भाग – 2
बाप्पाच्या आजोबांची थेट खाडीपर्यंत पोहोचलेली भलीमोठी जमीन होती. आजोबांचा उदार, सर्वांना मदत करण्याचा स्वभाव आणि बदलत्या काळाचा न आलेला अंदाज; यामुळे त्या जमिनीवर त्यांच्या अनेक नातेवाईकांची, सोयऱ्याधायऱ्यांची, मित्रपरिवाराची घरं झाली आणि ती ती जमीन, त्या त्या घरमालकाच्या घशात गेली. बाप्पाचे बाबा माळकरी; व्यवहार त्यांच्याही ध्यानात आला नाही आणि आता त्यांच्या कुटुंबाकडे ते राहात असलेली एक लांबलचक चाळ आणि त्याच्यापुढचं आटोपशीर अंगण एवढंच राहिलं.
आजोबांपासून त्यांचा गणपतीचा कारखाना होता. भल्यामोठ्या बंदिस्त जागेत जवळ जवळ वर्षभर, नावाला काही महिन्यांची विश्रांती घेऊन कारखाना सुरूच असायचा. भाद्रपदात, गणेश चतुर्थीला सगळा कारखाना रिकामा व्हायचा. पण पूर्ण रिकामा नाही. भयाण, एकाकी वाटू नये म्हणून आजोबा पाच न रंगवलेल्या मूर्ती, निरनिराळ्या घडवंचीवर विखरून ठेवायचे… त्यांच्या घरच्या गणपतीला सोबत म्हणून, सवंगडी म्हणून! अनंत चतुर्दशीला विसर्जन झाल्यावर कारखाना काही काळ शांत व्हायचा. मग पुन्हा माघी गणपतीचं काम सुरू व्हायचं. हे थोडंच असायचं. ते संपतंय तोवर पुन्हा भाद्रपदातील गणपती!
हेही वाचा – गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…
आजोबांचा हात कलाकाराचा होता. सगळं नाजूक, कौशल्याचं काम ते स्वतः करायचे. गणपतीचे डोळे ते असे काही रंगवायचे की, कोणत्याही कोनातून पाहिलं तरी गणराया आपल्याकडेच पाहतोय, असं वाटायचं. त्याच्या नजरेतील प्रेम, माया, ममता, कृपा, दिलासा, कणव… सर्व भाव वंदन करणाऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचे.
छोटा असल्यापासून बाप्पा आजोबांच्या हाताखाली कारखान्यात लुडबूड करायचा. जमेल ते, झेपेल ते काम करायचा. ओल्या मातीत लडबडायचा, रंगांनी बरबटायचा. बाबापण नोकरीवरून आल्यावर कारखान्यातच घुसायचे. हळूहळू मोठ्या, अवाढव्य मूर्ती बनवण्याचं वेड समाजात आलं. मूर्तिकारांची त्या शर्यतीत दमछाक व्हायला लागली. त्यासाठी लागणारी मोठी, बंदिस्त, सुरक्षित जागा; त्यात गुंतवायला लागणारा पैसा! छोट्या व्यावसायिकांची ससेहोलपट व्हायला लागली. जे तगले ते तगले, बाकीच्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं.
स्वतःची हक्काची जागा अतिक्रमणाने गिळंकृत केली होती. याच्या त्याच्या हातापाया पडून, दरवर्षी कुठेना कुठे भाड्याने जागा मिळायची. पण स्थैर्य नव्हतं. डोक्यावर टांगती तलवार होती. पैसा अडकवायचा म्हणजे धास्ती वाटायची… मूर्ती ठेवायला, रंगवायला पुरेशी जागा मिळेल की, नाही? गणपती उत्सवात सार्वजनिक गणपती मंडळांच्या स्पर्धा असायच्या. त्यांनी पण मोठ्या मूर्ती बनवल्या. पहिली घाबरत घाबरत आठ फुटी, दुसऱ्या वर्षी थोड्या आत्मविश्वासाने दहा फुटी, त्याच्या पुढल्या वर्षी आणखी हुरूप येऊन बारा फुटी! दोन रौप्य आणि एक सुवर्ण पदक त्यांना मिळालं. तेव्हा आजोबा नव्हते. त्यांनी याची देही, याची डोळा हा सोहळा पाहिला असता, तर ते धन्य धन्य झाले असते.
हेही वाचा – …असाही विचार करता येतो!
गणपतीचे वत्सल, भावदर्शी डोळे रंगवायचं कौशल्य बाप्पाच्या बोटात आलं नव्हतं. आजोबा रंगकाम करायचे, तेव्हा तो खूप छोटा होता. पण त्याच्या चुलत भावाच्या, मन्याच्या बोटात मात्र ती जादू आली होती. डोळे रंगवायचं काम तोच इमानेइतबारे करायचा! लोक साधारण किती अंतरावरून बघतील, याचा अंदाज घेऊन तो आपल्या कुंचल्याने मूर्ती मनोहारी करायचा, जिवंत करायचा.


