अध्याय तेरावा
कां मातलिया सरडा । पुढती बुड पुढती शेंडा । हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥689॥ जैसा रोविल्याविणें । रांजणु थारों नेणे । तैसा पडे तैं राहणें । एऱ्हवीं हिंडे ॥690॥ तयाचां ठायीं उदंड । अज्ञान असे वितंड । जो चांचल्यें भावंड । मर्कटाचें ॥691॥ आणि पैं गा धनुर्धरा । जयाचिया अंतरा । नाहीं वोढावारा । संयमाचा ॥692॥ लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरांडा । तैसा निषेधाचिया तोंडा । बिहेना जो ॥693॥ व्रतातें आड मोडी । धर्मातें पायें वोलांडी । नियमाची आस तोडी । जयाची क्रिया ॥694॥ नाहीं पापाचा कंटाळा । नेदी पुण्यासी जिव्हाळा । लाजेचा पेंडवळा । खाणोनि घाली ॥695॥ कुळेंसीं जो पाठमोरा । वेदाज्ञेसीं दुऱ्हा । कृत्याकृत्यव्यापारा । निवाडु नेणे ॥696॥ वसो जैसा मोकाटु । वारा जैसा अफाटु । फुटला जैसा पाटु । निरंजनीं ॥697॥ आंधळें हातिरूं मातलें । डोंगरीं जैसें पेटलें । तैसें विषयीं सुटलें । चित्त जयाचें ॥698॥ पैं उबडां काइ न पडे । मोकाटु कोणां नातुडे । ग्रामद्वारींचे आडें । नोलांडी कोण ॥699॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली
अर्थ
माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासून तो शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा करतो, त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते ॥689॥ ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणतच नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल, तरच तो एके ठिकाणी राहील, नाही तर तो सारखा हिंडतो ॥690॥ जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे, त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे. ॥691॥ आणि अर्जुना, ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंध नाही ॥692॥ ओहोळाला पूर आला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांधाला जुमानत नाही, तसा जो निषिद्ध कर्म करण्याकरिता भीत नाही, ॥693॥ व्रतांना मध्येच मोडतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो, व ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच राहात नाही ॥694॥ ज्याला पापाचा कंटाळा नाही, जो पुण्याला आश्रय देत नाही, जो लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो ॥695॥ जो आपल्या कुळातील आचार मानीत नाही, जो वेदांची आज्ञा एकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास योग्य कर्म कोणते, यातील निवड जो जाणत नाही, ॥696॥ सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट (पाहिजे तिकडे वाहात असतो अथवा अरण्यात पाण्याचा फुगलेला पाट जसा पाहिजे तिकडे वाहात असतो ॥697॥ आंधळा हत्ती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो, अथवा डोंगरावर पेटलेला वणवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते ॥698॥ पण उघड्यावर काय काय पडत नाही? मोकळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही? गावच्या वेशीचा उंबरा कोण ओलांडीत नाही? ॥699॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके


