Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026

    शांतता ऐकणारे कान

    September 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चहाचा कप अन् आठवणी!
    अवांतर

    चहाचा कप अन् आठवणी!

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यSeptember 9, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, डॉ विवेक वैद्य, डॉक्टर विवेक वैद्य, लेखक डॉक्टर विवेक वैद्य, लेखक विवेक वैद्य, चहाची सवय, चहा आणि आठवणी, चहाची चव, अमृततुल्य चहा, चहाचे शौकिन,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    काल सहज चहाच्या निमित्ताने काही आठवणी, काही प्रसंग आठवले. खरेतर त्या आठवणी त्या त्या व्यक्तीशी निगडित आहेत.. म्हणून त्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेले छोटे प्रसंग…

    देवामामा….

    देवामामा हा माझ्या आईचा सख्खा भाऊ नाही. तर गुरूबंधू. विखरण येथे आईचे मामा राहायचे त्यांचे गुरू तेच आईचेही गुरू आणि देवामामाचेही गुरू. देवामामा आईच्या मानाने खूप लहान. देवामामा राहायचा खेड्यावर. आमच्या गावापासून बऱ्यापैकी दूर. आधीचे फार काही आठवत नाही, पण तो भेटायला यायचा फक्त एप्रिल-मे महिन्यात. घरी भरपूर शेती. त्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर शेतीची औजारे घ्यायला, दुरुस्त करायला, खते – बी-बियाणे घ्यायला तो आमच्या तालुक्याच्या ठिकाणी यायचा. सकाळी घरून जेवण करून निघायचा मोटरसायकलवर. सगळी कामे निपटून तीन-साडेतीनला भर उन्हात आईला भेटायला यायचा. आल्या आल्या आई-वडिलांच्या पायाला हात लावून नमस्कार करायचा. थोडावेळ गप्पा झाल्या की, निघायचा. अगदी सुरुवातीला आई त्याला काही खायचा आग्रह करायची, तर त्याचे जेवण झालेले. मग आई म्हणायची,

    “देवा, एवढ्या उन्हाचा आलास तर लिंबू सरबत तरी घे…”

    “ताई, आम्ही शेतकरी माणसं. चहा घेतला की, तरतरी येते. घाम येतो. बरं वाटते. मग आम्ही पुन्हा उन्हात जायला मोकळे.” असे त्याचे अजब तत्वज्ञान.

    नंतर तो आला की, आई निमूटपणे चहा ठेवायची. त्याच्याबरोबर चहा घ्यावा म्हणून तो आम्हाला आग्रह करायचा. पण एवढ्या उन्हात कोण चहा घेईल?

    पुढे त्याचे येणे कमी झाले कारण खेडोपाडी खते – बी-बियाणांची दुकाने उघडली. वाहतुकीची साधने वाढली.

    आई गेल्याचे त्याला फार उशिरा कळाले. असाच भरदुपारी तो आला, तेव्हा नेमका घरात मी एकटा होतो. पत्नी, मुले गावाला गेलेली. तो बसला, आईच्या, विखरणच्या जुन्या आठवणी काढल्या. जरा वेळाने मी उठलो आणि म्हणालो,

    “बस मामा, मी तुझ्यासाठी चहा ठेवतो.” मी स्वयंपाकघरात आलो तसा तो माझ्यामागे स्वयंपाकघरात आला, म्हणाला –

    “ताईच्या घरात ताईच्या हाताचा खूप चहा प्यायलो. आता नको.”

    त्याने डोळे पुसले. माझ्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला आणि निघून गेला. त्यानंतर तो परत आला नाही.

    हेही वाचा – प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा

    आबामामा…

    आबामामा हा आईचा चुलतभाऊ. चुलत असला तरी प्रेम सख्या भावाबहिणींप्रमाणे. आबामामाचा पसारा मोठा. शेतीवाडी, नोकरचाकर. सकाळी त्याच्याकडे वर्दळ असायची. भेटायला येणारे, शेतीवरची गडीमाणसे, घरकामाला येणाऱ्या बाया. मामाकडे पैसा होता तसा उदारपणाही होता. कोणीही आले तरी, अर्धा कप चहा घेतल्याशिवाय तो जाऊ द्यायचा नाही! अगदी रोज येणाऱ्या लोकांचाही यात समावेश असे. त्यामुळे सकाळी सहा ते दहा यावेळात सात-आठ वेळा चहाचे आधण चढवले जाई. प्रत्येकासोबत आबामामा चहा घेई. क्वचित नाहीही म्हणे. त्यामुळे मामेबहीण किंवा मामी चहा ठेवताना त्याला विचारत –

    “तुमचाही चहा ठेवू.”

    “थोडासा…” हे त्याचे नेहमीचे उत्तर.

    पुढे त्याला मधुमेह झाला. चहाचे पिण्याचे प्रमाण घटले.

    एकदा त्याच्याकडे भेटायला गेलो. मामेबहीण लग्न होऊन सासरी नांदायला गेलेली. मामींनी मामाला चहा विचारायचा प्रश्नच नव्हता. मीच त्याला म्हणालो –

    “चहा घेतो का थोडासा?”

    त्याचा चेहरा केविलवाणा झाला…

    “नको रे. तो बिनसाखरेचा अगदी घशाखाली उतरत नाही.”

    माझ्याबरोबर थोडासा साखरेचा घेतो का, असे विचारायचे अगदी ओठावर आले, पण त्याचा मधुमेह बघता विचारायचे टाळले.

    …आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्याकडचा चहा मला गोड लागला नाही.

    खंडूमिस्त्री…

    खंडूमिस्त्री हा वडिलांचा नेहमीचा सुतार. त्याकाळी ते फर्निचर भरपूर करायचे… तेही सागवानी! केव्हातरी वडिलांचे काही सुतारकाम खंडूभाऊने करून दिले. या दरम्यान दोघांचे ट्युनिंग जमले. मग काहीही काम असले तरी, खंडूला बोलावल्याशिवाय व्हायचे नाही. तो गावाला गेला, तर त्याची वाट पाहायची, पण दुसऱ्या कुणाला वडील बोलवायचे नाहीत. त्याकाळी बहुतेक सुतार हे गरीबच असत. खंडूही त्याला अपवाद नव्हता. मात्र खंडूचे वैशिष्ट्य असे की तो साधा, प्रामाणिक आणि धार्मिक होता.

    तो पायीच कामावर जायचा. वडिलांकडे एक जुनी सायकल होती. बहुदा फिलिप्स किंवा atlas कंपनीची असावी. ती शेवटी वडिलांनी त्याला दिली. ती त्याने पुढे इतकी वर्षे वापरली की, आम्हालाच प्रश्न पडला की, याला आपण जुनी सायकल दिली की नवी? अर्थात, वडिलांनी सायकल का दिली त्याचा किस्सा…

    खंडूभाऊंचे त्याच्या बायकोचे अधूनमधून वाद होत. मग तो काय करायचा ते त्याच्याच शब्दात..

    “दादा, काल बायकोने डोके लावले. संताप तर खूप आला. मग शेवटी चप्पल घातली आणि तरातरा भतवाल टाकीकडे गेलो. (त्यावेळी गावातल्या भतवाल थिएटरजवळ चहा-नाश्त्याची दुकाने होती). माझ्याबरोबरचे सगळे लोकं घरात भांडण झाले की, दारू पितात. मला दारू, मटण काही चालत नाही. मग तिकडे गेलो. एक चहा घेतला. मग एक भजीची प्लेट मागवली, मग पुन्हा एक चहा घेतला. मग डोकं शांत झाले. येताना मंदिरात जाऊन आलो. आधी पोटोबा. आपले काम स्वस्तात होते बघा. चार आण्याचा चहा, आठ आण्याची भजी. एक रुपयात काम. बाकीच्यांचे बघा. तीन चार रुपयाला देशीची बाटलीच मिळते. चखण्याचे वेगळे!”

    त्याच्या बरोबरचे सगळे कष्टकरी दारू प्यायचे आणि हा पीत नाही म्हणून वडिलांना असेही त्याचे कौतुक.

    “बरं खंडू, बायकोशी महिन्यात किती वेळा भांडतो?”

    “महिन्यात? आठवड्यातून दोन-तीनदा भांडतो.”

    “आता असे कर. तुझे घर ते भतवाल टाकी पायी जायला वीस एक मिनिटे लागतात. त्यापेक्षा मी माझी जुनी सायकल देतो त्यावर जात जा. तेवढीच दर आठवड्यातून दोनदा होणारी तुझी पायपीट वाचेल.”

    खाचणेमावशी…

    मी नवीन दवाखाना टाकला आणि खाचणेमावशी माझ्याकडे यायला लागल्या. बुटक्या, सत्तरीच्या घरात वय, चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी. खणखणीत आवाज, धडधाकट शरीर… प्रायमरी टीचर म्हणून रिटायर झालेल्या मावशींनी मुलांना शिस्त लावताना स्वतःच्या आयुष्यालाही शिस्त लावून घेतली होती. जवळच्याच गल्लीत त्या त्यांच्या मुलासोबत राहात. त्यांना पेन्शन होती. माझ्याकडे ते महिनाभर उधार औषधं घेत. मग 2-3 तारखेला पेन्शन आली की, अचूक येतं. जेवढे बिल बाकी असेल, तो पै न पै चुकता करत. हिशोब झाला की, माझ्या कंपाऊंडरला हाक मारत. त्याच्या हातात पैसे देऊन सांगत, “जा रे आपल्या तिघांसाठी चहा घेऊन ये.”

    सुरुवातीला मला त्यांच्याकडून चहा घ्यायला संकोच वाटायचा. पेन्शनर मावशी, तिच्याकडून काय चहा घ्यायचा? मी एकदोनदा नाही म्हणालो… तर, एकदोनदा मीच चहाचे पैसे देण्याचा प्रयत्न केला. पण…

    “डॉक्टर, महिन्यातून एकदा तुम्हाला चहा पाजल्यावर मी काही गरीब होणार नाही,” असे खणखणीत चार लोकांसमोर सुनावल्यावर मी तो नाद सोडला. बरीच महिने हा रिवाज चालू होता. पण पुढे मावशीच्या मुलाने जुने घर लहान पडते, असे म्हणत गावाबाहेरच्या सोसायटीत मोठे घर घेतले आणि मावशींची उचलबांगडी केली. मावशी यायच्या बंद झाल्या. अर्थात, त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी जाण्याआधी माझी सगळी उधारी चुकवली.

    पुढे बऱ्याच दिवसांनी एकदा आमच्या येथील एक सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञाच्या हॉस्पिटलला काही कामानिमित्त गेलो होतो. समोरच खाचणेमावशी बसलेल्या दिसल्या. मला बघून त्यांना अगदी भरून आले. मला हाताला धरून स्वतःच्या बाजूला बसवून त्यांनी माझी विचारपूस केली. त्यांची प्रकृती बरीच खालवली होती. त्यांना हृदयरोग निघाल्याचे त्यांनीच सांगितले. फाइलही दाखवली. बोलता बोलता त्या म्हणाल्या –

    “डॉक्टर, तुमच्या दवाखान्यात बसून आपण चहा प्यायचो ना? ते दिवस खरंच सुखाचे दिवस होते.”

    या त्यांच्या वाक्यात अनेक अर्थ होते. कदाचित त्यावेळी त्यांची निरोगी तब्येत त्यांना अभिप्रेत असावी किंवा आयुष्याचा मोठा काळ ज्या घरात, ज्या भागात काढला तिथली भावनिक attachment असेल… कोण जाणे?

    निघताना त्या म्हणाल्या “डॉक्टर आता फार दिवस टिकणार नाही मी.” मी त्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला. पण का कोण जाणे त्यांचे म्हणणे अंतःकरणापासून असावे, असे वाटले. पुढे खरोखरच काही दिवसांतच त्या वारल्या. त्यांचा हृदयरोग असाध्य असावा.. किंवा कदाचित त्यांची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली असावी.

    अप्पा…

    अप्पा हे गृहस्थ आमच्या वडिलांकडे कामाला होते. सहसा वडिलांकडे तरुण पोरं कामाला असायची. अप्पा याला अपवाद. वयाच्या पन्नाशीत त्यांनी आमच्याकडे का काम धरले असावे, माहीत नाही. त्यांनाही चहाचा शौक होता. दवाखान्यात काम नसले की, ते जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन पटकन चहा पिऊन येतं. बहुदा कोणीना कोणी त्यांना चहा पाजत असे… कारण पगार कमी होता.

    पुढे त्यांनी आमचे काम सोडले.

    सुट्टीत मी घरी यायचो. एकदा सायकलवर जात असताना एका चौकात “विवेक, ए विवेक…” असे कोणीतरी हाक मारली म्हणून थांबून बघितले तर अप्पा होते. त्यांची अगदीच रया गेली होती. तब्येत उतरली होती. अंगावरचे कपडेही खराब होते.

    हेही वाचा – आपल्यांचा आपलेपणा…

    “काय म्हणता अप्पा?”

    “काही नाही रे, मला फक्त चहा पाज.”

    त्यावेळी चहा चार आणे होता. माझ्या खिशात दोन चार रुपये असायचे… मी चार आणे त्यांना देण्यासाठी काढले. त्यांनी ते हातात घेतले नाही. समोरच्या टपरीवाल्याला द्यायला सांगितले. मी ते दिले…

    पुढेही कधीतरी मी त्या चौकातून गेलो आणि त्यांना मी दिसलो की, ते हक्काने मला थांबवायचे. चहाचे पैसे घ्यायचे. एक होते… ते जास्तीचे पैसे कधी मागायचे नाही, चहा व्यतिरिक्त काही घ्यायचे नाही. मुख्य म्हणजे, त्या चार आण्याला पण ते हात लावत नसत! ते चहावाल्याकडे जमा करायला सांगत.

    दरम्यानच्या काळात त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कानावर आल्या. कोणी म्हणे त्यांची सून त्यांना फक्त जेवायपूर्ती आणि झोपण्यापूर्ती घरात येऊ देते, त्यामुळे ते दिवसभर असेच कुठेतरी बसून राहतात, कुणी म्हणे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. (यावर माझा तरी विश्वास बसला नाही.) कुणी अजूनच काही सांगे. खरे खोटे कोणाला माहीत?

    पुढे ते वारले. नंतर बरेच दिवस त्या चौकातून सायकलवर जातांना “विवेक” अशी हाक कोणीतरी मारल्याचा भास होऊन मी कावराबावरा होत असे…

    आता बरीच वर्षे झाली. माझ्याकडे आता मोटरसायकल आहे. त्या चौकातल्या चहाच्या टपऱ्या आता चकचकित ‘अमृततुल्य’ झाल्या आहेत. आता त्या चौकातून जाताना मी मोटरसायकल उगाच हळू करतो आणि दिसणार नाहीत, हे माहीत असतानाही अप्पांना शोधण्याचा प्रयत्न करतो. अप्पा नसतातच आणि हो माझ्या खिशातही चार आणे कुठे असतात?

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026 अवांतर

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026 अवांतर

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    By तृप्ती देवAugust 20, 2026

    हाजमोलाची ती टीव्हीवरील जुनी जाहिरात आठवली की, आजही चेहऱ्यावर नकळत हसू फुलतं. रात्रीच्या अंधारात हॉस्टेलच्या…

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026

    स्वत:ला सांभाळूया…

    August 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026

    शांतता ऐकणारे कान

    September 9, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आदीची आदी, जें वृद्धीची वृद्धी

    September 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 सप्टेंबर 2026

    September 9, 2026

    भक्ती

    September 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 427
    • अवांतर 207
    • आरोग्य 145
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 573
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 906
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026

    शांतता ऐकणारे कान

    September 9, 2026
    Most Popular

    श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    September 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.