अध्याय तेरावा
जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें । वाणसियेचें उभलें । कोण न रिगे ॥700॥ तैसें जयाचें अंतःकरण । तयाच्या ठायीं संपूर्ण । अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे ॥701॥ आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी । स्वर्गींही खावया जोडी । येथैनिची ॥702॥ जो अखंड भोग जचे । जया व्यसन काम्यक्रियेचें । मुख देखोनि विरक्ताचें । सचैल करी ॥703॥ विषो शिणोनि जाये । परि न शिणे सावधु नोहे । कुहिला हातीं खाये । कोढी जैसा ॥704॥ खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें । तऱ्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥705॥ तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं । व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी ॥706॥ फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव । परि न म्हणे ते माव । रोहिणीची ॥707॥ तैसा जन्मोनि मृत्यूवरी । विषयीं त्रासितां बहुतीं परीं । तऱ्ही त्रासु नेघे धरी । अधिक प्रेम ॥708॥ पहिलिये बाळदशे । आई बा हेंचि पिसें । तें सरे मग स्त्रीमांसें । भुलोनि ठाके ॥709॥ मग स्त्री भोगितां थावों । वृद्धाप्य लागे येवों । तेव्हां तोचि प्रेमभावो । बाळकासि आणी ॥710॥ आंधळें व्यालें जैसें । तैसा बाळें परिवसे । परि जी मरे तो न त्रासे । विषयांसि जो ॥711॥ जाण तयाचां ठायीं । अज्ञानासि पारु नाहीं । आतां आणीके कांहीं । चिन्हें सांगों ॥712॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके
अर्थ
त्याप्रमाणे सत्रातील अन्न असते, (ते वाटेल त्याला मिळते) किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही? अथवा वेश्येच्या उंबर्याच्या आत कोण प्रवेश करणार नाही? ॥700॥ त्याचप्रमाणे ज्याचे अंत:करण असते (म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे जे बर्यावाईट कल्पनांनी व्यापले जाते) त्या पुरुषाच्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे ॥701॥ आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांवरील प्रेम सोडीत नाही व मेल्यानंतरही स्वर्गातही खावयास (भोगावयास) मिळावे म्हणून जो येथूनच सामग्री (सकाम कर्मे) करून ठेवतो ॥702॥ जो भोगाकरिता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्य कर्म करण्याचे व्यसन असते व जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरेसह स्नान करतो, ॥703॥ विषय त्रासून जातो, परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधही होत नाही. तो कसा तर; जसा कोडी पुरुष सडलेल्या हातांनी खातो, पण त्याला जशी कुजलेल्या हातांची किळस येत नाही ॥704॥ ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही व गाढव तिच्या जवळ आला असता, ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकाड फोडते, तरी पण तो मागे हटत नाही. ॥705॥ त्याप्रमाणे जो विषयाकरिता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिरवतो. ॥706॥ हरिण हा मृगजळाच्या मागे लागून ऊर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडीत नाही पण असे म्हणत नाही की, ही मृगजळाची भ्रांती आहे. ॥707॥ त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्यास त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो. ॥708॥ पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई, बाबा असे आईबापांचे वेड असते, ते संपते आणि मग (तारुण्यात) स्त्रीच्या रूपाने तो वेडा होऊन राहतो. ॥709॥ पण तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असतां म्हातारपण येऊ लागते, त्या वेळी तेच स्त्रीवरील प्रेम मुलाबाळांवर आणून ठेवतो. ॥710॥ एखाद्या आंधळ्या मुलास जन्म दिला म्हणजे त्याची आई जशी आपल्या तान्ह्या मुलास विसंबत नाही, तसे जो आपल्या मुलाबाळास धरून रहातो आणि मरतो परंतु विषयांविषयी त्यास वीट येत नाही, ॥711॥ त्याच्या ठिकाणी अज्ञानाला पार नाही, असे समज. आता (अज्ञानाची) आणखी काही लक्षणे सांगतो. ॥712॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा


