दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 ऑगस्ट 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 11 श्रावण शके 1948; तिथि : चतुर्थी 23:15; नक्षत्र : पूर्व भाद्रपदा 21:36;
- योग : अतिगंड 22:29; करण : बव 11:14;
- सूर्य : कर्क; चंद्र : कुंभ 15:26; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:14;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 09:37
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली व्यंकय्या
टीम अवांतर
भारतीय तिरंग्याचे आद्य रचनाकार पिंगली व्यंकय्या यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876 साली सध्याच्या आंध्रप्रदेश राज्यात असणाऱ्या मच्छलीपट्टम येथील भतलामपेनूमारू येथे झाला. मछलीपट्टणम इथल्या हिंदू हायस्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मद्रासमधून हायस्कूल पूर्ण केल्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले.
वयाच्या 19 व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. पुढे दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ते ब्रिटिशांच्या बाजूने लढले. याच काळात त्यांची आणि महात्मा गांधी यांची दक्षिण आफ्रिकेमध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते. गांधी यांचे कट्टर अनुयायी म्हणून नंतर ते ओळखले जाऊ लागले.
पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खननातील तज्ज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड व्यंकय्या हे टोपणनाव मिळाले.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने कॉटन व्यंकय्या नावानेही ओळखले जायचे. त्यांना उर्दू तसेच जपानी भाषांबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या.
हेही वाचा – कहाणी सकिना अन् खुशबूची
व्यंकय्यांना राष्ट्रध्वजातून देशाचे प्रतिबिंब उमटावे असे वाटत होते. 1916 मध्ये एका पुस्तकात त्यांनी याची संकल्पना मांडली होती. भारतासाठी राष्ट्रध्वज असे नाव असलेल्या या पुस्तकात त्यांनी राष्ट्रध्वजासाठी 24 डिझाईन मांडल्या होत्या. 1921 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजांचा अभ्यास केला. 31 मार्च 1921 मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. तिरंग्यावर एकमत होण्यापूर्वी व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजासाठी सुमारे 30 डिझाईन सादर केली होती.
त्याआधी मूळचे जालंधरचे असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चरखा असावा असे सांगत चरख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान समितीने तिरंगा झेंडा हाच भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.
भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची पिंगली यांची शेवटची इच्छा होती. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
हेही वाचा – नात्यांचे दिवस
4 जुलै 1963 रोजी पिंगली यांचा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर 2009 साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते. 2011 साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस देखील करण्यात आली होती. मात्र त्यावर पुढे कोणताही निर्णय झाला नाही.


