|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्याला जे दिसते, ते नको असते आणि जे दिसत नाही, त्याचे कुतूहल अधिक असते. म्हणूनच राहू-केतू आपल्यावर हावी असतात. एकतर त्यांच्या नसून असण्याचा पगडा आपल्यावर असतो. राहू-केतूबद्दल अगदी दोन ओळी कुठे दिसल्या तरी, तिथे आपण आकर्षित होतो. स्वतःच्या पत्रिकेतील राहू-केतू यांचा विचार नको तितकाही करतो. कुठे काही वाचले की, तेच मनात धरून आता माझ्याही बाबत असे होणार, असे गृहीत धरतो. असो.
राहू म्हणजे शरीराचे शीर आणि केतू हा मानेपासून खालचा भाग आहे. म्हणजे, केतूकडे कुठलीही ज्ञानेंद्रिये – जसे नाक, कान, डोळे, जीभ काहीच नाही. पण त्याच्याकडे स्पर्श आहे आणि सर्वात मुख्य मन. त्याला बिचाऱ्याला या सुंदर सृष्टीचा आस्वाद घेता येत नाही आणि जीवनातील अनेक आनंद उपभोगता येत नाही, म्हणून तो आपल्या आतील दुनियेत रममाण होण्याचा, म्हणजे अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करत असतो.
आपल्या आत सुद्धा आपला एक असा चेहरा आहे, ज्याकडे आपले कधीच लक्ष नसते; कारण आपण बाह्य जगात रमलेले असतो. अनेकदा अंतर्मुख झाल्याने आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात, दृष्टीकोन बदलतो. योगसाधना केतू आहे. अनेक योगी, साधक यांच्या पत्रिकेतील केतू अभ्यासण्यासारखा असतो. अध्यात्म आणि अंतर्मुख होणे म्हणजे केतू. केतू हा विरक्त करतो.
केतू सप्तम भावात असेल तर वैवाहिक जीवन अगदी मनासारखे असेल असे नाही. पण आपला जोडीदार जर सेवाभावी वृत्तीचा किंवा धार्मिक असेल तर केतूचा प्रभाव कमी होतो हे नक्की. केतू ज्या भावात असेल, त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी आपल्याला सोडायला लागतात त्याचा हट्ट धरून चालत नाही. तसेच, तिथे खूप अपेक्षाही ठेवून चालत नाही.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क
अनेकदा केतू सप्तम भावात असेल तर विवाह टिकत नाही, असे आपण ऐकतो वाचतो, पण तसे नसते. मुळात कुठल्याही एका घटनेला फक्त कुठलाही एक ग्रह कारणीभूत नसून तिथे एकापेक्षा अधिक ग्रह, भाव आणि अर्थात दशा कार्यरत असतात.
आत्मज्ञानाचा कारक केतू आहे. केतू हा ग्रह असा ग्रंथ वाचून समजत नाही, तर त्याची अनुभूती येते, हे समजणे महत्त्वाचे आहे. पत्रिकेत केतू प्रबळ असेल तर, त्याच्या दशेत व्यक्ती संसारिक जीवनातून मुक्त होईल. कशाचीच आसक्ती उरणार नाही. व्यक्ती संसारात असूनही नसल्यासारखा राहील. केतू विरक्त आहे. आपल्याकडे जे काही आहे, मग स्वतः शरीर असो अथवा मिळवलेले ज्ञान, संपत्ती सर्व काही देण्याची मानसिकता ज्याची आहे, तो केतू आहे.
परमेश्वरी शक्तीशी अनुसंधान करणारा केतू आहे. राहू-केतू हे पारमार्थिक ग्रह सुद्धा आहेत. पण मनुष्य स्वभाव आहे की, कुणी कितीही चांगले केले तरी, आपल्याला ते दिसत नाही; पण वाईट असते, ते लगेच लक्षात येते आणि आपण तेच डोक्यात ठेवतो. तसेच, राहू-केतूचेही आहे. म्हणूनच अभ्यास अधिकाधिक केला की, त्यांच्या अनेक न बघितेल्या कलांशी आपली ओळख होते.
परमेश्वराला आपल्या धनसंपत्तीशी काहीही देणे घेणे नाही. पण आपण मनापासून श्रद्धेने केलेली भक्ती, मनापासून असलेले समर्पण, मनातील ईश्वराच्या प्रति असलेला भाव खरा असेल तर, ईश्वरप्राप्ती झालीच म्हणून समजा. म्हणूनच केतू हा अध्यात्मातील प्रथम उच्च ग्रह आहे, ‘पापग्रह’ म्हणत ज्याकडे कायम दुर्लक्ष होते.
चंद्र, शुक्र शुभ ग्रह म्हणून आपण त्यांना गोंजारत बसतो. हे बिघडले तर आयुष्य बेचिराख होते. पण आपण सदैव दोष राहू-केतूला देत राहतो. काहीही झाले की, शनीला टार्गेट करतो. पण या ग्रहांची दुसरी अध्यात्मिक बाजूही आहे.
‘तूच दिले आहेस सर्व आणि तुझेच तुला अर्पण’ हा भाव करून केलेली निर्व्याज भक्ती म्हणजे केतू. भौतिक सुखाची मागणी करायची गरजच नाही, आपल्या भाग्यात आहे ते मिळणारच आहे; पण मनाची शांतता, शांत झोप आणि समाधान हे आपली खरी भक्तीच आपल्याला देऊ शकते. आपले इथे काहीही नाही… जे आहे, ते त्यांनीच दिलेले आहे. जाताना आपण काहीही नेणार नाही, ही जाणीव प्रत्येक क्षणी असणे आणि त्याप्रमाणे वागणे हाच केतू आहे.
हेही वाचा – कानडा राजा
प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या आनंदाचा कारक आहे… जसे केतू – immense joy म्हणजे परमानंद, चंद्र – मनाची शांतता, गुरू – ज्ञान, बुध – वेगवेगळ्या भाषा शिकणे, शुक्र – प्रेम शोधेल, सूर्य – अधिकार आणि नावलौकिक, प्रतिष्ठा, मंगळ – शक्ती.
केतू कशाच्याही मागे न धावता सगळे सोडून देण्याचा संदेश देईल. सगळ्या मुक्तीतच जीवनचा खरा अर्थ आहे. नवम भावात केतू असेल, तर शुभ मानले आहे. ही व्यक्ती उत्तम मार्गदर्शन करू शकते. आपल्या कुळाचा कारक केतू आहे. केतूला मोक्षाचा कारक म्हटले आहे, त्यामुळे मोक्ष त्रिकोणात केतू चांगले काम करतो.
दशम भावात केतू कामाशी बांधून ठेवू शकणार नाही. लग्नातील केतू कॉर्नरचे घर देतो… म्हणजे घर इमारतीच्या कॉर्नरला असेल. दुसऱ्या घरातील केतू प्रवासामुळे पैसे देईल. तिसऱ्या घरातील केतू दुसऱ्या अपत्यासाठी त्रास देईल. पुरुषाच्या पत्रिकेत तृतीय भावातील केतू पायाखाली अवयवाला त्रास देईल. चतुर्थातील केतू घरात अंतर्मुख (introvert) करेल आणि बाहेरील जगतात वेगळा असेल. पंचमात अंतर्ज्ञान (intuition), षष्ठ भावात असा आजार देईल ज्याचे कारण समजणार नाही. सप्तम भावातील केतू असेल, तर जोडीदार अध्यात्मिक असेल, अष्टमातील केतू जननेन्द्रीयासंबंधी त्रास तसेच कुणाचा मृत्यू समजेल, भाग्यातील चांगला, दशम भाव लाभातील कामाशी सलग्न राहणार नाही, लाभातील केतू आईसाठी चांगला नाही, मोक्षातील केतू ईश्वराला शरण जाईल तर चांगले.
राहू-केतू असे नाही, पण प्रत्येक ग्रह हा सखोल चिंतनाचा विषय आहे. ग्रह आणि त्यांचे योग तसेच भाव ही सर्व गुंफण अभ्यासण्याजोगी असते. फक्त वरवर जे दिसते, जे समजते, ते तसे नसते… कारण आपला अभ्यास अपुरा असतो. प्रत्येकाच्या कुटुंबात अनेक पिढ्यात एक सुसूत्रता, पॅटर्न आपल्याला बघायला मिळते ती केतू मुळे!
अमावास्येला दान करा, अन्नदान करा.


