उत्तरार्ध
नानांनी अरुणासाठी पुसेगावचं स्थळ आणलं होतं. सात लाखांवर अडून बसलेली इंदू मावशी देखील तडजोडीला तयारी झाली. आपला मुलगा सचिनला ती म्हणाली, “अरुणाचं आयुष्य माझ्या म्हणण्यापेक्षा मोठं हाय… मला मस्त वाटतंय तेला धडा शिकवावा, पण जशी योग्य तडजोड हुईल तशी करूया. आता तिचं आयुष्य पुन्हा उभं राहिलं पायजे.”
सचिनच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी हलकंसं समाधान उमटलं.
दुसरीकडे, अरुणाचा नवरा अभिजीत, सामंत वकिलांच्या कार्यालयात पोहोचला. वकील म्हणाले, “पहिलं लग्न अजून कायदेशीररीत्या संपलेलं नाही. न्यायालयाचा अंतिम घटस्फोटाचा हुकूम झालेला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी जर पुढील विवाहाची अशी घाई केली असेल, तर ती बाब त्यांच्याच अडचणीची ठरू शकते. आधी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवू. त्यांनी काय केलं आहे, त्याचा खुलासा मागवू. परिस्थितीनुसार पुढची रणनीती ठरवू.”
0000
मुंगळे वकिलाच्या कार्यालयात कमालीची शांतता होती. टेबलावर अरुणाची फाइल उघडी पडली होती. तिच्यावर न्यायालयाच्या तारखा, अर्ज, नोटिसा आणि कागदपत्रांचा ढीग साचला होता. इंदू मावशी, अरुणा आणि सचिन समोरच्या खुर्च्यांवर बसले होते. तिघांच्याही चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
मुंगळे वकिलांनी नोटीस पुन्हा एकदा वाचली. चष्मा काढून टेबलावर ठेवला. काही क्षण त्यांनी कुणाकडेच पाहिलं नाही. मग शांतपणे म्हणाले,
“इंदूताई… एक प्रश्न विचारू?”
इंदू मावशीने मान खालीच ठेवली.
“या फाइलमध्ये एवढे कागद आहेत. पण यातल्या एकाही तारखेला मी तुम्हाला मोकळीक दिली नव्हती. प्रत्येक वेळी एकच सांगत होतो, तडजोडीचा विचार करा. अरुणाचं वय, तिचं भविष्य… यालाच प्राधान्य द्या. बाकी राग डोक्यातून काढून टाका.”
कार्यालयात पुन्हा शांतता पसरली.
“मी हात जोडून सांगितलं… समजावलं… कित्येकदा विनंती केली. सचिनने सांगितलं. मधूने सांगितलं. नानांनी सांगितलं. पण त्या वेळी तुमच्या रागाचा पारा आमच्या सगळ्यांच्या शब्दांपेक्षा मोठा होता.”
इंदू मावशीचे डोळे भरून आले.
वकील पुढे म्हणाले, “आज परिस्थिती वेगळी आहे. एका बाजूला अरुणाचं आयुष्य उभं आहे… आणि दुसऱ्या बाजूला ही नुकसानभरपाईची नोटीस.”
त्यांनी फाइल हळूच बंद केली.
“आता कोणता मार्ग निवडायचा, याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.”
इंदू मावशीच्या डोळ्यांतून अश्रू गालावर ओघळले.
मुंगळे वकिलांचा आवाज अधिक मृदू झाला… “एक जुनी म्हण आहे, ‘राग आणि भीक माग, दोन्ही माणसाला लहान करतात.’ रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभर हात धुवून मागे लागतो.”
हेही वाचा – कहाणी एका घटस्फोटाची!
ते क्षणभर थांबले… “तुम्हाला जावयाला धडा शिकवायचा होता, पण त्या धड्याची सर्वात मोठी किंमत तुमच्या मुलीलाच मोजावी लागली.”
इंदू मावशीने दोन्ही हातांनी चेहरा झाकला.
कार्यालयात कोणीच बोलत नव्हतं. त्या दिवशी न्यायालयाचा कोणताही आदेश झाला नव्हता… पण एका आईच्या मनाचा निकाल मात्र लागला होता. इंदू मावशीची मान खालीच होती. समोर टेबलावर पडलेल्या फाइलकडे ती निर्विकार नजरेने पाहत होती. आयुष्यभर प्रत्येक गोष्टीला ठाम उत्तर देणाऱ्या त्या स्त्रीच्या ओठांवर आज एकही शब्द नव्हता.
कार्यालयात पसरलेल्या शांततेचा भार प्रत्येकालाच जाणवत होता.
अरुणा अधूनमधून आईकडे पाहत होती. सचिन खुर्चीच्या हातावर बोटं आपटत होता. प्रत्येक क्षण एखाद्या तासासारखा भासत होता. मुंगळे वकिलांनी इंदू मावशीकडे पाहिलं…
“इंदूताई…”
तिने फक्त हळूच मान वर केली.
“मी काय समजायचं? तडजोडीचा मार्ग स्वीकारायचा आहे का?”
इंदू मावशीने डोळे मिटले. क्षणभरानंतर तिने अत्यंत मंद आवाजात एवढंच म्हटलं,
“तुम्हाला जे योग्य वाटतंय… ते करा.”
त्या एका वाक्यात तिचा सारा अहंकार गळून पडला होता.
मुंगळे वकिलांनी हळूच मान हलवली. टेबलावर ठेवलेला मोबाइल हातात घेतला. डायरीतून एक क्रमांक शोधला आणि कॉल लावला. दोन-तीन रिंग वाजल्या.
“हॅलो… नमस्कार, मी ॲडव्होकेट मुंगळे बोलतोय…”
पलीकडून उत्तर आलं… “हो, बोला.”
“आमच्या अरुणा या अशिलांच्या प्रकरणाबाबत बोलायचं होतं. दोन्ही बाजूंनी आता वाद वाढवण्यात काही अर्थ नाही. शक्य असेल तर आपण पुन्हा एकदा तडजोडीच्या टेबलावर बसूया का?”
कार्यालयात बसलेल्या तिघांचेही कान त्या संभाषणाकडे लागले होते. आता निर्णय न्यायालयात होणार नव्हता… तो दोन वकिलांच्या संयमी शब्दांतून आणि दोन कुटुंबांच्या शहाणपणातून घडणार होता.
मुंगळे वकील अजूनही मोबाइल कानाला लावून बसले होते. कार्यालयात बसलेल्या इंदू मावशी, अरुणा आणि सचिनचे कान त्या संभाषणाकडे लागले होते.
पलीकडून विरुद्ध पक्षाच्या वकिलांचा शांत, पण ठाम आवाज ऐकू येत होता…
“मुंगळे साहेब, आता तडजोडीची वेळ निघून गेली आहे.”
“तरीही एकदा विचार करा,” मुंगळे वकील म्हणाले. “दोन्ही बाजूंसाठी हा वाद इथेच संपलेला बरा.”
पलीकडून लगेच उत्तर आलं, “आमच्या अशिलाचं म्हणणं स्पष्ट आहे. त्यांना या सगळ्या प्रकरणामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. आधी आम्ही वाद मिटवण्याच्या भूमिकेत होतो. पाच लाख रुपये देऊन प्रकरण संपवायलाही तयार होतो.”
कार्यालयात बसलेल्या इंदू मावशीची बोटं एकमेकांत घट्ट अडकली.
पलीकडून आवाज आला, “त्या वेळी तुमच्या अशिलांनी कोणतीही तडजोड मान्य केली नाही. आता परिस्थिती बदलली आहे. आमच्या अशिलाच्या मते, या वादात मुलीच्या आईच्या भूमिकेमुळेच प्रकरण अधिक चिघळलं.”
मुंगळे वकील शांतपणे ऐकत होते.
“आता आमची अट एकच आहे,” पलीकडून ठाम स्वर आला. “एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्या. त्यानंतर घटस्फोटाच्या कार्यवाहीला आमच्या अशिलाची कोणतीही हरकत राहणार नाही.”
काही क्षण दोन्ही बाजूंनी शांतता पसरली.
“ठीक आहे,” मुंगळे वकील म्हणाले. “मी माझ्या अशिलांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो.”
फोन कट झाला. कार्यालयात पुन्हा शांतता पसरली.
मुंगळे वकिलांनी हळूच मोबाइल टेबलावर ठेवला. त्यांनी समोर बसलेल्या इंदू मावशीकडे पाहिलं…
“ताई…”
इंदू मावशीने मान वर केली.
“ज्या दिवशी पाच लाख रुपये समोर होते, त्या दिवशी राग आडवा आला. आज परिस्थिती अशी आहे की, तेच लोक आता उलट नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.”
हे ऐकताच इंदू मावशीने डोळे मिटले. तिला कोणाच्याही शब्दांनी टोचलं नव्हतं… तिला टोचत होती ती स्वतःच्या निर्णयांची सावली.
आठवड्याभरानंतर पुन्हा एकदा न्यायालयाच्या जुन्या दगडी इमारतीत सगळे जमले. यावेळी कुणाच्याही चेहऱ्यावर राग नव्हता. ना जिंकण्याचा आवेश… ना हरल्याची तक्रार… फक्त थकवा.
मुंगळे वकिलांनी तयार केलेला संयुक्त अर्ज दोघांसमोर ठेवला.
“वाचून घ्या… आणि इथे सही करा.”
अरुणाने पेन हातात घेतलं. क्षणभर तिची नजर समोर उभ्या असलेल्या नवऱ्याकडे गेली. कधीकाळी सात फेऱ्यांनी जोडलेलं नातं आता एका सहीवर तुटणार होतं. तिने काही न बोलता सही केली.
पलीकडे त्यानेही शांतपणे आपली सही केली.
दोघांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये अनेक वर्षांचा संघर्ष, न्यायालयाच्या असंख्य तारखा, तुटलेली स्वप्नं आणि न बोललेले आरोप कायमचे नष्ट झाले.
सचिनने आपल्या बॅगेतून एक पाकीट बाहेर काढलं. त्यात एक लाख रुपयांचा धनादेश होता. त्याने तो विरुद्ध पक्षाच्या सामंत वकिलांकडे शांतपणे दिला.
इंदू मावशीची नजर जमिनीवरच खिळली होती. कधीकाळी सात लाखांपेक्षा कमी रक्कम स्वीकारणार नाही, असा हट्ट धरला होता, तिनेच आज एक शब्दही न बोलता नुकसानभरपाईची किंमत चुकवली होती.
न्यायालयाने संयुक्त अर्जाची नोंद घेतली. काही औपचारिक प्रश्न विचारले. दोन्ही बाजूंची संमती नोंदवून न्यायाधीशांनी आदेशपत्रावर स्वाक्षरी केली.
त्या एका स्वाक्षरीने अनेक वर्षे ओढत नेलेला संसार कायद्याच्या दृष्टीने संपला.
न्यायालयाच्या पायऱ्या उतरताना अरुणाने एकदा मागे वळून पाहिलं. तेथे न्यायालय होतं… फाइली होत्या… तारखा होत्या… आणि तिच्या आयुष्यातील वाया गेलेली अनेक वर्षंही जणू तिथेच मागे उभी होती. ती शांतपणे पुढे निघाली. कारण काही प्रवास जिंकण्यासाठी नसतात… ते फक्त संपवण्यासाठी असतात. घटस्फोटाचा अध्याय अखेर संपला होता.
0000
रविवारची सकाळ होती. वरपक्षाची मंडळी वेळेवर आली. चहा-पोह्यांचा कार्यक्रम झाला. घरात पुन्हा एकदा लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या. काही दिवसांनी अरुणाच्या दुसऱ्या लग्नाचा मुहूर्त ठरवण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी बैठक ठेवली.
“पुढच्या महिन्यात दोन चांगले मुहूर्त आहेत,” पंचांगाची पानं उलटत नाना म्हणाले. सचिनने हसत मान डोलावली.
अरुणा शांतपणे खाली मान घालून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी आशा दिसत होती. कदाचित, यावेळी आयुष्य खरंच नव्याने सुरू होईल, अशी एक अस्पष्ट भावना तिच्या मनात डोकावत होती. इतक्यात नवऱ्याने समोर ठेवलेला चहाचा कप अलगद खाली ठेवला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू केव्हाच विरलं होतं…
“मुहूर्त ठरवण्यापूर्वी…” तो सावकाश म्हणाला, “…मला काही गोष्टी बोलायच्या आहेत.”
घरात क्षणात शांतता पसरली. इंदू मावशीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, “गेल्या काही दिवसांत मला या प्रकरणाबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. कोर्टाचे खटले… तडजोड… नोटिसा… नुकसानभरपाई… आणि त्या सगळ्यामागे काय काय घडलं…”
त्याने क्षणभर अरुणाकडे पाहिलं.
“मला कोणाचाही अपमान करायचा नाही. पण लग्नासारखा निर्णय घेण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत.”
चहाचे कप तसेच थंड होत गेले आणि घरात पुन्हा एकदा मुहूर्तापेक्षा महत्त्वाची ठरली ती सत्याची वेळ.
“मुहूर्त ठरवण्याआधी माझ्या दोन अटी आहेत.”
घरात चुटकीसरशी शांतता पसरली.
सचिन म्हणाला, “बोला.”
तो इंदू मावशीकडे पाहत म्हणाला,
“पहिली अट…”
“आमचं लग्न झाल्यानंतर आमच्या संसारात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करायची नाही. रोजचे फोन, प्रत्येक गोष्टीत सल्ले, आमचे निर्णय बदलण्याचा प्रयत्न किंवा आमच्या आयुष्यात हस्तक्षेप… हे मला मान्य नाही.”
त्याचा आवाज शांत होता; पण प्रत्येक शब्द ठाम होता.
“आमचा संसार आम्ही दोघांनी उभा करायचा आहे.”
इंदू मावशी निःशब्द बसली होती.
तो पुढे म्हणाला, “दुसरी अट अरुणासाठी आहे.”
अरुणाने वर पाहिलं.
“संसारात निर्णय घेताना तू प्रत्येक वेळी आईचंच ऐकणार असशील, तर हे लग्न करण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक गोष्ट आपण दोघं मिळून ठरवू. बाहेरचं मत ऐकू, पण अंतिम निर्णय आपला असेल.”
त्याने क्षणभर थांबून पुढचं वाक्य उच्चारलं, “या दोन अटी तुम्हाला मान्य असतील तरच आपण आज मुहूर्त ठरवू.”
हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…
घरातील वातावरण कमालीचं गंभीर झालं.
“अन्यथा…”
त्याने पंचांगावर ठेवलेला हात मागे घेतला.
“…लग्न ठरलं असलं, तरी मी हा निर्णय इथेच थांबवायला तयार आहे.”
कोणीच काही बोललं नाही. इंदू मावशीच्या चेहऱ्यावर अनेक भावना एकाच वेळी उमटल्या. आश्चर्य, वेदना, अपराधीपणा आणि स्वीकार.
तिला त्या क्षणी जाणवलं… कोर्टकचेरीमुळे हरवलेला विश्वास आता या बैठकीत पुन्हा कमवावा लागणार होता. घरात पुन्हा शांतता पसरली होती. भावी जावयाच्या त्या शब्दांचे पडसाद अजूनही प्रत्येकाच्या मनात घुमत होते.
इंदू मावशी समोर बसली होती. आयुष्यभर स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिलेली ती स्त्री आज पहिल्यांदाच काही बोलण्याआधी थांबली होती. तिच्या नजरेसमोर अरुणाचा चेहरा येत होता. कोर्टाच्या पायऱ्या… वकिलांचे शब्द… नोटिशीचा धक्का… आणि शेवटी मुलीच्या डोळ्यांत दिसलेली असहाय्यता… सगळं काही क्षणात डोळ्यांसमोरून गेलं.
“आई…” सचिनने हळू आवाजात म्हटलं. तिने हातानेच त्याला थांबवलं. काही क्षणांनी ती स्वतःहून बोलली.
“त्यांच्या अटी मला मान्य आहेत.”
सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. तिचा आवाज पूर्वीसारखा कडक नव्हता.
“माझ्या पोरीचं आयुष्य सुखाचं झालं पाहिजे. यापुढे माझ्या हट्टामुळे तिच्या संसारात काहीही अडचण यायला नको.”
तिने अरुणाचा हात हातात घेतला… “आता तुझं आयुष्य तू जगायचं. माझी सावली तुझ्यावर ओझं बनणार नाही.”
अरुणाच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या एका वाक्यात इंदू मावशीच्या मनातील अनेक वर्षांचा अहंकार विरघळून गेला होता!


