आपल्याला मदत करणाऱ्यांना ‘अभिवादन’ करण्यात किंवा त्यांना ‘धन्यवाद’ देण्यात आपण (म्हणजे बरेच जण) नेहमीच चिक्कूपणा करत असतो, कदाचित त्यात स्वतःचा आपण कमीपणा समजतो.
आपण ऑटो रिक्षाने प्रवास करतो, उतरल्यावर मीटर बघून पैसे देतो, आणि व्यवहार पूर्ण करून चालायला लागतो. आपण थोडासा पॉज घेतला आणि विचार केला, तर लक्षात येईल की, काहीतरी मिसिंग आहे. वेड्यावाकड्या ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हरने आपला प्रवास आरामदायी होईल अशी रिक्षा चालवली, आपल्याला त्यांनी सुरक्षितपणे आपल्या इच्छित स्थळी पोहचवले, त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद द्यायला काय हरकत आहे? थोडं कौतुक करायला काय हरकत आहे? पुढच्या वेळेस असं करा आणि ड्रॉयव्हरच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघा.
आपण रस्त्याच्या बाजूला हातगाडीवर शहाळ्याचं पाणी पितो, पैसे देतो आणि पुढे निघतो. तोंडाला शहाळ्याचा एक वेगळाच गोडवा आलेला असतो आणि पोट पण शांत झालेले असते. शहाळ सोलायला चांगलंच कठीण असतं आणि हाताला कोयता लागण्याची भीती असतेच असते. शहाळी विकणारा प्रेमाने शहाळं सोलून त्यामध्ये स्ट्रॉ ठेवून आपल्या हातात देत असतो. शहाळं पिऊन झाल्यावर – “दादा, धन्यवाद. शहाळ एकदम गोड होतं.” असं म्हणायला काय हरकत आहे.
हेही वाचा – पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!
मंडळी, व्यवसाय म्हटलं की, शहाळं सोलून देणं आणि आपण पैसे देणं, हे व्यवहार तर होतच असतात. पण धन्यवाद म्हटल्यामुळे समाधानाची देवाण-घेवाण पण होत असते आणि यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य हमखास उमटतं आणि तेच आपल्याला एक वेगळच समाधान देऊन जातं.
रोजच्या घडामोडींमध्ये आपला नेहमीच अनेक लोकांशी संबंध येतो, ज्यांच्या सेवांचा आपल्याला उपयोग होत असतो. चांगल्या कामाबद्दल समोरच्याचं कौतुक करणं, त्यांचे आभार मानणे, या गोष्टी म्हटलं तर खूपच छोट्या असतात, पण त्या आपल्या आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद आणतात आणि आपल्या मनाला एक वेगळचं समाधान देत असतात.
हेही वाचा – हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!
निर्जीव वस्तूंचं कौतुक करण्यात किंवा त्यांना धन्यवाद देण्यात पण एक वेगळाच नक्की आनंद असतो. आपण सकाळी झोपून उठतो, उठल्यावर दैनंदिन क्रिया सुरू होतात. पण बेडजवळ दोन मिनिटं थांबून, बेडवरची चादर नीट करून / पांघरूण घडी करून, बेडला नमस्कार केला आणि म्हटलं – ‘तुझ्यामुळे मला छान विश्रांती घेता आली, माझा कालचा दिवसभराचा थकवा पूर्ण गेला आणि आता मी आजच्या रुटीन करता एकदम फ्रेश आहे. खूप खूप धन्यवाद…’ असं केल्यावर बघा मन किती प्रसन्न होतं आणि छान समाधान मिळतं.
आपली पॉझिटिव्हिटी वाढवण्याकरिता मनाचे समाधान हे उत्तम खत आहे, असं जाणकार मंडळी सांगतात. आणि — Life without positivity is big Zero


