माझ्या घराच्या (फ्लॅटच्या) टेरेससमोर कदंब वृक्ष आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, कदंबाचे झाड बहरून येते. थोडी आंब्याच्या पानांसारखी, पण आकाराने जरा मोठी असलेली याची हिरवीकंच पाने झाडाची फांदी न फांदी व्यापून टाकतात.
या झाडाचे नाव आतापर्यंत फक्त कथा, कादंबऱ्यांमध्ये वाचण्यात आले होते किंवा श्रीकृष्णाच्या कालियामर्दनाच्या गोष्टीत या झाडाचा उल्लेख येतो. तितकीच काय ती या झाडाची माहिती! जंगल सफारी करतानाही अनेकदा हा वृक्ष नजरेस पडला असेल; परंतु जंगल भटकायचे म्हटले तर, वाघाच्या मागावर जावे लागते आणि तेही भर उन्हाळ्यात. कदंब वृक्ष पाऊस पडल्यानंतरच बहरतो. त्यामुळे जंगलात फिरताना हे झाड दिसतही असेल, परंतु त्या वेळेस या झाडाला बहर नसल्यामुळे तेथील या झाडांकडे दुर्लक्ष होतेच. नाही म्हणायला गाईड त्याला जसे सुचेल तशी त्या वनातील झाडांची, पशू-पक्ष्यांची भरपूर माहिती पुरवत असतो; परंतु या सर्व धांदलीत झाडांकडे निरखून पाहायला वेळ नसतो, हेही खरेच आहे.
पाऊस पडायला लागला की, कदंब वृक्ष बहरतो. तो या दिवसांत इतका मोहक दिसतो की, त्याच्याकडे बघत राहावेसे वाटते. कदंबाची झाडे आर्द्र जंगल असलेल्या भागात आढळतात. हिमालयाच्या पायथ्यापासून ते ओडिशा, बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांत जिथे घनदाट जंगले आहेत, तिथे यांचे अस्तित्व कायम आहे. महाराष्ट्रात कोकण आणि मावळ भागांत हा वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतो. मार्चमध्ये याची पानगळ काही प्रमाणात होते आणि जुलै-ऑगस्टमध्ये हा वृक्ष फुलतो-फळतो. दक्षिण भारतातील काही कुळांमध्ये या झाडाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. आपल्याकडे देखील काही ब्राह्मण तसेच क्षत्रिय कुळांमध्ये शुभप्रसंगी कदंबाच्या झाडाची पूजा केली जाते. महाभारतामध्ये कुंती याच झाडाखाली कर्णाला त्याच्या जन्माचा वृत्तांत सांगते, असेही नमूद आहे.
हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!
श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असा हा कदंब वृक्ष असून गोपिकांसोबतची रासलीला असो, राधेला भेटण्याचे ठिकाण असो, यमुनेच्या काठी आपल्या सवंगड्यांसोबत खेळण्याचे निमित्त असो किंवा गोपालांसोबत गोपाळकाला खाण्याचे ठिकाण असो… कृष्णाच्या बालपणीच्या सर्व लीला या कदंब वृक्षाला साक्षी मानूनच झाल्या होत्या. गोकुळातल्या गाई वनात चरायला सोडून कृष्ण कित्येक प्रहर आपली बासरी वाजवत, या कदंबाच्या झाडाखाली बसायचा, असे ‘श्रीकृष्ण लीलामृत’मध्ये वर्णन करण्यात आले आहे. कृष्णाच्या गोकुळात यमुनेच्या डोहावर हे कदंबाचे झाड होते. कालिया नागाच्या विषामुळे यमुनेच्या काठावर असलेली इतर झाडे जळून गेली होती; परंतु कदंबाचे झाड मात्र जिवंत होते. याला कारण असे की, समुद्रमंथनातून निघालेला अमृतकलश विष्णूचे वाहन असलेला गरुड पक्षी जेव्हा आकाशमार्गे घेऊन चालला होता, तेव्हा तो या झाडावर काही क्षणांकरिता विसावला होता. त्या वेळी कलशातील अमृताचे काही थेंब या झाडावर पडले आणि त्यामुळे या वृक्षाला अमरत्व प्राप्त झाले, अशी आख्यायिका आहे.
कदंब वृक्ष हा खूप सुंदर आणि राजस दिसतो. हे झाड सहसा निष्पर्ण होत नाही. याची पाने टोकाकडे मोठी, निमुळती आणि देठाकडे मऊसर लव असलेली असतात. घनदाट जंगलांमध्ये याची उंची 30 मीटरपर्यंत वाढते आणि याच्या फांद्या काटकोनात वाढल्यामुळे एखाद्या छत्रीसारखा याचा आकार दिसतो. साधारणपणे 100 वर्षांचे आयुष्य या झाडाला लाभलेले असते.
संस्कृत साहित्यात म्हटले आहे की, आकाशात ढगांचा गडगडाट झाला की, हे झाड आनंदाने बहरते. पावसाच्या आगमनाची याला नेहमी प्रतीक्षा असते. या झाडाला पावसाळ्यात सुंदर निमकेशरी, श्रीखंडी रंगाची, गोल चेंडूंसारखी अनेक परागकण असणारी फुले येतात. या फुलांमुळे हे झाड खूपच आकर्षक दिसते. चेंडूच्या आकाराची ही फुले असल्याने ती फुले आहेत की फळे, याबाबतीत बराच संभ्रम निर्माण होतो. या फुलांमध्ये किंवा फळांमध्ये असलेला मधुर रस खाण्याकरता अनेक कीटक, फुलपाखरे, पक्षी या झाडावर भिरभिरताना दिसतात.
कदंब वृक्ष जिथे असतो, तिथे श्रीकृष्णाचा वास असतो, असेही म्हणतात. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही ग्रामीण भागांत कदंबाच्या फळांचे लोणचे किंवा कच्च्या फळांची भाजीदेखील करतात. त्वचाविकार आणि मधुमेह यावर याच्या पानांचा रस तसेच सालीचा काढा बहुगुणी असतो, असे ऐकिवात आहे. कदंबाचे झाड जमिनीची धूप थांबवते आणि जमीन सुपीक करण्यास मदत करते, असे जाणकारांचे मत आहे.
माझ्या टेरेससमोरच हे झाड असल्याने मला सकाळ, दुपार, संध्याकाळ या झाडाचे दर्शन होते. या झाडामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे म्हणतात. थंडगार, सुगंधित वारा देणारे हे झाड आहे. माझ्या घराच्या रस्त्याच्या समोरील बाजूस हे झाड असल्याने हॉलमधून, स्वयंपाकघरातून तसेच बेडरूममधूनही ते सातत्याने माझ्या नजरेसमोर असते. सुंदर रंगाच्या चेंडूंसारख्या फुलांनी सध्या हे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि या फुलांचा मंद सुगंध आमच्या परिसरात सर्वत्र दरवळतो आहे. या झाडावर रोज रंगीबेरंगी फुलपाखरे भिरभिरतांना दिसतात. सकाळच्या वेळेस तर मी कितीतरी वेळ टेरेसवर उभी राहून निसर्गाची ही अद्भुत किमया अनुभवत असते.
कदंब वृक्षाची माहिती मिळवताना या झाडाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे तसेच, त्यासंदर्भात पौराणिक कथांचा मागोवा घेतल्यावर याची महती माझ्या लक्षात आली. हे झाड हिंदू संस्कृतीत आणि पुराणात अत्यंत पवित्र मानले गेले असल्याचे समजते. श्रीकृष्णाला प्रिय असलेले हे झाड असून जिथे हे झाड असते तिथे श्रीकृष्णाचा वास असतो, असे ऐकल्यानंतर माझी या झाडावरील श्रद्धा जास्त जागृत झाली. त्यामुळे श्रीकृष्णाचे स्मरण करून,
“कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ॥”
हा मंत्र म्हणून मी सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना या झाडाला नमस्कार करते. आता तर ती एक सवयच अंगवळणी पडलेली आहे.
अजून एक सांगायचे म्हटले तर, माझ्या घरातील देवघराच्या वर राधा-कृष्णाचा सुंदर फोटो आहे. पूर्वेला माझ्या फ्लॅटचे प्रवेशद्वार आणि पश्चिम दिशेला डायनिंगचा, स्वयंपाकघराचा तसेच ओपन टेरेसचा भाग येतो. माझ्या घराच्या पश्चिम दिशेला टेरेससमोर हे झाड आहे, त्यामुळे स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाहिले तर अगदी या फोटोसमोर हे झाड दिसते. स्वयंपाकघराच्या खिडकीची काच पारदर्शी असल्यामुळे दुपारी जर खिडकी बंद केली, तर या झाडाचे प्रतिबिंब त्या खिडकीच्या काचेतून परावर्तित होऊन संपूर्ण देव्हारा त्या झाडाच्या प्रतिबिंबात असल्यासारखा खिडकीच्या काचेवर दिसतो! ते दृश्य पाहायला खूप छान आणि प्रसन्न वाटते. ही केवळ कदंबाच्या झाडाबद्दलची माझी श्रद्धा म्हणावी का? असू दे म्हणा!
परंतु ते काहीही असले तरी आणि खरं सांगायचं झाले तर हे कदंबाचे झाड मी स्वतःहून काही तिथे लावले नव्हते. नागपूर महानगरपालिकेच्या वृक्ष संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत योगायोगाने कदंब वृक्ष माझ्या घरासमोरील रस्त्यावर लावला गेला इतकंच!
वीसेक वर्षांपूर्वी एकदा तिरुपती बालाजीला गेलो असताना जिथे आमचा मुक्काम होता, त्या हॉटेलच्या परिसरात पहिल्यांदा कदंबाचे झाड पाहिले होते. तेही त्या झाडाखाली ‘कदंब’ असे नाव लिहिलेली पाटी होती म्हणून ते कदंबाचे झाड आहे, हे कळले होते. तेव्हाही माझ्या मनात हा वृक्ष घर करून होता आणि तोच कदंब वृक्ष माझ्या घरासमोर आहे म्हटल्यावर माझी उत्सुकता साहजिकच वाढली. आता तर माझ्या टेरेसच्या जवळ त्याच्या फांद्या पोहोचल्यामुळे मला या झाडाबद्दल आकर्षण वाटून मी त्याची माहिती गोळा करत गेले. जसजशी माहिती मिळत गेली, तसतसे या झाडाबद्दल जाणून घ्यायला मला जास्त आवडले आणि त्यातूनच हा लेखनप्रपंच सुरू झाला.
हेही वाचा – रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…
श्रीकृष्णाला निसर्ग खूप प्रिय होता. सर्वसामान्य माणसानेही देवाला निसर्गातच शोधले आहे. सर्वशक्तिमान असलेल्या हत्तीला गणेशाचे रूप देऊन, शेतकरी लोकांच्या शेतातील घुशी आणि उंदरांचा नायनाट करतो म्हणून सापाला आपला मित्र मानून त्याची नागपूजा करून, तर वाघ-सिंहांना दुर्गेचे वाहन मानून मनुष्याने निसर्गाचीच पूजा केलेली आहे. देवीस्तोत्रात देखील जगदंबेचे ‘कदंब वनवासिनी’ अशा शब्दांत वर्णन केले आहे; म्हणजेच देवीलासुद्धा कदंबाचे वन प्रिय असल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वर, तुकारामांसारख्या कवीमनाच्या संतांना त्यांचा विठ्ठल झाडांत, फुलांत, पानांच्या आकारात दिसला. अशा प्रकारे देहभान विसरायला लावणारा हा निसर्ग म्हणजे सृष्टीसौंदर्याचा अद्भुत आणि अद्वितीय खजिना आहे.
माझ्या घरासमोरील या कदंबाच्या झाडाकडे टक लावून पाहत असताना मला या सर्व गोष्टी आठवतात. म्हणूनच पावसाळ्यातील त्या घननिळ्या मेघाकडे आणि या कदंब वृक्षाकडे पाहून कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या कवितेतील खालील ओळी मला कायम स्मरतात –
श्रावणात घननिळा बरसला
रिमझिम रेशीम धारा,
उलगडला झाडातून अवचित
हिरवा मोरपिसारा ॥1॥
जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी,
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी,
माझ्याही ओठावरं आले नाव तुझेच उदारा ॥
श्रावणात घननिळा बरसला ॥ धृ ॥


