अध्याय तेरावा
ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींच धाडिलें । तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें ॥379॥ कां सुकतया अंकुरा- । वरि पडिलिया पीयूषधारा । नाना अल्पोदकींचा सागरा । आला मासा ॥380॥ नातरी रंकें निधान देखिलें । आंधळिया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद ॥381॥ तैसें गुरुकुळींचेनि नांवें । महासुखें अति थोरावे । जें कोडेंही पोटाळवें । आकाश कां ॥382॥ पैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी । जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी ॥383॥ आणि अभ्यंतरिलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे । श्रीगुरूंचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥384॥ हृदयशुद्धीचां आवारीं । आराध्यु तो धुरु करी । मग सर्व भावेंसी परिवारीं । आपण होय ॥385॥ कां चैतन्यांचिये पोवळी- । माजीं आनंदाचां राउळीं । गुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥386॥ उदयिजतां बोधार्का । बुद्धीची डाळ सात्त्विका । भरोनि त्र्यंबका । लाखोली वाहे ॥387॥ काळशुद्धी त्रिकाळीं । जीवदशाधूप जाळीं। ज्ञानदीप वोंवाळी । निरंतर ॥388॥ सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय । आपण भराडा होय । गुरु तो लिंग ॥389॥ नातरी जीवाचिये सेजे । गुरु कांतु करूनि भुंजे । ऐसीं प्रेमाची भोजें । बुद्धी वाहे ॥390॥ कोणे एके अवसरीं । अनुरागु भरे अंतरीं । कीं तया नांव करी । क्षीराब्धी ॥391॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव
अर्थ
अशात जर कोणी गुरूच्या गावचे आले; अथवा स्वत: गुरूंनीच पाठविले, तर जसे मरावयास टेकलेल्या पुरूषाला आयुष्य प्राप्त व्हावे ॥379॥ अथवा सुकणार्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात, अथवा डबक्यांतला मासा जसा समुद्रात यावा ॥380॥ अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टि यावी, अथवा भिकार्याला जसे इंद्रपद मिळावे ॥381॥ त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू. ॥382॥ ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असे प्रेम तू पाहशील, त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते, असे समज. ॥383॥ आणि अंत:करणात प्रेमाच्या बळावर श्रीगुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो ॥384॥ अंत:करणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामधे आराधना करण्याला योग्य जो गुरु, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग कायेने, वाचेने व मनाने श्रीगुरूचा लवाजमा आपण बनतो. ॥385॥ अथवा ज्ञानाच्या आवारात असणार्या आनंदाच्या देवळामधे गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो ॥386॥ बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विकभाव भरून तो त्यांची लाखोली श्रीगुरुरूपी शंकराला वाहतो. ॥387॥ पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या तीन वेळा, त्यात जीवनरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो. ॥388॥ गुरूला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहेमी अर्पीत राहतो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन, गुरूला शंकराची पिंडी करतो. ॥389॥ अथवा जीवरूपी शय्येवर गुरूला पति करून भोगतो, अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धि बाळगते. ॥390॥ कोणा एका वेळी मनात गुरूविषयी प्रेम भरले की त्याला (त्या प्रेमाला) क्षीरसमुद्र असे नाव देतो. ॥391॥
क्रमश:
हेही वाचा –


