आज सकाळचीच ही घटना आहे. उद्याची सगळी तयारी झाली होती. सकाळी लवकर जाऊन बाप्पांची मूर्ती पण घेऊन आलो होतो. माझ्या नित्यनियमाप्रमाणे सकाळी सकाळी टेबलवर चार वर्तमानपत्रे आलेली होती. माझे वर्तमानपत्रांचे पारायण सुरू होते, अधून मधून फेसबुक आणि व्हॉट्सॲपकडे भटकंती सुरू होती… आणि गरमागरम चहा पण घेत होतो.
अचानक स्वयंपाकघरातून मस्त गोडसर असा सुंदर वास यायला लागला. बायकोला आवाज दिला आणि विचारलं – “आज काय स्पेशल आहे? सुंदर गोड वास येतोय.”
बायको – “अहो, उद्यापासून गणपती उत्सव सुरू होतोय. रोजच्या संध्याकाळच्या प्रसादाकरिता पंचखाद्य करते आहे.”
मी सहजच मनात म्हटलं – ‘गणपती बाप्पा, तुम्हाला गोड आवडतं म्हणून प्रसादाकरिता सुंदर पंचखाद्य तयार होतंय, आणि रोजच्या सकाळच्या प्रसादाकरिता मोदक, शिरा असे गोड पदार्थ असणारच आहेत!’
आपल्या दारावर जसा टकटक आवाज येतो, तसाच काहीतरी आवाज देवघरामधून येतोय, असा मला भास झाला. माझ्या काही लक्षात येईना. मी इकडे तिकडे बघत होतो, तेवढ्यात देवघरातून कुणीतरी बोलतंय असं वाटलं, म्हणून देवघराकडे गेलो, आणि माझी शंका खरी ठरली. तिथूनच बोलण्याचा आवाज येत होता!
देवघरामधून : मी गणपती बाप्पा बोलतोय…
मी चांगलाच गडबडलो. मी स्वतःला दोन-तीन ठिकाणी चिमटे काढून बघितले. सगळ्याच ठिकाणी चिमटे जाणवत होते, म्हणजे मी शुद्धीवर नक्कीच होतो. म्हणजे आज आणलेली देवघरातली गणपती बाप्पांची मूर्तीच बोलत असणार. मी वाकून नमस्कार केला.
हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!
देवघरातून : सुखी राहा. तुझा अंदाज बरोबर आहे. मीच गणपती बाप्पा बोलतोय.
मी पुन्हा वाकून नमस्कार केला.
गणपती बाप्पा : तुला कोणी सांगितलं की, मला गोड आवडतं म्हणून?
मी : तसं सांगितलं कोणीच नाही. पण फोटोमध्ये तुमच्यासमोर मोदकांचं आणि गोड पदार्थांची ताटे असतात, सगळ्या गणपतीच्या देवळांमध्ये उत्सवाच्या वेळेस आणि रोजच गोड पदार्थांचा प्रसाद असतो, बऱ्याच पौराणिक कथांमध्ये पण तसा उल्लेख आहे. आम्ही आपलं तेच खरे मानून सुरू ठेवतो. आमचं काही चुकत असेल तर सांगा…
गणपती बाप्पा : तुम्ही प्रसाद म्हणून मोदकाचे ताट माझ्यासमोर ठेवता, पण पूजा झाल्यानंतर किंवा आरती झाल्यानंतर मी खाल्ल्यामुळे काही मोदक कमी झाले आहेत का? किंवा लाडू कमी झाले आहेत, शिरा कमी झाला आहे, असं कधी बघितलं आहे का?
मी : नाही, तसं दिसलं कधीच नाही… आणि कुणी तसा विचार केला असेल असे पण वाटत नाही. सगळेच जण देवासमोर नैवेद्य दाखवतात, आणि आरती संपली की, लगेच त्याचे वाटप आणि खाण्यास सुरुवात होते. तुम्ही खाल्लाय का नाही, हा विचारच कोणाच्या मनात येत नसावा. तुम्हाला गोड खरोखरच आवडत नाही का?
गणपती बाप्पा : आवडत नाहीच, असं नाही; पण मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं जास्त आवडतात. माणसं म्हणजे स्त्री – पुरुष – मुलं – मुली असे सगळेच त्यामध्ये आले. गोड माणसे म्हणजे काय ते लक्षात आलं ना!
मी : अर्थ समजेल, असं लक्षात येत नाहीये.
गणपती बाप्पा : गोड माणसं म्हणजे नेहमी गोड बोलणारी माणसं मला आवडतात. नुसतं वरवर गोड बोलणारी माणसं घराघरात आणि समाजात सगळ्याच स्तरांमध्ये आहेत. आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जात असेल, तिला कमी लेखण्याचा प्रयत्न आपल्या बोलण्यात असेल, बोलण्यात अहंभाव म्हणजे मी आहे म्हणून सगळे आहे – असा भाव असेल, तर या बोलण्याला गोड बोलणे म्हणत नाहीत. गोड बोलणं हे मनापासून असलं पाहिजे.
आपापसात गोडी निर्माण करणारी माणसं मला आवडतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्याकडून होईल तेवढी मदत इतरांना करणारी माणसं सभोवार गोडी निर्माण करत असतात, ती मला आवडतात. यांचा स्वभाव स्वच्छ असतो, मनामध्ये घमंड नसते, मनात कपट नसतं. मनात कुणाला फसवणे किंवा कोणाला फसवून आपला फायदा करणे हा विचार नसतो. कुणाला त्रास देणे, मारहाण करणे, अशी यांची विचारसरणी नसते.
मला गोड हसणारी माणसे आवडतात. काही माणसांचे चेहेरे कायम एरंडेल तेल प्यायल्यासारखे असतात. मी त्यांना आतून सुचवत असतो की, काळजी माझ्यावर सोडा, थोडे मोकळे व्हा… पण कुणाचं माझ्या सांगण्याकडे लक्षच नसतं. खोटे हसणारी माणसे पण भरपूर आहेत. पण अशा लोकांच्या हसण्यात खळखळणारा गोडवा नसतो, कारण त्यांच्या मनात गोडवा नसतो.
सर्वांगाने गोड असणारी माणसं मला आवडतात. समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला देव बघता आला, तर तो तुमच्या मनाचा गोडवा, आणि ती तुमची खरी उंची! माझ्याकरिता प्रसाद गोड ठेवला काय, किंवा तिखट ठेवला काय, किंवा आंबट ठेवला काय… मला काहीच फरक पडत नसतो, कारण मी यामधलं काहीच खाणार नसतो. तुम्हीच तो प्रसाद संपवणार असता. उत्तम तब्येतीकरता खरंतर गोड, तिखट, कडू, आंबट, खारट, तुरट अशा सगळ्याच चवी थोड्या थोड्या प्रमाणात पोटात जाणे जरुरी असते. म्हणून नेहेमी अशा विविध चवींचे प्रसाद असावेत.
दुसरा विचार म्हणजे, चतुर्थीला तुम्ही आपापल्या घरी माझी स्थापना करता आणि दीड दिवसांनी, पाच दिवसांनी, अनंत चतुर्दशीला माझे विसर्जन करता. विसर्जन का करता? हे मात्र मला समजत नाही, माझी तर राहण्याची इच्छा असते. विसर्जन करताना बरेच जण “गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला” असे म्हणतात. खरंतर, मला गावाला जायचंच नसतं कारण मलाच चैन पडणार नसते. सगळेजण “गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या” असा घोषा करत करत विसर्जन करतात. तुमच्या ‘लवकर या’ याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच वेळा तुमच्याकडे लवकर जावं, अशी माझी इच्छा होते, पण येता येत नाही कारण पुढच्या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातली चतुर्थी उजाडते, तेव्हाच तुम्हाला माझ्या येण्याचे वेध लागतात.
असो. माझी किंवा कुठल्याही देवतेची स्थापना तुमच्या घरात उत्सवाच्या स्वरूपात कायमस्वरूपी असावी असे मला वाटते, कारण त्यात तुमचाच फायदा आहे!
आता बघा, घरात दोघेजण असले तरी, त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असतात, संवाद नसतो. घरात चार जण असले, तर तोंडे चार दिशेला आणि संवाद शून्य. अशा घरपणाला काय अर्थ आहे. गणपतीच्या दिवसांत घरातली सगळी मंडळी आरतीच्या निमित्ताने एकत्र येतात, जवळपासचे नातेवाईक, मित्रमंडळी पण मुद्दाम घरी येतात… मनोभावे देवाची पूजा होते, आरती होते, पौष्टिक पदार्थांच्या प्रसादाची देवाणघेवाण होते, एकमेकांची चौकशी, विचारपूस होते… आणि त्यावेळेस सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती मला निखळ आनंद दिसत असतो. यालाच घराला घरपण आहे, असे म्हणतात! किती मोठा प्लस पॉइंट आहे हा तुमच्याकरिता!!
तुम्ही घरामध्ये वर्षभर म्हणजे कायमस्वरूपी गणपतीची स्थापना ठेवली तरी, मी घरात आहे म्हणून तुम्हाला वेगळे असे काहीच करावे लागणार नाही. तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल, तर नेहेमीप्रमाणे तुम्ही घराला कुलूप लावून जाऊ शकता. मला घरातून बाहेर जाण्याकरिता किंवा आत येण्याकरिता घराचे दार उघडे पाहिजे, असं काहीच नाही. रोज आरती, पूजा, फुले, प्रसाद पाहिजेच, असे पण काही बंधन नाही. मी उत्सवाच्या स्वरूपात कायम घरात असलो, की, घरातल्या सगळ्यांच्या सोयीने ठराविक वेळेला सगळेजण रोज एकत्र येतील, महिन्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसांतून एक दिवस मित्रमंडळी, गावातले नातेवाईक एकत्र येऊ शकतील. संवाद होईल, गप्पा होतील. सगळेजण मोबाइल, टीव्ही बंद करून पूजा, आरती करतील, एकमेकांची विचारपूस करतील. सगळ्यांना आवडेल असं काहीतरी प्रसाद म्हणून एकत्र बसून खाणे होईल. याच बांधिलकीनी तुमच्या घराला कायमस्वरूपी घरपण येणार आहे. घराला घरपण आलं की, तुमच्यामध्ये आपोआपच गोडी निर्माण होईल… आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं आवडतात. ट्यूब पेटते आहे का?
हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…
मी : बाप्पा, असा विचार माझ्या तर कधी डोक्यात आलाच नाही. मी तर नक्की यापुढे असेच करणार आणि यावर थोडं लिहून ते ओळखीच्यांना पण कळवणार हे नक्की!
गणपती बाप्पा : तथास्तु!
मी एकदम तंद्रीतून जागा झालो. गणपती बाप्पाने सांगितलेले सर्व विचार माझ्या डोळ्यांसमोरून जायला लागले. माझे गणपती बाप्पा बरोबरचे हे बोलणे बायकोला, मुलींना सांगितले, काही मित्रांना फोन करून सांगितले. पण घरातले गणपती बाप्पा बोलले आणि ते पण चक्क माझ्याशी, ही विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट असल्यामुळे कोण विश्वास ठेवणार? तुमचाही कदाचित विश्वास बसणार नाही.
असो. आपल्या घरातल्या सगळ्यांनी गोड व्हावे, हे तर नक्कीच सगळ्यांना पटण्यासारखे आहे. बरं, गोड माणसं सगळ्यांनाच आवडतात, हे सत्य आहेच… आणि ‘जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला’ हे पण आपण जाणतोच आणि याकरिता करायचे काय आहे? तर घरामध्ये बाराही महिने गणपतीची स्थापना आणि ती कशी? तर, घरातल्या सगळ्यांनी कायम गोड बोलून, गोड वागून, गोड हसून.
चला तर मग –
“गणपती बाप्पा मोरया… नेहमीच आमच्या घरात राहा…”


