Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जीवनसंग्राम

    September 9, 2026

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जीवनसंग्राम
    ललित

    जीवनसंग्राम

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीSeptember 9, 2026No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, दीपक तांबोळी, लेखक दीपक तांबोळी, जीवनसंग्राम, आयुष्याची लढाई, जीवनाची लढाई, कमलाचा जीवनसंग्राम, कमलाच्या मुलीचा प्रश्न, देवांचे युद्ध, आपले युद्ध,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली. काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता. “आज तरी चांगली कमाई व्हायला पाहिजे,” असे मनाशीच बडबडत ती “भाजी घ्या होsss मेथी, पालक, भोपळा, भेंडी, मिरची, कोथिंबीर…” असं ओरडत गल्ल्यागल्ल्यांतून फिरू लागली. पाय चालत होते, पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती…

    नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती. दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला घरी आणून टाकलं होतं. जावयाची तिनं खूप मनधरणी केली होती. त्याच्या पाया पडली… जावई थोडा नरमला. पण सासू महाहलकट होती. ती जावयावरच भडकली “नातू झाल्याशिवाय इस्टेटीतला एक रुपया पण देणार नाही,” अशी धमकी दिल्यावर जावई घाबरला. शेवटी कमलाच्या मुलीला आणि दोन्ही नातींना तिथंच सोडून निघून गेला. आता मुलासाठी तो दुसरं लग्न करणार होता. एका बाईलाच दुसऱ्या बाईचा जन्म नकोसा का होतो, हे कमलाला कळत नव्हतं. वंशाला दिवा पाहिजे म्हणे! वंशाचा दिवा असणाऱ्या तिच्या नवऱ्याने काय दिवे लावले होते, हे काय तिला माहीत नव्हतं? कमलाच्या पोटी दोन मुलांना जन्माला घातलं हाच काय त्याचा पराक्रम. त्यानं जन्माला घातलेला दुसरा वंशाचा दिवा, कमलाचा चोवीस वर्षांचा मुलगा काहीच काम न करता एका राजकीय पुढाऱ्याच्या मागेमागे फिरायचा. रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत त्याचा पत्ता नसायचा. कोंबडी खायला मिळते आणि दारू प्यायला मिळते म्हणून त्याने आपलं आयुष्य असं बरबाद करावं, हे काही तिला पटत नव्हतं.

    पुढाऱ्याने त्याला नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तो अशी स्वप्नं सगळ्याच तरुण पोरांना दाखवून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेत होता हे कमलाला कळत होतं. तिनं ते पोराला अनेकवेळा समजावून सांगितलं होतं. पण पोरगा ऐकत नव्हता. पोराने शिकून मोठं व्हावं, अशी कमलाची फार इच्छा होती. पण दहावी तीन वेळा नापास झाल्यावर त्याने शिक्षणच सोडून दिलं. टवाळखोर पोरांच्या संगतीत राहून तो अजूनच बिघडला. त्यामानाने मुलगी चांगली होती. बारावीत चांगल्या मार्कांनी ती पास झाली होती.

    सरकारी नोकराचं स्थळ आलं म्हणून कमलाने तिचं लग्न अठराव्या वर्षीच उरकून टाकलं. लग्न होईपर्यंत तिनं आईला खूप साथ दिली. कमला बाहेगावी गेली किंवा आजारी असली की, भाजी विकायचं काम तिच्याकडेच होतं. नवरा वारल्यानंतर कमलानंच मुलांना जमेल तसं मोठं केलं होतं. तसाही नवऱ्याचा तिला काहीच उपयोग नव्हता. रोज दिवसा पत्ते खेळत बसायचं, रात्री दारू पिऊन तमाशे करायचे आणि कमलाने विरोध केला की, तिला मारहाण करायची, हेच त्याचं रोजचं काम! त्याची अशी थेरं पाहून लग्नानंतर दोनच वर्षांत कमलाने भाजीची टोपली हाती धरली होती. नवऱ्याने तिला पोसायच्या ऐवजी तिनंच नवऱ्याला पोसलं होतं. शेवटी तिच्या कुंकवाचा धनी होता ना तो!

    नवरा लिव्हर खराब होऊन मेला तेव्हा ती लोकलाजेस्तव रडली होती. पण खरं तर तिला खूप हायसं वाटलं होतं. आता मुलगा मोठा झाला की, तो काहीतरी कामधाम करून घरात पैसे आणेल आणि आपलं हे असं उन्हातान्हात, थंडीपावसात दारोदारी फिरून भाजी विकणं बंद होईल, अशी तिला आशा वाटत होती. ती मुलाने फोल ठरवली होती. शेवटी तो बापाच्याच वळणावर जातो की काय, अशी कमलाला भीती वाटायला लागली होती.

    हेही वाचा – अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी

    विचारांच्या गर्दीत ती किती गल्ल्या फिरली, तिचं तिलाच कळलं नाही. उन्हाचे चटके बसायला लागले, तशी ती भानावर आली. आज अजूनही बोहनी झाली नाही, हे तिच्या लक्षात आलं, तेव्हा ती धास्तावली. बंगलेवाल्यांच्या कॉलनीत ती शिरली. खरंतर, तिला या कॉलनीत यायला आवडायचं नाही. लाखांच्या गाड्या उडवणारे आणि नवीन वर्षाला हजारोंची दारू पिणारे हे बंगलेवाले तिच्याशी पाच-दहा रुपयांसाठी घासाघीस करायचे, वाद घालायचे. बाईच बाईचं दुःख समजू शकते, असं ती नेहमी ऐकायची; पण या बंगल्यातल्या बायकांना कधीही तिची दया आल्याचं तिच्या अनुभवाला आलं नव्हतं. उन्हाळ्यात साधं पाणीसुद्धा पाजायला त्या नखरे करायच्या.

    उन्हाच्या चटक्यांनी आणि थकव्याने कुठेतरी बसून पाणी प्यावं, असं तिला वाटू लागलं. एका बंगल्याच्या सावलीत ती बसली. टोपलीतून गरम झालेली बाटली काढून तोंडाला लावून पाणी पिणार तेवढ्यात तिथं एक आलिशान कार येऊन थांबली. गाडीतून एक तरुण बाई उतरली. कमलाला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.

    “काय आहे? कशासाठी रस्त्यात बसलीये?” ती कमलावर खेकसली.

    “ताई, काही भाजी हवी अशीन तर घ्या. भोपळा आहे, भेंडी आहे, मेथी, मिरची…”

    “काही नको. तू जा इथून.”

    कमला उठून जायला निघणार तेवढ्यात, “अगं, अशी काय करतेस?” असं म्हणत एक तरुण तिच्या मागून येत म्हणाला, “परवा आपल्याकडे कार्यक्रम आहेच. त्याला लागेल ना भाजी! मावशी सांगा कितीची होईल ही सगळी भाजी?”

    तो सगळी भाजी घेतोय यावर कमलाचा विश्वास बसेना! तरी, तिनं हिशोब लावला. तो भाव करेल या विचाराने तिने शंभर रुपये वाढवून पाचशे रुपये सांगितले. पण त्याने काही न बोलता लगेच पाकीट काढून तिला पाचशे रुपये दिले. गडी माणसाला बोलावून टोपली रिकामी करून दिली.

    “अरे, आपण मार्केटमधून आणली असती. स्वस्त मिळाली असती. दारावर येणाऱ्या या बायका खूप महाग देतात…”

    त्याच्या बायकोची कटकट अजून सुरूच होती.

    “जाऊ दे गं… मावशींकडची भाजी चांगली फ्रेश असते आणि वीस-पंचवीस रुपयांकडे काय बघायचं? बिचाऱ्या मावशींना एवढ्या कडक उन्हात उगीचची पायपीट करावी लागते. वीस-पंचवीस रुपये त्यांनी जास्त घेतले तर बिघडलं कुठं?” तो तिला आत नेत म्हणाला.

    कमला खूश झाली. बोहनी झाली तीही दणदणीत पाचशे रुपयांची आणि तीही एका फटक्यात! आनंदाने ती रिकामी झालेली टोपली घेऊन सरळ घरी आली. स्वयंपाक करून मुलीला, नातीला जेवू घातलं. मग नातींशी खेळताखेळता झोपून गेली.

    उन्हात फिरल्याने संध्याकाळी तिला सणकून ताप चढला. ती ‘नाही नाही’ म्हणत असतानाही मुलीने तिला डॉक्टरकडे नेलं. सकाळी झालेली सगळी कमाई डॉक्टरची फी आणि औषधात साफ झाली. आता उद्या भाजी विकता येईल की नाही, या चिंतेने आणि मुलांच्या काळजीने तिला रात्रभर झोप लागली नाही.

    दुसऱ्या दिवशीच काय नंतरचे तीन दिवस तिला तापामुळे भाजी विकायला घराबाहेर पडता आलं नाही. तीन दिवसांनी तिचा ताप उतरला. तिन्ही दिवस ती घरीच होती. प्रचंड अशक्तपणा आला होता. उन्हातान्हात भाजीची जड टोपली घेऊन फिरायचं त्राणही तिच्या शरीरात राहीलं नव्हतं. एकीकडे मुलगा काही कमवत तर नव्हताच, पण तिच्याकडेच सतत पैशांची मागणी करून तिला त्रास देत होता आणि दुसरीकडे लेकुरवाळी पोरगी उरावर येऊन बसली होती. सगळीकडे अंधार पसरला होता. आशेचा किरण कुठंच दिसत नव्हता.

    कमलाला आता खचल्यासारखं वाटू लागलं. या जबाबदाऱ्यांचं ओझं तिला पेलवेनासं झालं. कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागलं… छताला लटकून मरून जावं, असा विचारही तिच्या मनात डोकावू लागला.

    नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी कीर्तनाला घेऊन गेल्या. कीर्तनकार सांगत होते –

    ‘देवांनासुद्धा स्वतःसाठी युद्धं करावी लागली. सीतामाईसाठी प्रभू रामचंद्रांना लंकेला जाऊन युद्ध करावं लागलं. कृष्ण दुष्ट कंस मामाशी लढला. महिषासुराला मारण्यासाठी देवीला युद्ध करावं लागलं. आपण तर शूद्र मानव आहोत. आपल्या आयुष्यात लढाईचे, युद्धाचे प्रसंग वारंवार येतात. दुसरं कोणीतरी येऊन आपली लढाई लढेल, ही अपेक्षा सोडून द्या. तो देव आपल्याला मार्ग नक्की दाखवेल, पण आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही देवांचे फोटो बघितले असतील. प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण, गदा, तलवार अशी शस्त्रं आहेत. आपण सामान्य माणसं अशी शस्त्रं बाळगू शकत नाही. संयम, धैर्य, चिकाटी आणि हुशारी हीच आपली शस्त्रं आहेत. त्यांचा वापर करून आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे.”

    ते ऐकून कमला शहारली. आपली परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. आशेचा किरण असा सहजासहजी दिसणार नाही. त्याच्या मार्गात येणारे अडथळे आपल्यालाच प्रयत्नांनी दूर करावे लागतील, हे तिच्या लक्षात येऊ लागलं. “आपल्यालाबी आता लढलं पाहिजे. असं हातपाय गाळून कसं चालेल?” तिनं मनाला समजावलं आणि तिला थोडासा का होईना हुरूप आला.

    दुसऱ्या दिवशी ती तिच्याकडून नियमित भाजी घेणाऱ्या वकिलीण बाईकडे पोहचली. वकीलसाहेब घरीच होते. कमलाने मुलीचं प्रकरण त्यांच्यासमोर मांडलं. दोन-तीन वर्षं का होईना, नियमित पैसे देणारं अशील मिळालं, या कल्पनेने वकीलसाहेब खूश झाले.

    “ठीक आहे. आपण तुमच्या मुलीच्या नवऱ्याला नोटीस पाठवू. तरीही त्याने जर नाही ऐकलं तर आपण कोर्टात केस दाखल करू. पण त्या अगोदर तुमच्या मुलीला रीतसर पोलीस स्टेशनला सासू आणि नवरा छळ करत असल्याची तक्रार करावी लागेल.”

    कमला गोंधळली. पोलीस, कोर्ट या शब्दांनी तिला कापरं भरलं. ती वकीलसाहेबाला म्हणाली,

    “साहेब ते नोटीस, पोलीस, कोर्ट मले काय बी म्हाईत नाई. पोलिसांत गेलो तर, माह्या जावई आनखीनच डूख धरीन. दुसरं करता यीन का?”

    “खरंच हो! ते नोटीस, पोलिसात कम्प्लेंट, कोर्टकचेऱ्या यात तर अनेक वर्षं निघून जातील आणि ही गरीब बाई एवढा खर्च कुठून करणार? दुसरं काही करता येत असेल तर सांगा बिचारीला…”

    बायकोच असं म्हणायला लागल्यावर वकीलसाहेबांचा चेहरा पडला. मग त्यांनी कमलाला महिला दक्षता समितीला भेटायला सांगितलं. त्यांचा फोन नंबर आणि पत्ताही दिला अन् आपली जबाबदारी झटकून टाकली.

    दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या पत्यावर कमला हिंमत करून मुलीला घेऊन पोहचली. त्या तिला घेऊन पोलीस सुपरीटेडंट साहेबांकडे गेल्या. एस.पी. साहेब कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक असले तरी, दयाळू होते. कमलाच्या मुलीची हकिकत ऐकून त्यांना तिची दया आली. त्यांनी फोन उचलला. कमलाचा जावई ज्या गावात रहात होता, तिथल्या पोलीस ठाण्याला आदेश दिले. चक्रं फिरली… दोन तासांत कमलाचा जावई आणि त्याच्या आईला पोलीस स्टेशनला उचलून आणलं गेलं. एसपींनी दोघांना सज्जड दम भरला. पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं तर, जेल होईल… जेल झाली तर आहे त्या सरकारी नोकरीला मुकावं लागेल, अशी धमकी दिली. तो थरथर कापू लागला. महिला पीएसआयने सासूला ताब्यात घेतलं. मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्यात बाईच जबाबदार नसते, हे तिला समजावून सांगितलं. पण म्हातारी मोठी चिकट होती… म्हणाली –

    “ते मले काय बी माहीत नाय. मले नातू पाहिजे म्हणजे पाहिजे!”

    “मावशी, तुम्हाला मुलं किती?”

    “एक पोरगा आणि दोन पोरी.”

    “त्या दोन पोरी तुम्ही का बरं जन्माला घातल्या? त्यांच्याऐवजी पोरांना का नाही जन्म दिला?”

    म्हातारी गडबडली. चिडून म्हणाली, “आता ते काय माह्या हातात हाये?”

    “आम्हीही तेच म्हणतोय. पोरींना जन्म देणं तुमच्या सुनेच्या हातात होतं का? मला सांगा, या सुनेला फारकत देऊन तुम्ही दुसरी सून आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर? मग तिलाही फारकत देऊन तिसरी सून आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर तुम्ही काय सुनाच बदलत रहाणार का?”

    आता मात्र म्हातारीला हसू आलं. महिला पीएसआय म्हणाली, “हे बघा मावशी. तुमची सून चांगली आहे म्हणून तिनं अजून लेखी तक्रार केलेली नाही. तिने तशी तक्रार केली रे केली की, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या पोराला सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरून अटक केलीच समजा.”

    म्हातारी घाबरली…. दुसऱ्याच क्षणी जवळच उभ्या असलेल्या कमलाच्या पोरीला म्हणाली,

    “चाल वं सरले, घरला चाल…”

    पुन्हा मुलावरुन बायकोचा छळ करणार नाही, असं आश्वासन कमलाच्या जावयाने दिलं. मग कमला दोघांना घेऊन घरी घेऊन गेली. झणझणीत मटन करून जावयाला आणि त्याच्या आईला खाऊ घातलं.

    संध्याकाळी मुलगी मुलींना घेऊन जावयासोबत सासरी गेली. कमलाने सुटकेचा नि:श्वास सोडला. एक लढाई तिने जिंकली होती. आता पोराचा निकाल लावायचा होता. तिने सरळ मुळावर घाव घालायचं ठरवलं.

    दोन दिवसांनी ती पुढाऱ्याला जाऊन भेटली. त्याला कळवळून म्हणाली,

    “सायेब माह्याकडून आता हे भाजीचं काम होत नाही. पोराने लई सेवा केली तुमची… आता त्याला कामधंद्याला लावून द्या.”

    पुढारी महाबेरकी होता. असे आपले कार्यकर्ते कामधंद्याला लागले तर आपल्यामागेमागे कोण फिरेल, आपली चमचेगिरी कोण करेल असा विचार करून तो कमलाला टाळण्याच्या दृष्टीने म्हणाला,

    “मावशी, दोन वर्षं थांबा. दोन वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याला तुमच्या वार्डाचा नगरसेवकच बनवतो. एकदा नगरसेवक बनला की, मग काय पैसाच पैसा!”

    कमलाने पुढाऱ्याचा डाव ओळखला. ती उसळून म्हणाली,

    “अवो साहेब, नगरसेवक बनण्याची त्याची लायकी तरी हाये का? दोन मुस्काटात मारल्या चड्डीत मुतेल तो. तो काय नगरसेवक बनतो… आणि नगरसेवक बनायला करोडो रुपये खर्च कराया लागत्यात. हायेत का त्याच्याजवळ करोडो रुपये? ते काही नाही साहेब आता म्या त्याला कामधंद्याला लावणार. ते भाजी मार्केटमधी एक दुकान हाये, ते घेऊन द्या. लई मेहरबानी होईन तुमची…”

    कमला काही ऐकत नाही, हे पाहून पुढाऱ्याने फोन उचलला. त्या दुकानाची चौकशी केली. फोन ठेवून म्हणाला, “पाच लाखाचं दुकान आहे. जमेल?”

    “साहेब, माझं सोनंनाणं विकून दोन लाख जमतील. तीन लाखाचं कर्ज द्या. आम्ही दोघं मिळून फेडू.”

    पुढारी काही बोलेना. कमलाने त्याच्या मनात काय चाललंय ते ओळखलं. ती म्हणाली,

    “साहेब, काही काळजी करू नका. गरज लागीन तवा पोराला बोलवा. तुमच्यासाठी त्याला कवा बी हजर करीन.”

    आता मात्र पुढारी हसला. कमलाचं काम झालं.

    हेही वाचा – अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!

    आठवडाभरात दुकान मिळालं. सुरुवातीला पोरगा दुकानात बसायला तयार होईना. सारखा दुकान बंद करून पळून जायचा. मग ती स्वतःच त्याच्यासोबत बसायची. त्याला जागचा हलू द्यायची नाही. कमलाच्या नशिबाने एक चांगली गोष्ट घडली. एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या पुढाऱ्याला सजा झाली. तो तुरुंगात गेला. आपल्यावरही कारवाई होऊ नये, या भीतीने त्याचे चमचेही राजकारण सोडून कामधंद्याला लागले. कमलाचा पोरगाही मग हळूहळू धंद्यात रमला. तो रमला हे पाहून कमलाने परत भाजी विकायला सुरुवात केली. कामाची सवय असल्याने असंही तिला घरात करमत नव्हतंच.

    भाजीची टोपली घेऊन कमला मंदिराजवळ आली. बाहेरूनच तिने देवाला हात जोडले. ‘आपली लढाई आपणच लढायची’ हे ती देवाकडून तर शिकली होती. तिच्या मनात आलं, “अजून लई लढाया बाकी आहेत. पोराचं लग्न, येणाऱ्या सुनेशी जमवून घेणं, सुनेची बाळंतपणं, तिचं स्वतःचं म्हातारपण, त्यासोबत येणारे आजार… हा जीवनसंग्राम होता. कधी चांगली माणसं भेटतात, कधी वाईट. पण युद्ध करणं टळत नाही हेच खरं! त्याशिवाय आयुष्यात मजाही नाही. देवा मला लढण्याची शक्ती दे रे बाबा!”

    कमलाने टोपली उचलली आणि ती चालू लागली. पण आता तिच्या पावलात आत्मविश्वास भरला होता आणि जीवनसंग्रामाला तोंड देण्याचं सामर्थ्य!

    (ही कथा माझ्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील आहे.)
    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    भक्ती

    September 8, 2026 ललित

    अहंकार!

    September 8, 2026 ललित

    बाप्पा झाला शरमिंदा!

    September 8, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    भक्ती

    By दिलीप कजगांवकरSeptember 8, 2026

    राज हा एक हुशार, तडफदार आणि प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर. नागपूरच्या एका उच्चभ्रू सोसायटीत त्याचे वास्तव्य.…

    अहंकार!

    September 8, 2026

    बाप्पा झाला शरमिंदा!

    September 8, 2026

    आदर्श शिक्षिका

    September 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जीवनसंग्राम

    September 9, 2026

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026

    शांतता ऐकणारे कान

    September 9, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आदीची आदी, जें वृद्धीची वृद्धी

    September 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 सप्टेंबर 2026

    September 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 427
    • अवांतर 207
    • आरोग्य 145
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 573
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 907
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जीवनसंग्राम

    September 9, 2026

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026
    Most Popular

    श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    September 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.