अध्याय तेरावा
तेथ ध्येय ध्यान बहु सुख । तेंचि शेषतुका निर्दोख । वरि जलशयनु देख । भावी गुरु ॥392॥ मग वोळगती पाय । लक्ष्मी आपण होय । गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥393॥ नाभीं आपणचि जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें । अनुभवी मनोधर्में । ध्यानसुख ॥394॥ एकाधिये वेळें । गुरु माय करी भावबळें । मग स्तन्यसुखें लोळे । अंकावरी ॥395॥ नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं । गुरु धेनु आपण पाठीं । वत्स होय ॥396॥ गुरुकृपास्नेहसलिलीं । आपण होय मासोळी । कोणे एके वेळीं । हेंचि भावीं ॥397॥ गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचें होय रोप । ऐसेसे संकल्प । विये मन ॥398॥ चक्षुपक्षेंवीण । पिलूं होय आपण । कैसें पैं अपारपण । आवडीचें ॥399॥ गुरूतें पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी । गुरु तारु धरी । आपण कास ॥400॥ ऐसें प्रेमाचेनि थावें । ध्यानचि ध्यानातें प्रसवे । पूर्णसिंधु हेलावे । फुटती जैसे ॥401॥ किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ती अंतरीं । भोगी आतां अवधारीं । बाह्यसेवा ॥402॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा
अर्थ
त्या प्रेमरूपी क्षीरसागरामधे ध्येय जे गुरु, त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते (सुखच) शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर (श्रीविष्णूप्रमाणे) जलशयन करणारे श्रीगुरु आहेत असे समजतो. ॥392॥ श्रीगुरुरूपी विष्णूच्या पायाची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरूड होऊन पुढे उभा रहातो. ॥393॥ आपणच श्रीगुरुरूपी विष्णूच्या नाभीकमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यानसुख अंत:करणात अनुभवितो. ॥394॥ एखाद्या वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरूला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो. ॥395॥ अथवा अर्जुना, चैतन्यरूपी झाडाच्या खाली गुरूला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो. ॥396॥ गुरूच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी आहोत, कोण्या एका वेळेला अशीच कल्पना करतो. ॥397॥ गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या दृष्टीची कल्पना करतो, असे असे संकल्प त्याचे मन करते. ॥398॥ डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे (पक्ष्याचे) पिलू आपणच होतो. त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण कसे आहे! ॥399॥ गुरूला पक्षिणी करतो व आपण (पिल्लू बनलेला) तिच्या चोचीतून चारा घेतो. गुरूला पोहणारा करून आपण त्यांच्या कासेला लागतो. ॥400॥ ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटांमागून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते. ॥401॥ फार काय सांगावे? याप्रमाणे तो श्रीगुरुमूर्ती आपल्या अंत:करणात भोगतो. आता त्याची बाहेरील (शारीरिक) सेवा ऐक. ॥402॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हृदयशुद्धीचां आवारीं, आराध्यु तो धुरु करी


