिक नुकसान या पेशव्याच्या अकाली निधनाने झाले, असे ग्रँट डफ यांनी लिहिले आहे.

    पानिपतच्या युद्धात झालेल्या पराभवामुळे राज्याला अवकळा आली होती. अत्यंत अपमानास्पद हार स्वीकारावी लागल्याने प्रजेचे मनोबल खचले होते. माधवराव केवळ 16 वर्षांचे असताना त्यांना पेशवेपद सांभाळावे लागले. विषम परिस्थितीत एवढे मोठे जबाबदारीचे पद त्यांना कोवळ्या वयात स्वीकारावे लागले, तेव्हा त्यांच्या गुणांची कसोटी लागली. हैदर, निजामसारखे बाहेरचे शत्रू आणि घरात सख्खा काका रघुनाथराव या मोठ्या शत्रूंशी सामना करायचा होता. त्यांनी आधी राज्याची घडी नीट बसवायला सुरवात केली. आर्थिक व्यवहार सुरळीत केले.

    यानंतर त्यांना अवघ्या अकरा वर्षांच्या कारकि‍र्दीत 22 मोठ्या लढाया लढाव्या लागल्या. निजामाचा पराभव आणि हैदरवर वचक यामुळे शत्रूंचा बंदोबस्त झाला. यानंतर उत्तरेत फौजा पाठवून राजपूतांना नमवले आणि इंग्रजांच्या ताब्यातून सोडवून दिल्लीच्या तख्तावर शहा आलमला बसवले. यामुळे दिल्लीत मराठेशाही पुन्हा प्रस्थापित झाली. पानिपतच्या पराभवाचा डाग काही अंशी धुऊन निघाला.

    हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

    या ऐतिहासिक घटनांच्या आधारे या कादंबरीत कथानकाची गुंफण केली आहे. त्यांना अनेक पुस्तकांचा आधार घ्यावा लागला… स्थळे पहावी लागली. त्यांनी म्हटले आहे की, भाऊसाहेब खांडेकरांनी त्यांना सर्व साहित्य पुरवले. लेखकाने सुयोग्य वापर करून त्याचे सोने केले आहे! माधवराव, रमाबाई यांच्याव्यतिरिक्त इतर अनेक पात्रे कथानकात येतात. राघोबादादा ऊर्फ दादासाहेब वयाने मोठे असूनही माधवरावांच्या विरुद्ध कारवाया करत असल्याने शेवटी त्यांना नजर कैदेत ठेवायला लागले होते. अटकेपार झेंडे लावणारे राघोभरारी हेच! लेखकाने त्यांचे पात्र पूर्ण खलनायकी न दाखवता ‘ग्रे’ दाखवले आहे. त्यांना माधवराव ‘गंगोदकासारखे निर्मळ मन’ असणारे असे म्हणतात, परंतु हलक्या कानाचे असल्याने कान भरणाऱ्या लोकांच्या बोलण्यात ते आले. गोपिकाबाई, पार्वतीबाई, आनंदीबाई, गंगोबा, सखाराम बापू, रामशास्त्री, श्रीपती, मैना, विठी, रामजी इत्यादी पात्रे येतात. रमाबाई आणि माधवराव यांच्यातले तरल, हळूवार नाते संवादांतून व्यक्त होते. ते संवाद लक्षात राहण्यासारखे आहेत. माधवरावांना रमाबाई खंबीरपणे साथ देतात. त्या दोघांचे मन इतके जुळलेले आहे की, शब्दांची गरज पडत नाही. रमाबाई जितक्या भावनाशील, मृदू तितक्याच कर्तव्यनिष्ठ पेशवीणबाई होत्या! भावनेत वाहून जाणाऱ्या नव्हत्या. लोभस तितकीच आदर वाटावा अशी स्त्री, लेखकाने रंगवली आहे. माधवराव जितके रणांगणावर पराक्रमी वीरपुरुष आहेत, तितकेच रसिक आहेत. त्यांच्या रखरखीत आयुष्यातला गारवा म्हणजे रमाबाई!

    माधवरावांचे व्यक्तिमत्व परिपूर्ण दाखवले आहे. माधवराव आधी शासक आहेत, मग इतर नाती आहेत, हे कधी विसरत नाहीत. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतात. आप्त-स्वकीयांना दुखवावे लागते. राघोबांच्या कटकारस्थानांमुळे ते व्यथित होतात. प्रजेचे दुख जाणून घेतात. ते चतुर राजकारणी होते, हे लेखकाने काही प्रसंगातून पटवून दिले आहे. जसे नजरकैदेत असलेल्या बापूंचा सारीपाटाच्या चालीतून भोसल्यांना दिलेला संदेश ते ओळखतात किंवा निजामाचा पुण्यावर हल्ला करण्यामागचा हेतू ओळखतात. हैदरशी लढाई तर त्यांच्या कुशलतेचे परिमाण आहे. इंग्रज अधिकारी त्यांच्याकडे साष्टीला किल्ला बांधण्याची परवानगी मागतो, तेव्हा ते ‘तुमच्या मुलखात पण दोन जागी किल्ला बांधायची परवानगी द्या,’ असं सांगतात. तसेच, निजाम आणि हैदर याच भूमीतले, तुम्ही परके… याची जाणीव करून देतात.

    त्यांच्यामुळे मराठेशाहीला ऊर्जितावस्था येते, तरी ते शेवटी रमाबाईंना म्हणतात की, वैयक्तिक पातळीवर मी हरलेलो आहे. कुटुंबीयांशी वैमनस्य त्यांची दुखरी बाजू आहे. रामशास्त्री प्रभुण्यांना ते सांगतात की, न्यायासनासमोर मी आलो तरी डगमगू नका. रामशास्त्रीही त्यांना सांगतात – क्षात्रधर्म स्वीकारला आहे, तेव्हा कर्मकांड कमी करा आणि राज्याकडे लक्ष द्या. माधवराव त्यांचा सल्ला मानतात.

    या कादंबरीत प्रामुख्याने कौटुंबिक कलह दिसतात. काका-पुतण्या संघर्ष तर पराकोटीचा! रास्ते मामा आणि भाचा संघर्ष… यातून गोपिकाबाईंचे घर सोडून जाणे आणि शेवटी मुलाच्या अंत्ययात्रेलाही न येणे. सासरा-जावई संघर्ष, यात त्यांची जहागीर काढून दुसऱ्याला देणे… कर्तव्यनिष्ठ व्यक्तीला अशा प्रसंगांना सामोरे जावेच लागते. माधवराव सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागतात. असे असले तरी राघोबा हैदरबरोबर तह करायला लावतात, तो प्रसंग वाचताना महाराज असे वागले असते का? असे वाटते. राघोबा केवळ त्यांचे काका आहेत म्हणून त्यांनी त्यांच्यावर मारेकरी घालून सुद्धा त्यांना माधवराव माफ करतात! या प्रसंगीही तसेच वाटते. कदाचित, माधवरावांच्या व्यक्तिमत्वातला हाच एक दुबळा भाग असेल, जो लेखकाने दाखवला आहे किंवा राघोबादादा पित्याच्या स्थानी असल्यामुळे ते नजरकैदेहून अधिक शिक्षा करायला धजत नाहीत.

    पानिपतवर हरवलेल्या भाऊंचा तोतया पुण्यात वाजत-गाजत येतो त्यावेळी माधवरावांची खरी परीक्षा होते. त्याला तोतया ठरवलं, तर पेशवेपदाच्या मिषाने मुद्दामून ठरवले, असे बोलले गेले असते आणि स्वीकारले तर ते अधिक धोक्याचे! शिवाय, पार्वतीबाईंना दुखावण्याचे संकट.

    शेवटच्या भागात माधवरावांचे आजारपण आणि मृत्यू याचे वर्णन आहे. रोगाशी लढणारे माधवराव, त्यांच्यासाठी व्रत करणाऱ्या रमाबाई, वैद्यराज, डॉक्टर कनिंगहम यांचे औषधोपचार आणि त्यांचे वाईट चिंतणारे, त्यासाठी अनुष्ठाने करणारे राघोबा. वेदना सहन न होऊन कट्यार मागणारे माधवराव, आसुडाचे फटके मुकाटपणे खाणारे इच्छाराम आणि मी कट्यार देते म्हणणाऱ्या रमाबाई… सगळेच डोळ्यांसमोर उभे राहते.

    शेवटचा प्रसंग सतीचा! वाचताना मनात शब्दातीत रिक्तता येते. दुःखाच्या पलीकडे पोहोचल्याची भावना होते. लेखकाने इतके जिवंत वर्णन केले आहे की, जणू समोर प्रसंग घडतो आहे असे वाटते. फडफडणारा श्वेतपदर अश्रू गोठवतो!

    हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा

    लेखकाने प्रतिकांचा, रूपकांचा वापर फार सुरेख केला आहे. राघोबासमोर माधवराव शरणागती पत्करतात, तो प्रसंग रंगवताना एकटा पडलेला चिंकारा शिकाऱ्याच्या तावडीत सापडतो, तो प्रसंग अगदी चपखल वाटतो. राघोबादादांच्या अंगरख्यावर पडलेला लांच्छनास्पद डाग कधीच पुसला जाणार नाही, असे माधवराव म्हणतात आणि रमाबाईंच्या कुंकवाचा अंगरख्यावर पडलेला अभिमानास्पद डाग तसाच राहून देण्याचा आग्रह धरतात. माधवराव समुद्राचे, सूर्यास्ताचे आणि हरिहरेश्वराचे वर्णन रमाबाईंना सांगतात, तेही अप्रतिम! कितीतरी वाक्य मनात रेंगाळत राहतात.

    पुस्तकाचे नाव ‘स्वामी’ आहे, ते कोणाला उद्देशून? हा विचार साहजिकच मनात येतो. माधवराव स्वामी आहेत? रमाबाई त्यांना एकदा स्वामी अशी हाक मारतात… की हे राज्य गजाननाचे असल्याने स्वामी गजानन आहे? स्वामी या शब्दाला मालक, धनी यापेक्षा गहन अर्थ आहे. त्यात एक वैराग्याची छटा आहे. स्वामी राजापेक्षा उदात्त आहे. माधवरावांचे व्यक्तिमत्व राजा म्हणण्यापेक्षा ‘स्वामी’ म्हणावे असेच होते.

    या कादंबरीचे जितके कौतुक झाले, तितकी यावर टीकाही झाली. काही ऐतिहासिक घटनांत फेरफार केला आहे… माधवराव अगदीच दोषरहित दाखवले आहेत… राघोबादादांच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष केले आहे किंवा कौटुंबिक कलहाला अधिक महत्त्व दिले आहे… अशा प्रकारची टीका झाली. ऐतिहासिक सत्य डावलले आणि नाट्यमयतेला महत्त्व दिले, असाही आरोप होतो. पण ही कादंबरी आहे, शुद्ध रूपातला इतिहास नाही; त्यामुळे लेखकाने घेतलेले स्वातंत्र्य योग्यच आहे. या कादंबरीचे मोठेपण वादातीत आहे. या कादंबरीने एक नवप्रवाह सुरू केला. कालजयी म्हणता येईल, अशी ही कादंबरी वाचायला हवी, संग्रही ठेवायला हवी.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026 ललित

    विसर्जन

    September 19, 2026 ललित

    ऐसा भी होता है!

    September 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गौरीमायला निरोप…

    By नीता चंद्रकांत कुलकर्णीSeptember 20, 2026

    सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींचं आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट…

    विसर्जन

    September 19, 2026

    ऐसा भी होता है!

    September 19, 2026

    अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद

    September 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी

    September 20, 2026

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 20 ते 26 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा

    September 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 441
    • अवांतर 208
    • आरोग्य 149
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 590
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 256
    • मैत्रीण 30
    • ललित 932
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी

    September 20, 2026

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.