दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 09 ऑगस्ट 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 18 श्रावण शके 1948; तिथि : एकादशी 11:05; नक्षत्र : मृगशीर्ष 14:43;
- योग : हर्षण 26:04; करण : कौलव 21:34;
- सूर्य : कर्क; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
कामिका एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
संगीतसूर्य केशवराव भोसले
टीम अवांतर
मराठी संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध गायक आणि नट केशवराव भोसले यांचा जन्म 9 ऑगस्ट 1890 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वैद्यकी करीत असत. केशवराव चार पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आईवर घरची सगळी जबाबदारी आली. परिस्थितीवश केशवरावांना शिक्षण घेता आले नाही.
पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या आईने ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’त स्वयंपाकाचे काम स्वीकारले. केशवराव आणि त्यांचा भाऊ दत्तात्रय हे दोघे आईसोबत कंपनीतच असत. तिथे ही मुले वरकाम करीत. इथेच केशवरावांच्या मनात नाट्यकलेचे बीज पेरले गेले आणि त्यातूनच त्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरली. या नाटक मंडळीचे चालक जनुभाऊ निमकर या कुशल नाट्यदिग्दर्शकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्याच काळात दत्तोपंत जांभेकरबुवा यांच्याकडून केशवरावांना शास्त्रीय संगीताची तालीमही मिळाली.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!
अगदी सुरुवातीला अनेक नाटकांमधून बालकलाकार किंवा स्त्री पात्रांच्या लहानसहान भूमिका केशवरावांनी वठवल्या. पण 1902 साली त्यांना गोविंद बल्लाळ देवल यांच्या शारदा या संगीत नाटकात शारदेची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि रातोरात त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. ही भूमिका त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
यानंतर त्यांनी सौभद्र, मृच्छकटिक यांसारख्या संगीत नाटकांमध्ये सुभद्रा, वसंतसेना अशा भूमिका साकारल्या. त्याही खूप गाजल्या. 1907 साली त्यांनी ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’ सोडली आणि 1 जानेवारी 1908 रोजी हुबळी येथे ‘ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. त्यावेळी ते अवघे 18 वर्षांचे होते.
सुरुवातीस नाटक मंडळींनी शारदा, सौभद्र वगैरे जुन्या संगीत नाटकांचे प्रयोग केले; पण लोकशिक्षणाशी निगडीत नाटके करावीत या हेतूने त्यांनी रामचंद्र आत्माराम दोंदे यांचे मदालसा आणि हिराबाई पेडणेकर यांचे दामिनी ही दोन नवी संगीत नाटके प्रेक्षकांसमोर आणली; पण या नाटकांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी वीर वामनराव जोशी यांच्याकडून राक्षसी महत्त्वाकांक्षा हे नाटक लिहून घेतले. जोमदार संवाद, कर्णमधुर संगीत आणि नावीन्यपूर्ण देखावे यांमुळे हे नाटक त्या काळी अतिशय लोकप्रिय झाले. यात केशवरावांनी मृणालिनी या स्त्री पात्राची भूमिका केली होती. यास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा – कॉफीशॉप
पुढे त्यांनी गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून गाण्याची दीक्षा घेतली आणि गायनकलेतही प्रावीण्य मिळविले. कालांतराने स्त्री भूमिका सोडून त्यांनी पुरुष भूमिका करण्यास सुरुवात केली. 1915 मध्ये त्यांनी संगीत मानापमान या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत केला. या नाटकात त्यांनी धैर्यधराची भूमिका साकार केली. त्यातील त्यांची पदे त्या काळी अतिशय लोकप्रिय झाली. 1919 मध्ये मामा वरेरकर लिखित हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार ही दोन सामाजिक नाटके केशवरावांनी रंगभूमीवर आणली. 1921 साली नारायण ऊर्फ आप्पासाहेब टिपणीस यांचे शहाशिवाजी हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारलेले होते. यामध्ये केशवरावांनी महाराजांची भूमिका केलेली होती. या सर्व नाटकांतील त्यांच्या नायकाच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर मात्र त्यांनी रामराज्यवियोग या नाटकात मंथरेची भूमिका साकारली.
टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी ‘गंधर्व’ व ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळींतर्फे संगीत मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग मुंबईतील बालीवाला नाट्यगृहात 8 जुलै 1921 रोजी पार पडला. या प्रयोगात केशवरावांनी धैर्यधर, बालगंधर्वांनी भामिनी आणि गणपतराव बोडस यांनी लक्ष्मीधर अशा भूमिका साकारल्या. या प्रयोगाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर केशवरावांनी बालगंधर्वांसोबत सौभद्र या नाटकाचाही संयुक्त प्रयोग केला.
टिपेच्या सुरांना सहज आणि स्वच्छपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारा आवाज आणि अत्यंत प्रभावी, जोरकस तान हे केशवरावांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. म्हणूनच अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी त्यांना ‘संगीतसूर्य’ असे संबोधले होते. रंगभूमीवरील सजावटीबाबत नवनवीन प्रयोग करून केशवरावांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाच्यावेळी मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा मखमलीचा पडदा झळकला. केशवरावांनी त्या काळात राबवलेला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ठरलेल्या वेळी नाटकाची सुरुवात करणे.
4 ऑक्टोबर 1921 या दिवशी टायफॉइडने वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी केवशरावांचे निधन झाले. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये 1915 साली ‘पॅलेस थिएटर’ हे नाट्यगृह बांधले. 1957 साली केशवराव भोसले यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ या प्रसिद्ध नाट्यगृहाचे नामकरण ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ असे करण्यात आले. ऑगस्ट 2024 मध्ये दुर्दैवाने आग लागून हे नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडले. संपूर्ण कला जगताला चटका लावणारी ही घटना होती. मात्र आता या नाट्यगृहाची दिमाखदार पुनर्निर्मिती करण्यात आली असून, याचे उद्घाटन आज म्हणजेच 9 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे.


