अध्याय तेरावा
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते । ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य क्षिष्ठितम् ॥17॥
जें अग्नीचें दीपन । जें चंद्राचें जीवन । सूर्याचे नयन । देखती जेणें ॥926॥ जयाचेनि उजियेडें । तारांगण उबडें । महातेज सुरवाडें । जेणें राहाटे ॥927॥ जें आदीची आदी । जें वृद्धीची वृद्धी । बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु ॥928॥ जें मनाचें मन । जें नेत्राचे नयन । कानाचे कान । वाचेची वाचा ॥929॥ जें प्राणाचा प्राण । जें गतीचे चरण । क्रियेचें कर्तेपण । जयाचेनि ॥930॥ आकारु जेणें आकारे । विस्तारु जेणें विस्तारे । संहारु जेणें संहारे । पांडुकुमरा ॥931॥ जें मेदिनीची मेदिनी । जें पाणी पिऊनि असे पाणी । तेजा दिवेलावणी । जेणें तेजें ॥932॥ जें वायूचा श्वासोश्वासु । जें गगनाचा अवकाशु । हें असो आघवाची आभासु । आभासे जेणें ॥933॥ किंबहुना पांडवा । जें आघवेंचि असे आघवा । जेथ नाहीं रिगावा । द्वैतभावासी ॥934॥ जें देखिलियाचिसवें । दृश्य द्रष्टा हें आघवें । एकवाट कालवे । सामरस्यें ॥935॥ मग तेंचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन । ज्ञानें गमिजे स्थान । तेंहि तेंची ॥936॥ जैसें सरलियां लेख । आंख होती एक । तैसें साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये ॥937॥ अर्जुना जिये ठायीं । न सरे द्वैताची वही । हें असो जें हृदयीं । सर्वांचां असे ॥938॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी
अर्थ
(त्यालाच) तेजाचेही तेज व अंधाराच्याही आहे असे (ज्ञाते) म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे, सर्व भूतमात्रांच्या हृदयामधे (तेच) स्थित आहे. ॥17॥
जे ब्रह्म अग्नीला चेतविणारे आहे व चंद्राला अमृत देणारे आहे, व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहातात. ॥926॥ ज्याच्या उजेडाने तारे (तार्यांचे समुदाय) प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो, ॥927॥ जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे, ॥928॥ जे मनाचे मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, जे कानाचे कान आहे व वाचेची वाचा आहे. ॥929॥ जे प्राणांचा प्राण आहे, जे गतीचे पाय आहेत, व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते ॥930॥ अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो. ॥931॥ जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो. ॥932॥ जे ब्रह्म वायूचा श्वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे. हे राहू दे! हा सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो ॥933॥ फार काय सांगावे! अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे, व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही ॥934॥ जे पाहिल्याबरोबर दृश्य (जगत्) द्रष्टा (पाहणारा) हे सर्व, ऐक्यभावाने एक होऊन जातात. ॥935॥ मग ते ब्रह्माच ज्ञान होते व ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान यांनी जाणले जाणारे ठिकाण तेही ब्रह्मच आहे. ॥936॥ ज्याप्रमाणे (पाटीवर) हिशेब करण्याचे संपल्यावर हिशेबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनादिक ही ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्यास येतात. ॥937॥ अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो, जे (ब्रह्म) सर्वांच्या अंत:करणात असते. ॥938॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बाल्यादि तिन्हीं वयसीं, काया एकचि जैसी


