भाग – 3
‘प्राजक्ताची फुलं’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित करून स्वप्नीलने जुईला सुखद धक्का दिला होता. त्यानंतर लगेच तिला घेऊन तो उटीजवळ मित्राच्या रिसॉर्टवर गेला. तिथे त्या मित्राकडून स्वप्नीलही एक उत्कृष्ट कवी असल्याचे जुईला समजले आणि ती चकितच झाली. त्याने स्वप्नीलच्या कवितांचे पुस्तकच तिला वाचायला दिले. रात्री एक वाजेपर्यंत जुई त्या कविता वाचत होती. वाचून झाल्यावर भरून आलेले डोळे तिने पुसले. सुधीरच्या ज्या कवितांसाठी ती वेडी झाली होती त्या कविता तिला आठवल्या. स्वप्नीलच्या उच्च दर्जाच्या कवितांपुढे त्या तिला भिकार वाटल्या.
आपले वर्कशॉप चालविण्यासाठी स्वप्नील मेकॅनिकल इंजिनीअर व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी स्वप्नील इंजिनीअर झाला. नंतर मेहनतीने आपला व्यवसाय वाढला… अन् त्या धबडग्यात तो कवितांपासून दूर गेला. “आजही मला कविता आवडतात, पण मी त्यात गुंतत नाही. किंबहुना, जीवनाचं वास्तव मला तसं करू देत नाही…” असे त्याने सांगितले.
उटीवरून घरी परतल्यावर दोनच दिवसांनी जुईला एका अनोळखी नंबरवरून फोन आला…
“हॅलो, जुई मी सुधीर बोलतोय…”
जुई दचकली तिच्या हातून फोन पडता पडता राहिला.
“काय गं, दचकलीस वाटतं!” तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, “हो मी तुझा सुधीरच बोलतोय. कशी आहेस?”
“मी ठीक आहे,” आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री करून ती बोलली.
“अगं भेटायचंय तुला, कधी भेटशील?”
“सुधीर, तुला माहितीय माझं आता लग्न झालंय. आपल्याला आता भेटता येणार नाही.”
“कविसंमेलनात तर भेटू शकशील ना? येत्या रविवारी तुमच्या शहरात कविसंमेलन आहे. मी तर आहेच त्यात, पण मी तुझंही नाव दिलंय. तुझ्या दोन-तीन कविता तयार ठेव… अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही.”
जुईला काय बोलावं ते कळेना. सुधीरला भेटायची तिला उत्सुकता तर होतीच, शिवाय कविसंमेलनात कविता सादर करायची संधीही तिला मिळणार होती. शेवटी तिने निर्णय घेतला…
“ठीक आहे, मी येईन.”
“ये हुई ना बात!” तो मोठ्याने हसला. “लवकरच ये. जरा गप्पाही मारता येतील. जुन्या आठवणींना तेवढाच उजाळा…”
तिने त्याला कार्यक्रमाचं स्थळ आणि वेळ विचारून घेतली आणि तो काही बोलायच्या आत कॉल कट केला. अनामिक भीतीने तिचं ह्रदय धडधडू लागलं. आता कुठे नुकतंच तिच्या मनात स्वप्नीलबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. त्या दोघांत आताशी निर्माण झालेल्या मधुर संबंधांना सुरूंग लावण्यासाठी तर सुधीर आला नव्हता? तसं असेल तर सुधीरला दूर ठेवलेलंच बरं… पण आपण त्याचं ऐकलं नाही आणि त्याने घरी येऊन तमाशा केला तर? किंवा या भेटीचं निमित्त करून त्याने घरी येणंजाणं वाढवलं तर?
हेही वाचा – वास्तव… जुईला सुधीरचीच ओढ
तिने मनाची चाचपणी केली. तिला सुधीर हवा होता की स्वप्नील? तुलना करता करता तिला स्वप्नीलचं पारडं जड वाटायला लागलं. तिचं लग्नाआधीचं वास्तव त्याने किती सहजगत्या स्वीकारलं होतं. तिला कवीमनाचा नवरा हवा होता. स्वप्नील तसा होताच, शिवाय सुधीरजवळ देखणेपण आणि कविता याशिवाय दुसरं काय होतं?
या विचारासरशी तिचं मन शांत झालं. आता प्रश्न होता सुधीर प्रत्यक्ष भेटल्यावर तिला त्याच्याबद्दल काय वाटतं याचा! त्याचा विचार आताच करायची गरज नव्हती. स्वप्नीलला सुधीरबद्दल सांगावं का, याचा ती विचार करू लागली. पण उगीचच संशयाचं त्याच्या मनात निर्माण करायची तिला इच्छा होईना. शेवटी तिने स्वप्नीलला फक्त कवीसंमेलनाबद्दल सांगायचा निर्णय घेतला. सुधीरबद्दल ती त्याला काहीच सांगणार नव्हती. शेवटी सुधीर हे तिचं प्रकरण होतं… ते तिलाच निपटावं लागणार होतं. त्यात स्वप्नीलसारख्या सज्जन माणसाला ओढण्यात काहीच अर्थ नव्हता.
रात्री तिने सगळ्यांना कविसंमेलनात भाग घेत असल्याची कल्पना दिली. कुणी येऊ नये, अशी इच्छा असताना केवळ औपचारिकता म्हणून सगळ्यांना चलण्याचा आग्रहही केला. स्वप्नील आणि त्याच्या भावाला वेळ नव्हता. तिच्या जावेला कवी आणि कविता यामध्ये काडीचाही रस नव्हता!
रविवारी संमेलनस्थळी ती अर्धा तास अगोदर पोहोचली. पार्किंगला जागा नव्हती म्हणून तिने आपली कार सभाग़हाच्या मागच्या बाजूला शांत जागी लावली. गेटकडे ती पायी निघाली. गेटसमोरच तिला सुधीर उभा असलेला दिसला, बहुतेक तिचीच वाट पहात असावा. त्याला पाहून तिच्या मनात भावभावनांचा सागर उसळला. कधीकाळी तो तिचा सर्वस्व होता. पण त्याच्याच पळपुटेपणामुळे तिला मोठ्या अनिच्छेने स्वप्नीलशी लग्न करावं लागलं होतं. भेटल्यावर त्याच्याशी कसं वागावं, हेच तिला सुचेनासं झालं. ती त्याच्याजवळ आली. तो तिच्याकडे पाहून हसला…
“हाय जुई, कशी आहेस? लग्न बरंच मानवलेलं दिसतंय तुला! पूर्वीपेक्षा खूप सुंदर दिसतेयस…”
ती नुसती हसली. त्याच्याकडे तिने निरखून पाहिलं. पूर्वीसारखा तो अजिबात देखणा दिसत नव्हता. जणू तो सुधीर नव्हताच!
“चल, सभागृहात जाऊया,” त्याने तिचा हात हातात घेतला. तिने तो सोडवून घेतला.
“आता मी परका झालो वाटतं…” तो तिच्याकडे पहात हसत म्हणाला. ती काहीच बोलली नाही. असं चारचौघात केलेलं प्रेमाचं प्रदर्शन तिला आवडलं नाही.
“आज संध्याकाळी हॉटेलवर ये. एकत्रच जेवू. तुझी सगळ्या मोठमोठ्या कवींची ओळख करून देतो.”
“बघूया… नंतर सांगते.”
“तुला यावंच लागेल, नाहीतर मी तोंडावर पडेन. तुझ्यासारख्या सुंदर कवयित्रीशी माझे प्रेमाचे संबंध आहेत, हे मी सगळ्या कवींना आधीच सांगून ठेवलंय.”
त्याने आपल्याला गृहित धरलंय आणि तो आपल्यावर हक्क गाजवू पहातोय, हे तिच्या लक्षात आलं. पण ती चूप राहिली. पुढे काय काय होतंय, हे तिला बघायचं होतं.
दोघांनी सभागृहात प्रवेश केला. तिला पाहून आयोजक पुढे आले. तिला हसून नमस्कार केला.
“जुईजी तुमचीच वाट पहातोय. लगेच कार्यक्रम सुरू करूया…”
स्टेजवर सगळ्या कवींसोबत जुईही जाऊन बसली. दोन कवींनी कविता सादर केल्यावर सूत्रसंचालकाने सुधीरला आमंत्रित करताना बंडखोर कवी म्हणून ओळख करून दिली. सुधीरने कविता सादर करायला सुरुवात केली. पण हे काय? ज्या कवितांमुळे जुई त्याच्या प्रेमात पडली होती, ज्या कविता तिच्या मेंदूला झिणझिण्या आणायच्या त्याच कविता तिला बीभत्स, घाणेरड्या का वाटू लागल्या होत्या? सुधीरने पहिली कविता संपवली. मंचावरचे कवी सोडून कुणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. जुईने सुद्धा नाही. त्याने दुसरी कविता सुरू केली. समाजातली वास्तवता इतकी भीषण असते, हे जुईला प्रथमच कळत होतं. पण ज्या बीभत्स शब्दांत ती कविता गुंफली होती, ते शब्द जुईला ऐकवेनात. एक प्रकारची किळस तिच्या मनात दाटून आली. जगाकडे किळसवाण्या नजरेने बघणाऱ्या सुधीरचा तिला संताप आला. अशा घाणेरड्या माणसावर आपण प्रेम केलं, याची तिला लाज वाटू लागली. सुधीर कविता संपवून तिच्याजवळ येऊन बसला. हसत तिच्याकडे पहात विचारलं,
“काय आवडल्या ना कविता?”
त्याच्या कविता कुणालाच आवडल्या नाहीत हे सांगायचं तिच्या ओठावर आलं होतं. तिने कसाबसा मनाला आवर घातला.
सूत्रसंचालकाने तिचं नाव उच्चारलं. जुईने खास स्वप्नीलने निवडून दिलेल्या कविता म्हणायला सुरुवात केली. प्रेक्षकातून “वाह वाह बहोत खूब” असे उद्गार येऊ लागले. कविता संपल्यावर खूप टाळ्या वाजल्या. कविता संपवून जुई आयोजकांकडे गेली, स्वप्नीलची एक कविता म्हणायची तिने परवानगी मागितली. आयोजकांनी मोठ्या नाखुषीनेच ती दिली. जुईने ती कविता सादर करायला सुरुवात केली आणि पहिल्या ओळीपासून टाळ्या मिळू लागल्या. कविता संपल्यावर तर टाळ्यांचा कडकडाट झाला. आयोजक तिच्याकडे घाईघाईने आले आणि म्हणाले,
“जुईजी फारच सुंदर कविता. अजून एखादी असेल तर जरूर वाचा.”
जुईने आनंदाने पर्समधून स्वप्नीलच्या कवितांचं पुस्तक काढलं आणि आणखी एक कविता सादर केली. यावेळी तर जास्तच टाळ्यांचा कडकडाट झाला. सूत्रसंचालकांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले,
“जुईजी तुमचे पती इतके चांगले कवी आहेत, तर तुम्ही त्यांना का नाही आणलंत? ठीक आहे, पुढच्या कविसंमेलनात त्यांना जरूर घेऊन या…” ती आनंदाने तिच्या खुर्चीत जाऊन बसली. सुधीरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला,
“मला नाही आवडल्या कविता. वास्तव नेहमी एवढं पॉझिटिव्ह नसतं.”
“वास्तव नेहमी एवढं बीभत्सही नसतं सुधीर! आणि काय फरक पडतो तुला एकट्याला नाही आवडल्या तर? रसिकांनी तर टाळ्यांचा पाऊस पाडलाय…”
“कार्यक्रम संपला की भेट. कविता कशी असते सांगेन तुला.”
“जरूर सुधीर. हॉलच्या मागच्या बाजूला ये. मलाही तुझ्याशी बोलायचंय…” त्याच्या नजरेला नजर भिडवत ती धीटपणे म्हणाली.
कार्यक्रम संपल्यावर बाकीच्या कवींनी आणि रसिकांनी तिला घेरलं. तिच्या आणि स्वप्नीलच्या कवितांची मुक्तकंठाने स्तुती केली.
थोड्या वेळाने ती सभागृहाच्या मागच्या बाजूला आली. सुधीर तिचीच वाट बघत होता.
“मग… येते आहेस ना संध्याकाळी हॉटेलवर?” हसत त्याने विचारलं.
“नाही. अगोदर मला सांग, तू त्या दिवशी माझ्या घरी येणार होतास. आम्ही रात्री दहापर्यंत तुझी वाट बघितली, पण तुझा पत्ताच नव्हता. मोबाइलही स्विच ऑफ करून ठेवला होतास. नंतर तर कॉलेजमधूनच नाव काढून पळून गेलास. का केलंस तू असं?” तिने रागाने विचारलं.
“मी तुला तेव्हाच सांगितलं होतं की, मी आझाद पंछी आहे म्हणून. मला लग्नबिग्न हा प्रकारच पसंत नव्हता. पण तू माझ्या मागेच लागली होती. मला पळून जाण्याव्यतिरिक्त दुसरा मार्गच तू ठेवला नव्हता. आता मात्र योग्य स्थिती आहे.”
“म्हणजे?”
“अगं वेडे, आता तुझं लग्न झालंय. आता माझ्यावर कसलीच जबाबदारी नाही. आता आपल्याला ऐश करायला हरकत नाही…”
तिचा चेहरा रागाने लाल झाला…
“तुला काय मी ‘तसली” बाई वाटले?”
“काय हरकत आहे जुई? तुला जगाचं वास्तव कळालंच नाहीये. अनेक बायकांची अशी लग्नानंतर लफडी असतात…”
“चुकतोहेस तू! जगाचं वास्तव हे आहे की, अजूनही नव्वद टक्के बायका नवऱ्याशी प्रामाणिक आहेत आणि मीही त्यातलीच एक आहे. तू फक्त दहा टक्के बायकांचं वास्तव मला सांगतोहेस. बरं ते जाऊदे. कसं चाललंय तुझं? सध्या काय करतो आहेस? नोकरी, व्यवसाय?”
“नोकरी आणि मी? ती जबाबदारी कशाला घ्यायची? माझं मस्त चाललंय. खायचं, प्यायचं, झोपायचं आणि कविता करायच्या…”
“अरे, पण या सगळ्याला पैसा तर लागतोच ना! तो कुठून आणतोस?”
“तुझ्यासारख्या खूप मैत्रिणी आहेत माझ्या. त्या देतात बिचाऱ्या… तूही देशील ना मला?”
जुई काही बोलली नाही. त्याचं असं भीक मागणं तिला अजिबात आवडलं नाही.
“पाच हजार आहेत तुझ्याकडे? हॉटेलचे पैसे द्यायचे होते.”
जुई अवघडली… काय करावं या संभ्रमात पडली.
“देतेस ना?”
शेवटी अनिच्छेने तिने पर्स उघडून त्याला पैसे काढून दिले.
“थँक्स. अशीच वेळोवेळी मदत करत जा. तुझा नवरा इंडस्ट्रियलिस्ट आहे, असं ऐकतो…”
तो हसत म्हणाला. त्याच्याशी आणखी काही बोलायची तिची इच्छा होईना. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती म्हणाली,
“चल मी निघू आता? बराच उशीर झालाय.”
त्याच्या उत्तराची वाट न पहाता ती निघाली. तो तिच्या पाठोपाठ निघाला. ती आपल्या कारजवळ आली. तिची चकचकीत कार पाहून त्याचे डोळे चमकले.
“एक मिनीट जुई…” दार उघडता उघडता जुई थबकली.
“तुझ्या नवऱ्याला माहितीय का गं, आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल?”
“का रे?”
“नाही म्हणजे त्याला कळलं तर हाकलून द्यायचा तो तुला. शेवटी मोठा उद्योजक आहे तो. नाचक्की होणार नाही का त्याची!”
हेही वाचा – वास्तव… जुईला कळली स्वप्नीलची तडजोड!
रागाने तिच्या भुवया वर गेल्या… “कोण सांगणार त्याला त्याबद्दल?”
“समजा मीच सांगितलं तर?”
“तू का सांगशील त्याला?”
“नाही सांगणार. तू मला एक लाख दिले तर नाही सांगणार. शेवटी मलाही पोटापाण्याचं बघावंच लागतं की!”
हे तर सरळ सरळ ब्लॅकमेलिंग होतं…
“इतके पैसे घेऊन फिरत नाही मी.”
“काय जुई! त्यासाठी पैसे कशाला हवेत? अगं तुझ्याकडे मोबाइल आहे. मी तुला अकाऊंट नंबर देतो, गूगल पेने ट्रान्सफर करून टाक.”
तिने गाडीचा दरवाजा बंद केला. त्याच्याजवळ आली आणि फाडकन तिने त्याच्या मुस्काटात ठेवून दिली. थप्पड इतकी जोरदार होती की, तो भेलकांडला.
“हा घे माझ्या नवऱ्याचा मोबाइल नंबर आणि सांग त्याला तुला जे सांगायचंय ते! अरे तू काय सांगशील? तुझ्याअगोदर मीच त्याला सगळं सांगून टाकलंय. स्वतःला वास्तववादी कवी म्हणवतोस, हे आहे तुझं वास्तव? निष्पाप मुलींना प्रेमात फसवायचं आणि त्यांना ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळायचे. वास्तवापासून दूर पळणारा एक नंबरचा पळपुट्या आहेस तू! तुझ्यापेक्षा माझा नवरा चांगला कवी आहे, पण असा कविता करून पोरींना फसवत नाही. कविता करत असतानाही त्याने जीवनातलं वास्तव ओळखलं, जबाबदारी स्वीकारली. स्वतःच्या कुटुंबाला गरीबीकडून श्रीमंतीकडे नेलं. अनेक जणांना रोजगार मिळवून दिला. अनेक जणांचा तो आज आधारस्तंभ आहे आणि तू काय केलंस! अनेक मुलींना नादी लावलंस. त्यांचे संसारही तू बरबाद केले असतील. तुझ्यासारखे दहा टक्के लोक आज जातीजातीत, धर्माधर्मात आगी लावण्याचं काम करताहेत. वास्तवतेच्या नावावर अनाचार वाढवण्याव्यतिरीक्त तुम्ही दुसरं केलं तरी काय? आज माझ्या संसाराला आग लावायला तू निघाला होतास. लाज वाटतेय मला तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसावर प्रेम केल्याची…”
ती थांबली तशी सुधीरने थरथरत्या हाताने सिगारेट पेटवली. एक झुरका घेऊन त्याने धूर तिच्या तोंडावर सोडला. तिने तो हाताने झटकून टाकला.
“बस कर तुझी ही नाटकं. आता मी पूर्वीची जुई राहिलेली नाही…”
त्याच्याकडे रागाने बघत ती कारकडे वळली. अचानक काहीतरी आठवून म्हणाली,
“आणि हो पुन्हा कधी मला भेटायचा, मला फोन करायचा प्रयत्नदेखील करू नको. माझ्या नवऱ्याला भडकावायला तू खुशाल जाऊ शकतो. मला खात्री आहे तो तुला धक्के मारून बाहेर काढेल नाहीतर पोलिसांच्या हवाली करेल.”
गाडीत बसून तिने गाडी स्टार्ट केली. वळण घेताना तिला सुधीर ठसका बसून मोठमोठ्याने खोकताना दिसला. त्याला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात ती म्हणाली,
“मर मेल्या असाच खोकत! तुझी लायकी तीच आहे.”
मुख्य रस्त्यावर ती येताच मोबाइलवर मेसेज आला. सुधीरने आता काही नवीन चावटपणा तर केला नाही ना, या भीतीने तिने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. मोबाइल पाहिला तर त्यावर स्वप्नीलचा मेसेज होता – “कसं झालं कविसंमेलन? तुझ्या कविता आवडल्या की नाही?” तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तिने रीप्लाय दिला – “माझ्या कविता तर आवडल्याच, पण तुमच्या कवितांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पुढच्या कविसंमेलनाचं तुम्हाला आतापासूनच खास निमंत्रण आहे आणि हो स्वप्नील आय लव्ह यू… आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट…”
मेसेज पाठवून तिने त्याचा डीपीवरचा फोटो झूम केला… त्याचा हसरा चेहरा पाहून तिला एकदम भडभडून आलं आणि मग स्टियरींगवर डोकं ठेवून ती रडू लागली.
(समाप्त)
(ही कथा माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे.)


