‘One Life’ हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रागमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. निकोलस विनटन नावाचा लंडनमध्ये राहणारा स्टॉकब्रोकर प्रागमध्ये येतो, तेव्हा हिटलरच्या आक्रमणामुळे घाबरलेले लोक चेकोस्लोव्हाकियामधून निर्वासितांच्या छावण्यांत राहत असलेले तो पाहतो. लहान मुले थंडीत जिवंत राहणार नाहीत, या काळजीने तो आणखी तीन मित्रांबरोबर त्यांना मदत करायचे ठरवतो. या मुलांना इंग्लंडचा व्हिसा मिळवून देऊन लोकांना तात्पुरते दत्तक देण्याची योजना बनवतो. मुलांना ट्रेनमधून इंग्लंडला पाठवायचे आणि कुटुंबांना सांभाळायला द्यायचे. पण यात अनेक अडचणी असल्याने असंभव वाटत असते. निकोलसची आई त्याला सर्वतोपरी मदत करते… व्हिसा मिळवून देण्यापासून फोस्टर पॅरेन्टस मिळवून देण्यापर्यंत! निकी आणि त्याची टीम मिळून 669 मुलांना वाचवतात.
हिटलरने पकडून नेलेल्या 15,000 मुलांपैकी फक्त 200 मुले जिवंत राहतात त्या तुलनेत 669 हा आकडा फार मोठा आहे. सरकारी यंत्रणा, मग ती इंग्लंडमधली का असेना, हलवणे मुश्किल. इथे निकीच्या आईचे कसब पणाला लागते. ती इंग्लिश अधिकाऱ्याला म्हणते, तीस वर्षांपूर्वी मी या देशात आले. या देशाने मला जी मूल्यं शिकवली, ती मी माझ्या मुलाला दिली; ज्याचा वापर तो आता प्रागमध्ये करतो आहे. तूही त्याच मूल्यांचा वापर करावास, एवढीच विनंती आहे. तो अधिकारी व्हिसा मिळवून देण्यापासून सर्व कामांत मदत करतो.
सामान्य लोक मुले दत्तक घेतील, याबद्दल साशंक असलेली मुलगी निकीला विचारते, ’’तुझा सामान्य माणसांवर इतका विश्वास आहे?’’ त्यावर तो म्हणतो, “हो आहे, कारण मीही सामान्य आहे.” सामान्य माणसांनी माणुसकीच्या नात्याने उभारलेली फौज निष्ठूर शक्तिशाली हिटलरच्या पंज्यातून मुलांना वाचवते.
हेही वाचा – Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!
सिनेमाची सुरुवात वयस्क निकी आणि त्याच्या पत्नीच्या संवादातून होते. ती त्याला जुनी कागदपत्रे टाकून द्यायला सांगते. पण या मुलांचे फोटो, नावे आणि फोस्टर पॅरेन्टसची यादी असलेले स्क्रॅपबुक तो एका पत्रकाराकडे घेऊन जातो. तो त्याला छापायला नकार देतो. एक इतिहास संशोधिका याचे मूल्य ओळखते आणि ही कथा जगासमोर येते.
जेव्हा ही आता मोठी झालेली मुले निकीला भेटतात, तो प्रसंग इतका हृद्य आहे की, डोळ्यांतून पाणी वाहू लागते. निकी आणि त्या मुलांच्या एकमेकांबद्दलच्या भावना शब्दातीत आहेत. निकोलसला आयुष्यभर एक दुख आहे – शेवटची अडीचशे मुलांची ट्रेन हिटलरच्या ताब्यात सापडली आणि मुले इंग्लंडला येऊ शकली नाहीत.
हेही वाचा – Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?
तो इतका साधा आहे की, त्याने काही फार मोठे काम केले आहे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे तो याबद्दल कोणाला सांगत नाही. या मुलांना कायम उत्सुकता असते की, त्यांना वाचवणारी व्यक्ती कोण आहे? प्रसिद्ध वर्तमानपत्राचा पत्रकार जे समजून घेऊ शकत नाही, ते टीव्हीवर एक दर्जाहीन पण लोकप्रिय कार्यक्रम करणारी निवेदिका समजून घेते.
‘Whoever saves one life saves entire world’ हे वाक्य प्रसिद्ध आहे. एक आयुष्य इतकी आयुष्य वाचवते, तेव्हा ते अर्थपूर्ण होते… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण आहे. आयुष्य सार्थकी लावण्यासाठी दुसर्याच्या आयुष्याची किंमत करायला हवी… असे अर्थ यातून निघू शकतात. मला पु. ल. देशपांडे यांच्या एका वाक्याची आठवण झाली – ‘जीवन म्हणावे असे एखादेच आयुष्य असते.’
तेच हे One life!
मुख्य अभिनेता अँथनी होप्किंसचा अभिनय सहज सुंदर आहे. बाकीच्यांचा अभिनय भूमिकेला न्याय देणारा आहे. Prime वर हा सिनेमा उपलब्ध आहे.


